संयमाकडून समाधीकडे हाच जीवन मार्ग !
६ मे २०२३ या दिवशी ब्रिटनचे राजे चार्ल्स (तिसरे) (७३ वर्षे) आणि त्यांची पत्नी राणी कॅमिला यांचा शाही राज्याभिषेक सोहळा पार पडला. खरे तर भारतीय संस्कृतीनुसार कोणताही हिंदु राजा त्याच्या ६५ व्या वर्षानंतर आपल्या उत्तराधिकारी युवराजाकडे राज्यकारभार सोपवून पुढे तो संन्यासाश्रमात राहून साधना करत असतो. याउलट पाश्चात्त्य तत्त्वज्ञान राजा होण्याला कोणतेही बंधन घालत नसल्याचे वरील उदाहरणावरून दिसून येते. भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांमध्ये कसा भेद आहे ? आणि भारतीय तत्त्वज्ञान, परंपरा कशी श्रेष्ठ आहे, हे या लेखाद्वारे देत आहोत.
१. मानवी जीवनासाठी भारतीय तत्त्वज्ञान
भारतीय तत्त्वज्ञान हे जगातील सर्वांत श्रेष्ठ असलेले तत्त्वज्ञान आहे. या सृष्टीत लक्षावधी प्रकारचे जीव आहेत, त्यात सर्वांत श्रेष्ठ प्राणी म्हणजे मानव ! ‘मानवाने जीवनात काहीतरी उत्तम कार्य करावे. आपल्या आयुष्याचे सर्वोत्तम ध्येय निश्चित करून त्या ध्येयप्राप्तीसाठी आजन्म प्रयास करावा’, असे सांगणारा जीवन सिद्धांत भारतीय तत्त्वज्ञानाने मांडला आहे. हा सिद्धांत अखिल मानव जातीसाठी आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.
आपल्याला मानवाचा जन्म प्राप्त झाला आहे, ही आपल्या अनंत जन्माची पुण्याई समजून माणसाने आपले जीवन उधळून लावू नये. असे संस्कार भारतीय तत्त्वज्ञानातून केले जातात. मानवाचा देह प्राप्त झाल्यावरच जीव विश्वाला गवसणी घालणारी प्रतिभा संपादन करू शकतो. बुद्धीच्या सामर्थ्यावर विश्वातील अनेक रहस्ये जाणून घेण्यासाठी आणि त्या रहस्यांची उकल करण्यासाठी माणूस प्रयत्नांची पराकाष्ठा करून तसे सामर्थ्य संपादन करू शकतो. म्हणूनच मानव हा सर्व प्राणीसृष्टीत अथवा जीवसृष्टीत श्रेष्ठ ठरला आहे. त्यामुळे मानवाने आपले जीवन निरर्थक आणि ध्येय हीन जगू नये. ‘आपल्या मनात निर्माण होणार्या विविध वासनांची पूर्ती करण्यासाठी झटणारा मानव आणि पशू यांत काही अंतर नाही’, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते.
२. मानवी जीवनाचे ध्येय आणि भारतीय तत्त्वज्ञानाने त्यासाठी केलेले मार्गदर्शन
मानवाचा देह प्राप्त झाला, तर आपण भाग्यवान आहोतच. त्यातही भरतखंडात मानवजन्म प्राप्त झाला, तर तो माणूस अधिक भाग्यवान आहे. म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘भरतखंडीं नरदेहप्राप्ती । हे परम भाग्याची संपत्ती ।।’ – एकनाथी भागवत, अध्याय २०, ओवी ९६९ (अर्थ : नरदेह आणि तोही भरतखंडात प्राप्त होणे, हे मोठ्या भाग्याचे लक्षण होय); पण एवढ्यावर भागत नाही. संत एकनाथ महाराज पुढे सांगतात, ‘जेणें साधे ब्रह्मज्ञान । तो धन्य धन्य नरदेह ।।’ – एकनाथी भागवत, अध्याय २०, ओवी १२७ (अर्थ : ज्याच्या योगाने ब्रह्मज्ञान प्राप्त होते, तो नरदेह केवळ धन्य होय.)
अशा प्रकारे मानवाच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय ब्रह्मज्ञान संपादन करणे, हे आहे. अशा या परमश्रेष्ठ भारतीय तत्त्वज्ञानाने प्रत्येक वृत्तीच्या, प्रवृत्तीच्या माणसाला त्याच्या त्याच्या स्वभावानुसार, क्षमतेनुसार मार्गदर्शन केले आहे. उच्च कोटीची बौद्धिक क्षमता असेल, तर अधिकाधिक ज्ञान संपादन करा. उच्च कोटीच्या बौद्धिक क्षमतेसह लढाऊ वृत्ती असेल, तर दुष्टांपासून सज्जनांचे रक्षण करा. समाज आणि राज्य व्यवस्था सुयोग्यपणे चालावी, यासाठी स्वतःची शारीरिक अन् बौद्धिक क्षमता पणास लावा. मानवी जीवन जगण्यासाठी भौतिक साधनांची आवश्यकता असते. अशी भौतिक साधने संपूर्ण समाजाला उपलब्ध करून देण्यासाठी लागणारी कला अवगत असेल, त्याने मानवी समाजाला ती साधने उपलब्ध करून द्यावीत आणि त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी. यांपैकी काहीही करता येत नसेल, त्याने आपल्या क्षमतेप्रमाणे हलकीफुलकी कामे करून मानवी समाजाची सेवा करावी.
आपण कोणतेही काम करत असलो, तरी ते काम म्हणजे ईश्वराचे कार्य आहे, असे समजून करावे. त्या कामात लबाडी करू नये. थोडक्यात माणसाने अशा प्रकारचे जीवन जगावे की, आपल्याकडून कुणाला त्रास वा उपद्रव होणार नाही, याची काळजी घ्यावी. यातूनच ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’, ‘जनता हीच जनार्दन आहे’, अशी बोधवचने भारतीय तत्त्वज्ञानातून नवनीतासारखी वर आली. अशा प्रकारची शिकवण देऊन मानवी समाजातील प्रत्येक घटकाला स्वतःचे जीवन उन्नत करण्याचे मार्गदर्शन भारतीय तत्त्वज्ञानाने केले आहे.
३. मानवाने पदावर किती काळ विराजमान व्हावे ?
याविषयी मार्गदर्शन करतांना भारतीय तत्त्वज्ञान सांगते, ‘शारीरिक, बौद्धिक आणि वैचारिक क्षमतेनुसार माणसाने काम करावे. त्यासाठी वयाची मर्यादा नाही. शरीर सुदृढ असेल, तेजस्वी बुद्धी असेल, विचार आणि विवेक यांची साथ असेल, तर कोणत्याही सक्षम मानवाला कार्य करण्यासाठी वयोमर्यादा नाही.’
महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण ८५ वर्षांचे, तर पितामह भीष्म १८० वर्षांचे होते. त्यांनीच युद्धाला आरंभ करण्यासाठी प्रथम शंख फुंकला. यावरून शारीरिक बौद्धिक क्षमतेप्रमाणे माणसाने कितीही काळ कार्य करावे. तिथे वयाचा संबंध येत नाही. हा विचार मांडतांना भारतीय तत्त्वज्ञानाने अत्यंत सूक्ष्म स्तरावर जाऊन काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.
मानवाचा ज्ञान संपादन करून सक्षम होण्याचा कालखंड हा जन्मापासून वयाच्या २५ वर्षांपर्यंत मानला आहे. त्यानंतरची सुमारे ४० वर्षे म्हणजे वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत गृहस्थाश्रमात काळ व्यतीत करावा, असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर ‘शरीर थकले असेल, कोणतेही कार्य आपल्या हातातून घडत नाही, हे लक्षात येताच माणसाने गृहस्थाश्रमाचा त्याग करून वानप्रस्थाश्रमात प्रवेश करावा’, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते, म्हणजेच ही एक प्रकारची संसारातून घेतलेली निवृत्ती आहे. माणूस कामकाजातून निवृत्त होतो, त्याचप्रमाणे माणसाने संसारातूनही योग्य वेळी निवृत्त व्हावे.
‘एखाद्या सक्षम माणसाने कायमस्वरूपी अधिकार पदावर विराजमान व्हावे’, असे सांगितले गेले नाही. ‘वृक्षाचे पान पिकल्यावर ज्याप्रमाणे स्वतःहून गळून पडते, त्याप्रमाणे माणसाने परिपक्व अवस्था प्राप्त झाल्यावर आपल्या पदाचा त्याग करावा’, असे मार्गदर्शन भारतीय तत्त्वज्ञान करते. वृक्षाचे पिकलेले पान गळून पडते; कारण नवीन फुटलेल्या पालवीला विकसित होण्यासाठी जागा निर्माण करून द्यायची असते किंवा वाव द्यायचा असतो. त्याचप्रमाणे ज्येष्ठ मंडळींनी योग्य वेळी आपल्या पदाचा त्याग करावा आणि उगवत्या पिढीतील योग्यता प्राप्त असलेल्या तरुणाला स्वतःची जागा द्यावी.
४. भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांतील भेद
अशा प्रकारे भारतीय तत्त्वज्ञान मानवाचा जीवन विकास व्हावा म्हणून तळमळीने मार्गदर्शन करते. परम पुरुषार्थाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारे तत्त्वज्ञान केवळ याच भरतभूमीत निर्माण झाले. काही पाश्चात्त्य तत्त्ववेत्यांचे विचार भारतीय तत्त्वज्ञानाशी मिळतेजुळते असले, तरी त्यांच्या विचारांना बौद्धिक मीमांसेच्या पलीकडे महत्त्व नाही; कारण त्यांच्या तत्त्वज्ञानात प्रत्यक्ष जीवन कसे घडवावे ? याचे मार्गदर्शन आढळत नाही. केवळ ज्ञान संपादन केले, तर आदर्श काय आहे ? ते कळते; पण प्रत्यक्ष जीवनात तत्त्वज्ञान उतरवण्यासाठी तपस्या आणि साधना यांची आवश्यकता असते. तपस्या आणि साधना रहित ज्ञान म्हणजे आत दाणे नसलेले कणीस होय !
पाश्चात्त्य तत्त्वज्ञान भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे जीवन सिद्धांत जीवनात उतरवण्याचे मार्गदर्शन करत नाही. तपस्या, साधना, इंद्रिय निग्रह, यम, नियम, अस्तेय, ध्यान, धारणा, प्रत्याहार या आणि अशा क्रमाने स्वतःची उन्नती करत जीवन विकसित करायचे असते. अशी शिकवण देणारे पाश्चात्त्य तत्त्वज्ञान नाही.
५. राजाने कसे वागावे ? याविषयी भारतीय तत्त्वज्ञानात केलेले मार्गदर्शन
राजा हा ‘उपभोग शून्य स्वामी’ आहे. ‘तो राष्ट्राचा विश्वस्त आहे, राष्ट्राचा मालक नाही’, ही जाणीव त्याने आपल्या उराशी बाळगली पाहिजे. असे संस्कार भारतीय तत्त्वज्ञान मानवी समाजावर करते. ‘प्रत्येकाने संयमाने जीवन जगावे. सुख-दुःख, यश-अपयश, मान-अपमान, आशा-निराशा अशा कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये. मन आणि इंद्रिये यांवर विजय संपादन करण्यासाठी जीवन कसे जगावे’, याचे मार्गदर्शन भगवद्गीता करते. ‘माणसाने वासनेची गुलामगिरी टाकून द्यावी आणि वासुदेवाच्या सेवेत लीन व्हावे. रामाप्रमाणे हसून सुखाचा त्याग करावा आणि कधीही कर्तव्यच्युत होऊ नये’, असे संयमाने जीवन जगत क्रमाक्रमाने प्रगती करत समाधी सुखाचा आनंद घ्यावा अन् मानवी जीवन सार्थकी लावावे.
हा समाधी सुखाचा अनुभव घेण्यासाठी ‘संयम’ हाच जीवनाचा पाया असला पाहिजे. असे जीवन जगणारा स्वतःचे जीवन पुष्प ईश्वराच्या चरणी समर्पित करू शकतो. इतरांना तो अधिकार नाही. केवळ ज्ञानसंपन्न होऊन चालत नाही. त्या ज्ञानाला तपस्या, साधना आणि संयम यांची जोड असली पाहिजे; कारण कोणतीही अभिलाषा माणसाला क्षणात दानव करू शकते, हे लक्षात घेऊन माणसाने संयमाने जीवन जगावे. अन्यथा आपला दुर्योधन होण्यास वेळ लागणार नाही.
जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति । जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति: ।।
– शिवमहापुराण, अध्याय १३, श्लोक ३६
(अर्थ : धर्म काय ते कळते; पण तिकडे माझी प्रवृत्ती नाही. अधर्म काय तेही कळते; पण त्यापासून मी निवृत्त होऊ शकत नाही.) आपली अशी अवस्था होऊ नये; म्हणून आपण काळजी घ्यावी एवढीच अपेक्षा भारतीय संस्कृती मानवाकडून करते.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (९.५.२०२३)