वयस्कर असूनही सेवेची तीव्र तळमळ असणार्या पुणे येथील सौ. सुमती गिरी (वय ७३ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
पुणे – वय अधिक असूनही तळमळीने सेवा करणार्या आणि ईश्वराप्रती समर्पणभाव असणार्या येथील सौ. सुमती गिरी (वय ७३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे पुणे येथील सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी येथील शिबिरात घोषित केले. या वेळी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गरु स्वाती खाडये यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. सद्गुरु स्वाती खाडये यांनी सौ. सुमती गिरी यांना श्रीकृष्णाचे चित्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी काही सत्संगसेवकांनी सौ. सुमती गिरी यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली. शिबिराच्या समारोपीय सत्रात सर्व शिबिरार्थींनी भगवान श्रीकृष्णाला हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी साकडे घातले. सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी शिबिरार्थींना साधनेविषयी मार्गदर्शन केले.
सौ. सुमती हेमचंद्र गिरी यांची गुणवैशिष्ट्ये !
‘सौ. सुमती गिरी या एका संप्रदायानुसार साधना करत होत्या. साधनेविषयी पुढील मार्गदर्शन मिळण्यासाठी त्यांनी सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ ‘साधना सत्संगा’त सहभाग घेतला. तेव्हापासून त्यांच्या संपर्कात असणार्या साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सुश्री (कु.) उज्ज्वला ढवळे, चिंचवड, पुणे.
१ अ. ‘गिरीकाकू उत्साही आणि सकारात्मक आहेत.
१ आ. साधनेची तळमळ
१. काकू सत्संगात सांगितलेली सर्व सूत्रे वहीत लिहून घेतात. त्या मुख्य सूत्रे ठळक अक्षरांत लिहितात.
२. काकू पहाटे उठून १० माळा नामजप करतात. ‘ऑनलाईन’ साधना सत्संग ऐकायला प्रारंभ केल्यापासून त्या कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतात. गुरूंची कृपा म्हणून ‘मला पुढचा वर्ग आणि अभ्यास म्हणजे साधना सत्संग मिळाला’, असा त्यांचा भाव आहे.
३. काकू आणि त्यांचे यजमान (श्री. हेमचंद्र) सकाळी अन् संध्याकाळी नियमितपणे अग्निहोत्र करतात.
१ इ. इतरांचा विचार करणे : काकूंच्या यजमानांना ‘ऑनलाईन सत्संग’ ऐकणे शक्य न झाल्यास काकूंनी लिहून घेतलेली सूत्रे त्या यजमानांना वाचून दाखवतात. त्या वेळी काकूंचा विचार असतो, ‘यजमानांना सूत्रे सांगितल्याने माझीही उजळणी होते.’
१ ई. सेवाभाव
१ ई १. एका सेवेसाठी काकूंनी कागदी पिशव्या बनवण्याची सेवा केली होती. त्या पिशव्यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता जाणवत होती.
१ ई २. काकू घरी आलेले वर्तमानपत्र सर्वांचे वाचून झाले की, त्याची व्यवस्थित घडी घालून ठेवतात. जेणेकरून त्यांच्या पिशव्या करतांना अडचण यायला नको. यातून काकूंमधील ‘व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा आणि परिपूर्ण सेवा करायची तळमळ’ हे गुण दिसून येतात.
१ ई ३. फुलवाती करून श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात देणे : त्या १ सहस्र फुलवाती करून नियमितपणे हडपसर येथील
श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात देतात. ‘सनातन चैतन्यवाणी अॅप’वरील नामजप ऐकत त्या फुलवाती बनवतात. फुलवातींकडे पाहून त्यात सात्त्विकता आणि भाव जाणवतो.
१ ई ४. नवरात्रीत श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात सेवा करण्यासाठी सेवेकर्यांच्या घरी रहाणे : नवरात्रीत त्या ९ दिवस हडपसर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात सेवेला जातात. तेव्हा काकू तेथील सेवेकर्यांच्या घरात रहातात. काकूंचे घर सुखसोयींनी युक्त आहे; मात्र ‘त्यांच्यात आसक्ती नसल्याने त्या सेवेसाठी सेवेकर्यांच्या घरी रहातात’, असे लक्षात आले.
१ ई ५. संतशिरोमणी निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीच्या वेळी भोजन देणे : त्यांच्या गावी (नांदगाव (जिल्हा नाशिक) येथे संतशिरोमणी निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी येते. काकूंच्या आई-वडिलांपासून दिंडीच्या वेळी भोजन देण्याची परंपरा आहे. आता काकू त्यांच्या भावांसह (श्री. नंदु गोसावी आणि श्री. सुभाष गोसावी) दिंडीच्या वेळी ४०० जणांना भोजन देत आहेत. काकू या वयातही ही सेवा उत्साहाने करतात.’
२. सौ. सुरेखा हिरवे, पिंपरीगाव, पुणे.
२ अ. महाशिवरात्रीच्या प्रदर्शन कक्षावर तळमळीने आणि आनंदाने सेवा करणे : ‘काकूंना महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदर्शन कक्षावर सेवेला येण्यासाठी विचारल्यावर त्यांनी लगेच होकार दिला. त्या सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत प्रदर्शन कक्षावर सेवा करत होत्या. त्या रांगेत उभे असलेल्या भाविकांना नामजप सांगणे आणि सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, या सेवा करत होत्या. या सर्व सेवा त्या प्रथमच करत होत्या; मात्र त्यांच्याकडे पाहून तसे मुळीच वाटत नव्हते. ‘त्यांना सर्व ठाऊक आहे’, असेच जाणवत होते. त्या दुपारी थोडा वेळ घरी गेल्या आणि पुन्हा प्रदर्शन कक्षावर आल्या. त्यांनी रात्री ८ वाजेपर्यंत उभे राहून सेवा केली.
३. सौ. शैला कुलकर्णी, चिंचवड, पुणे.
३ अ. समष्टी सेवा म्हणून स्वतःला आलेल्या अनुभूती सत्संगात सांगणे : पूर्वी काकूंचा सत्संगात बोलण्याचा भाग अल्प असायचा. त्या संदर्भात मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला छान अनुभूती येतात. तुम्ही भाव ठेवून प्रयत्न करता. त्याविषयी तुम्ही सत्संगात सांगितल्यास ते गुरुचरणी आत्मनिवेदन होईल आणि इतरांना त्यातून शिकायला मिळेल.’’ मी त्यांना असे सांगितल्यावर काकूंनी लगेच स्वतःत पालट केला आणि पुढील सत्संगापासून बोलायला आरंभ केला. त्या सत्संगात मुद्देसूद बोलतात.’’
४. श्री. शिवानंद नागशेट्टी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५१ वर्षे), चिंचवड, पुणे
४ अ. साधनेविषयी बोलणे : काकूंना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ द्यायला गेल्यावर त्यांना पुष्कळ आनंद होतो. त्या वेळी त्या कधीच मायेतील गोष्टींविषयी बोलत नाहीत. त्या नेहमी साधनेविषयी बोलतात. त्या त्यांना आलेल्या साधनेतील अडचणींविषयी विचारतात. सत्संगात सांगितल्यानुसार त्या कृती करतात. त्या साधनेचा आढावा देतात. त्यांचे यजमानही त्यांना साथ देतात.
४ आ. काका आणि काकू दोघेही पुष्कळ प्रेमळ आहेत.
४ इ. काकू स्वतःहून अर्पण देतात.
४ ई. त्या त्यांच्या गावाकडे सनातनच्या वह्या आणि सनातन पंचांग यांचे वितरण करतात.
४ उ. गुरूंप्रती श्रद्धा : काकू पूर्वी दुसर्या एका संप्रदायानुसार साधना करत असत. आता त्यांची सच्चिदानंद परब्रह्म
डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. त्या म्हणतात, ‘‘मला पुष्कळ चांगला मार्ग मिळाला आहे.’’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ५.४.२०२३)
भगवंताने मला मायेतून मुक्त केले ! – सौ. सुमती गिरी
आज जे काही मला मिळाले आहे, त्याचे श्रेय मला साधनेत साहाय्य करणार्या साधकांचे, सत्संगसेवकांचे आहे. मी भगवंताला ‘मला मायेतून मुक्त करा’, अशी प्रार्थना सतत करत असे. आज भगवंताने सद्गुरूंच्या वाणीतून सांगितले आणि मला मायेतून मुक्त केले. ‘जी सेवा सांगितली, ती करत रहावी’, एवढाच प्रयत्न केला. सत्संगात सांगितल्याप्रमाणे सेवा करण्याआधी आणि नंतर मी प्रार्थना अन् कृतज्ञता व्यक्त करत असते.
सौ. सुमती गिरी यांच्या बोलण्यातून त्यांची सत्सेवेप्रती असलेली तीव्र तळमळ जाणवते ! – सद्गुरु स्वाती खाडये
सौ. सुमती गिरीकाकू त्यांचे प्रयत्न सांगत असतांना त्यांच्या बोलण्यातून त्यांची सत्सेवेप्रती असलेली तीव्र तळमळ जाणवली. काकूंचे वय अधिक असूनही त्यांचा सेवा शिकण्याचा आणि पुढाकार घेण्याचा भाग असतो.
‘साधकांनी गिरीकाकूंविषयी लिहिलेली सूत्रे वाचून माझी पुष्कळ भावजागृती झाली.’ – (पू.) सौ. मनीषा पाठक, पुणे (५.४.२०२३)
‘एक तरी ओवी अनुभवावी’ हे सूत्र सौ. सुमती गिरी यांनी कृतीत आणले ! – पू. (सौ.) मनीषा पाठक
‘संतांची एक तरी ओवी अनुभवावी’, असे म्हणतात. सौ. गिरीकाकूंनी हे सूत्र प्रत्यक्ष कृतीत आणले. जी सेवा सांगितली, ती त्यांनी परिपूर्ण आणि भावपूर्ण केली. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियाही राबवली. वयोवृद्ध असूनही तरुणांना लाजवेल, अशी सेवा त्या करत आहेत.