स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथे कार्यक्रम !
पुणे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तिथीनुसार असणार्या जयंतीनिमित्ताने येथील अंबर हॉल, कर्वे रोड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मंडळाच्या वतीने १३ मे या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सावरकर अभ्यासक आणि लेखक श्री. अक्षय जोग हे प्रमुख वक्ते अन् सावरकरांचे नातू श्री. सात्यकी सावरकर हे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाचा प्रारंभ मंडळाचे सुरेश आबादे यांनी ‘हाँ, मैं हिंदू हूं’ या कवितेने केला. ‘कलासक्त’च्या ५ भगिनींनी ‘जयोस्तुते’ या गाण्यावर नृत्यनाट्य सादर केले. सावरकर यांच्या छायाचित्राला हार, फुले घालून वंदन करण्यात आले. सावरकरप्रेमी, अभ्यासक, सावरकर गीते नृत्य नाट्य पद्धतीने सादर करणारे, सावरकरांचे चित्रकार या सगळ्यांचा मेळावाच भरला होता.
आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत निवडलेल्या १, २ आणि ३ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीपणे ‘मला आवडलेला क्रांतीकारक’ या विषयावर वक्तृत्व केले. त्यांचा आणि शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. ‘हर घर सावरकर’चे पदाधिकारी यांचा सत्कार झाला. त्यानंतर ‘सावरकरांचे हिंदुत्व आणि आजची गरज’ या विषयावर अक्षय जोग यांनी त्यांचे विचार मांडले. त्यानंतर ‘सावरकरांवरील आरोप आणि त्यावर उपाय’ या विषयावर श्री. सात्यकी सावरकर यांनी विश्लेषण केले. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.