४५ जणांना अटक, इंटरनेट बंद, विद्यापिठाची परीक्षा रहित !
अकोला – शहरात ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमावरील पोस्टवरून झालेल्या २ गटांतील दंगलीत शहरात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. १३ मेच्या रात्री झालेल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४५ जणांना अटक करण्यात आली आहे. सामाजिक माध्यमांतून शहरात अफवांचे पेव फुटू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, तसेच हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यापिठाच्या परीक्षाही रहित करण्यात आल्या आहेत. शहरात शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अकोला येथील ११ केंद्रांवरील परीक्षा पुढे ढकलल्या !
अकोला येथील दंगलीनंतर अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापिठाच्या अंतर्गत होणार्या अकोला येथील ११ केंद्रांवरील परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. आता जरी परीक्षा रहित करण्यात आल्या असल्या, तरी विद्यापिठाकडून लवकरच परीक्षेचे नवीन दिनांक घोषित केले जाणार आहेत. शहरात आक्षेपार्ह पोस्टवरून दंगल झाली होती. या वेळी दगडफेक, तसेच वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती.
१०० मोटारसायकलस्वारांनी शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला !
१०० मोटारसायकलस्वारांनी शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली होती. या आक्रमणात विलास गायकवाड यांचा मृत्यू झाला आहे. विलास हे इलेक्ट्रिशियन होते. ८ जण घायाळ झाले होते. यामध्ये २ पोलिसांचा समावेश आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. हा तणाव अधिकच वाढत गेल्याने पोलिसांनी अखेर शहरात १४४ कलम लागू केले, तसेच नाक्यानाक्यांवर आणि संवेदनशील भागांत पोलीस बंदोबस्त वाढवला होता. अमरावती येथून राज्य राखीव दलाची तुकडीही मागवली होती.
नागपूर येथे अतीदक्षतेची चेतावणी !
अकोला दंगलीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे, तसेच नागपूर शहरातील संवेदनशील भागात पोलिसांची दृष्टी आहे. सशस्त्र पोलिसांची गस्त आणि शांतता बिघडणार्यांवर तात्काळ कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस यंत्रणेला सतर्क रहाण्याचे पोलीस आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची बैठकही घेतली आहे.
महाराष्ट्रातील दंगलीचा कट सुनियोजित ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्रीमुंबई – महाराष्ट्रात १०० टक्के कुणीतरी जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे करणार्यांना सोडणार नाही. महाराष्ट्रात कुणालाही दंगली घडवू देणार नाही. जे यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना अद्दल घडवणार. काही संस्था, लोक यामध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ मे या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. अकोला आणि नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे निर्माण झालेल्या दंगलसदृश्य परिस्िथतीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी वरील प्रतिक्रिया दिली. |
संपादकीय भूमिकादंगली करणार्या समाजकंटकांवर शीघ्रतेने कठोर कारवाई करून उत्तरप्रदेशप्रमाणे ‘महाराष्ट्र दंगलमुक्त’ करावा ही अपेक्षा ! |