आजची पत्रकारिता मूळ उद्देशापासून भरकटत चालली आहे ! – सुशील कुलकर्णी
सांगली, १५ मे (वार्ता.) – आज अनेक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या बंद पडत आहेत. विविध माध्यमांची घसरण चालू असतांना समाजमाध्यमे मात्र वाढत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित ‘कि घेतले न हे व्रत अंधतेने’ या उक्तीप्रमाणे पत्रकारिता होतांना दिसत नाही. निष्पक्ष पत्रकारितेची व्याख्या पालटत असून हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका मांडणार्यांवर टीका केली जाते. महर्षि नारद हे कळीचा सूत्र म्हणजे अपेक्षित असे सूत्र अन्यत्र पोचवायचे. आज मात्र पत्रकारिता ही तिच्या मूळ उद्देशापासून भरकटत चालली आहे, असे दिसते. आजच्या पत्रकारितेत ‘राम’ आणि ‘नारायण’ उरलेला नाही. असे असतांना भाऊ तोरसेकर यांचा प्रतिपक्ष, ‘ॲनालायझर न्यूज’ यांची दर्शकसंख्या मात्र वाढत आहे. यावरून त्यांची विश्वासार्हता लक्षात येते, असे प्रतिपादन ‘ॲनालायझर न्यूज’चे श्री. सुशील कुलकर्णी यांनी केले.
ते विश्व संवाद केंद्र आणि ‘सत्यवेध माध्यम समूह’ यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यपत्रकार देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने आयोजित ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता’ या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होते. ‘दि सांगली अर्बन बँके’च्या श्री अण्णासाहेब गोडबोले सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी ‘सत्यवेध माध्यम समूह’चे श्री. राहुल कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. विलास चौथाई, श्री. धनंजय दीक्षित उपस्थित होते. श्री. प्रज्वलंत कवठेकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.