म्यानमारमध्ये ‘सितवे’ बंदराची निर्मिती करून भारताने चीनला दिले आव्हान !

यंगून (म्यानमार) – म्यानमारमध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाला आता खीळ बसली आहे. भारताच्या साहाय्याने म्यानमारच्या रखाईन प्रांतात ‘सितवे पोर्ट’ नावाचे बंदर चालू करण्यात आले आहे. या माध्यमातून उभय देशांतील व्यापारास प्रोत्साहन मिळणार आहे. ९ मे या दिवशी कोलकात्याहून भारताचे पहिले मालवाहू जहाज म्यानमारच्या पश्‍चिमी तटावर असलेल्या या बंदरावर पोचले. या वेळी दोन्ही देशांचे सैन्याधिकारी त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

१. केंद्रशासनाच्या जहाज आणि बंदर यांच्याशी संबंधित मंत्रालयाचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी यासदंर्भात म्हटले की, हा समुद्री मार्ग सिद्ध झाल्याने भारताचा पूर्वोत्तर भाग दक्षिण आशियाच्या थेट संपर्कात आला आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीचे कार्य वर्ष २००८ मध्ये हाती घेण्यात आले होते.

२. सध्या चीन आणि म्यानमार यांच्यात ‘इकॉनॉमिक कॉरिडोर’ सिद्ध करण्याचे काम चालू आहे. या माध्यमातून चीन हिंद महासागरापर्यंत थेट पोचू शकणार आहे. चीनने रखाईन प्रांतातील ‘कयोकप्यू’मध्ये एका मोठ्या बंदराची निर्मिती आणि औद्योगिक क्षेत्राच्या निर्मितीची योजना बनवली आहे.

३. तरीही म्यानमारमध्ये वरील बंदर सिद्ध होऊन भारताचे पहिले मालवाहू जहाज तेथे गेल्यामुळे भारताने चीनला शह दिल्याचे बोलले जात आहे.