श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कुंभकोणम् जवळील पट्टीश्वरम् येथील श्री दुर्गादेवी मंदिर आणि तंजावूर येथील श्री भीमस्वामी मठ या ठिकाणी घेतलेले दर्शन !
१. पट्टीश्वरम् येथील श्री दुर्गादेवीचे मंदिर !
१ अ. देवीच्या चरणी नऊ कोटी कुंकुमार्चना झालेले श्री दुर्गादेवीचे मंदिर ! : ‘१९.२.२०२१ या दिवशी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कुंभकोणम् जवळ असलेल्या पट्टीश्वरम् येथील श्री दुर्गादेवीच्या दर्शनाला गेलो. येथे महर्षींनी आम्हाला गुरुदेवांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायला सांगितली होती. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की, या मंदिरात देवीच्या चरणी ९ कोटी कुंकुमार्चना झाली आहे.
१ आ. अनुभूती : ‘देवीची मूर्ती आम्हाला भेटण्यासाठी पुढे आली’, असे मला क्षणभर जाणवले.
१ इ. प्रसन्न आणि चैतन्यदायी मंदिर ! : देवीच्या मंदिरात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. देवीच्या पुजार्यांनी आम्हाला कुंकू आणि तिला वाहिलेल्या लिंबाच्या माळेतील ३ लिंबांचा प्रसाद दिला. देवीचे मंदिर सहस्रो वर्षांपूर्वीचे असून अत्यंत भव्य आहे. येथे जवळच शिवमंदिर आहे आणि समोर एक पुष्करणी (पाण्याचे तळे) आहे. मंदिराच्या परिसरात गेल्यानंतर मनाला एक प्रकारची प्रसन्नता जाणवते.
१ ई. शिल्पकारांच्या ३ पिढ्यांनी चिकाटीने आणि अपार कष्ट घेऊन बांधलेले हे मंदिर केवळ पहातांनाही दृष्टी थकून जाणे आणि ‘या पिढ्यांनी आमच्यासाठी किती अपूर्व कार्य करून ठेवले आहे !’, असे वाटणे : चोल राजा आणि पल्लव राजा यांनी तमिळनाडूत ठिकठिकाणी भव्य मंदिरे बांधली आहेत. ज्या शिल्पकारांनी (कारागिरांनी) ती मंदिरे बांधली आहेत, त्यांच्या प्रती फार कृतज्ञता वाटते. त्या शिल्पकारांच्या ३ पिढ्यांनी येथे अखंड कष्ट केल्याने आम्हाला ही मंदिरे पहायला मिळत आहेत. ‘या पिढ्यांनी आमच्यासाठी किती अपूर्व कार्य करून ठेवले आहे ! ’, असे मला वाटले. आम्हाला केवळ येथे दर्शन घ्यायचे आहे. मंदिर नुसते पहातांनाही दृष्टी थकून जाते, तर ते बांधतांना त्यांना किती कष्ट पडले असतील ! खरंच, आपले पूर्वज महान होते. त्यांची कला, चिकाटी आणि त्यांनी घेतलेले अपार कष्ट यांची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. या सर्व भक्त कलाकारांच्या चरणी आमचा त्रिवार प्रणाम !
२. महर्षि वसिष्ठ यांचे तपस्थान आणि तेथे उभ्या स्थितीत असलेली ‘गुरु’ ग्रहाची मूर्ती !
देवीचे दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या वसिष्ठेश्वर मंदिरात दर्शनाला गेलो. ‘हे महर्षि वसिष्ठ यांचे तपस्थान आहे’, असे म्हटले जाते. येथे स्वयंभू शिवलिंग आहे. आम्ही स्वयंभू लिंगाचे दर्शन घेऊन गुरु ग्रहाच्या स्थानी आलो. याच ठिकाणी गुरु ग्रहानेही त्याला लागलेल्या शापाचे उच्चाटन होण्यासाठी तप केले होते; म्हणून या ठिकाणी गुरु ग्रहाची मूर्ती उभी आहे. अन्य ठिकाणी गुरु ग्रहाची मूर्ती बसलेल्या स्थितीत असते. या ठिकाणी गुरुग्रहाला २ हात असून एका हातात वेदांचे प्रतीक असलेली प्राचीन तालपत्रे आहेत आणि दुसरा हात अभय मुद्रेत आहे.
२ अ. गुरुदेवतेच्या ठिकाणी सनातन पंचांग भेट देणे आणि पुजार्याने ते गुरुमूर्तीच्या चरणांपाशी ठेवणे : या ठिकाणी आम्ही पुजार्याला सनातन पंचांग भेट दिले. पुजार्यांनी सनातन पंचांग गुरुमूर्तीच्या चरणांशी ठेवले. पुजार्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही प्रार्थना करायला मूर्तीच्या अगदी समोर या.’’ त्याप्रमाणे मी मूर्तीच्या समोर गेले आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
३. तंजावूर येथील श्री भीमस्वामी मठ !
३ अ. समर्थ रामदास्वामी यांचे शिष्य असलेल्या श्री भीमस्वामी यांच्या मठातील चैतन्यमय वस्तू : येथून आम्ही तंजावूर येथील श्री भीमस्वामींच्या मठात गेलो. श्री भीमस्वामी हे समर्थ रामदासस्वामींचे शिष्य होते. तंजावूरला समर्थांनी स्थापन केलेल्या मठाचे ते मठाधिपती होते. येथे श्री भीमस्वामी यांच्यामुळेच समर्थ रामदासस्वामी सर्वांना ठाऊक झाले; कारण श्री भीमस्वामींनीच सर्वप्रथम समर्थ रामदासस्वामी यांचे चित्र काढले. अजूनही हे चित्र या मठात आहे. या ठिकाणी श्री भीमस्वामींच्या पूजेतील श्रीराम आणि हनुमंत यांच्या मूर्ती, श्री भीमस्वामींनी उपयोगात आणलेली कुबडी, अशा चैतन्यमय गोष्टी आहेत.
३ आ. त्यांच्या देवघराचे दर्शन घेतांना एक प्रकारचा सुगंध जाणवला. ‘या सुगंधातून जणू प्रत्यक्ष श्री भीमस्वामींनी आम्हाला आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले.
३ इ. अनुभूती
३ इ १. मठात दर्शनाला येण्यापूर्वी प्रतिदिन दहा दिवस श्रीरामाची शेजारती ऐकली जाणे, त्यातील विड्याचे पद सतत मनात गुंजत रहाणे आणि मठाला भेट दिल्यावर श्रीरामाचा विडा प्रसाद रूपात मिळणे : येेथे येण्यापूर्वी १० दिवस आम्ही सतत श्रीरामाची शेजारती ऐकत होतो. त्यात एक विड्याचे पद आहे, ‘विडा घ्या हो रामराया, रामराय सदया…’ आमच्या सर्वांच्या तोंडी हे पद वारंवार येत होते. मठात गेल्यानंतर आम्हाला कळले, ‘रथसप्तमीच्या दिवशी श्री भीमस्वामींच्या मठातील श्रीराम मूर्तीकडून येथील विडा प्रसाद म्हणून दुसर्या मठात जातो आणि तेथील विडा या मठात येतो.’ आम्ही याच दिवशी मठात दर्शनाला गेल्याने आम्हा सर्वांना श्रीरामाचा प्रसाद म्हणून येथील विडा मिळाला. जणू साक्षात् रामरायच आम्हाला या पदातून पूर्वसूचना देत होते, ‘तुम्हाला येथे माझे दर्शन आणि प्रसाद यांचा लाभ मिळणार आहे.’ यातून ‘देव प्रत्येक लहान-सहान गोष्टीतून किती शिकवत असतो !’, हे लक्षात आले.
३ इ २. मठाधिपती श्री रामचंद्रस्वामी यांच्या बहिणीने ओटी भरल्यावर ‘रामराय कौतुक करत आहे’, असे वाटणे : आम्ही येथील मठाधिपती श्री रामचंद्रस्वामी यांचा सनातनचे पंचांग, दक्षिणा आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. तेथे सेवा करणार्या श्री रामचंद्रस्वामी यांच्या बहिणीने माझी ओटी भरली. त्या वेळी ‘माहेरपणी जसे कौतुक होते, तसे प्रत्यक्ष श्रीरामरायच माझे कौतुक करत आहे’, असे मला वाटले. श्री रामचंद्रस्वामी मला म्हणाले, ‘‘तुम्ही चारचाकीतून उतरलात, तेव्हाच तुम्हाला पाहून रथसप्तमीच्या दिवशी हिरवी साडी नेसून आमची कुलदेवीच आमच्या घरी आली आहे’, असे वाटून माझे डोळे पाणावले.’’ (मी या दिवशी नेमकी हिरवी साडीच नेसले होते.)
श्रीरामराय, मारुतिराय आणि श्री भीमस्वामी यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही रात्री आमच्या निवासस्थानी परत आलो.’
– श्रीचित्शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू (२२.२.२०२१, सायंकाळी ७.१८)
देवाच्या चरणी शरणागतभाव ठेवून प्रत्येक कृती करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ |