राज्यातील ९०९ गावे आणि वाड्या येथे २१३ टँकरद्वारे पाणीपुरवठा !
छत्रपती संभाजीनगर – राज्यातील अनेक भागांत आता पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मे मासात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागात शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यातील अनेक गावे आणि वाड्या, वस्त्यांवर शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात शासकीय आणि खासगी टँकरचा समावेश आहे. राज्यातील २७० गावे आणि ६३९ वाड्या येथे सध्या एकूण २१३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात ५१ शासकीय आणि १६२ खासगी टँकरचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात राज्यात पाणीपुरवठा करणार्या टँकरची संख्या १८४ होती.
राज्यात सर्वाधिक पाण्याचे टँकर मुंबई आणि कोकण विभागांत चालू आहेत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ५ जिल्ह्यांत एकूण १०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या ५ जिल्ह्यांतील १४८ गावे आणि ४५१ वाड्या येथे ४ शासकीय आणि ९६ खासगी टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील ४० गावे आणि १३७ वाड्या येथे एकूण ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.