शंखवाळ (सांकवाळ) येथे वारसा स्थळी चर्च संस्थेने अनधिकृतपणे फेस्ताचे (जत्रेचे) आयोजन केल्याचे उघड
पणजी, १४ मे (वार्ता.) – शंखवाळ (सांकवाळ) येथे ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी) या वारसा स्थळाच्या ठिकाणी चर्च संस्थेने अवैधरित्या फेस्ताचे (जत्रेचे) आयोजन केल्याचे उघड झाले आहे. चर्च संस्थेने शिंदोळी, सांकवाळ येथील ‘अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च’ येथे २६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी फेस्ताचे आयोजन करण्यासाठी मुरगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनुज्ञप्ती घेतली होती, तसेच हे फेस्त सकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत आयोजित करण्याची अनुज्ञप्ती देण्यात आली होती. ही माहिती माहिती अधिकाराखाली उपलब्ध झाली आहे. प्रत्यक्षात ‘अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च’पासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळाच्या ठिकाणी पोलीस संरक्षणात अवैधरित्या फेस्ताचे आयोजन करण्यात आले, तसेच सकाळी ६ ते रात्री ८.३० ही वेळ न पाळता रात्रीच्या वेळी फेस्त करण्यात आले.
शंखवाळ (सांकवाळ) येथे पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर होते. वर्ष १५०६ मध्ये पोर्तुगिजांनी हे मंदिर पाडले. सध्या तेथे केवळ मंदिराचे प्रवेशद्वार आहे. पोर्तुगिजांनी या भूमीच्या ठिकाणी असलेल्या प्रवेशद्वाराला ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळ गावाचे प्रवेशद्वार) असे नामकरण केले. मंदिराच्या ठिकाणी वडाचे झाड होते, तसेच या ठिकाणी काही वर्षांपूर्वी भूमीच्या उत्खननाच्या वेळी मंदिराचे दगड आणि श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती सापडली होती. वर्ष १९८३ मध्ये गोवा सरकारच्या पुरातत्व विभागाने सर्व्हे क्रमांक २६६/२ मध्ये असलेले हे स्थळ ‘वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले. यानंतर चर्च संस्थेने सुनियोजितपणे पुरातन मंदिराची भूमी बळकावण्यास प्रारंभ केला. वर्ष २०१८ पासून वारसा स्थळी अनधिकृतपणे ‘फेस्ता’चे आयोजन करण्यात येत आहे.
वारसा स्थळी अनधिकृत कामांच्या विरोधात कारवाई करण्याच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या मागणीकडे दुर्लक्ष !
सांकवाळ येथे सर्व्हे क्रमांक २६६/२ मध्ये वारसा स्थळी करण्यात येत असलेल्या अनधिकृत कृत्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुरातत्व विभागाकडे १३ जानेवारी २०२३ या दिवशी एका निवेदनाद्वारे केली होती, तसेच ४ जानेवारी २०२३ या दिवशी ‘शंखवाळी तीर्थक्षेत्र रक्षा समिती सांकवाळ’ने आणि १ डिसेंबर २०२२ या दिवशी डॉ. कालिदास वायंगणकर यांनी तेथील अनधिकृत कामांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या. इंदिरानगर येथील श्री. संतोषसिंह राजपूत यांनी १८ एप्रिल २०२३ या दिवशी माहिती अधिकाराखाली माहिती मागतांना ‘सांकवाळ येथील वारसा स्थळी करण्यात आलेल्या अनधिकृत कृत्यांविषयी पुरातत्व विभागाने कोणती कारवाई केली ?’, असा प्रश्न केला होता. पुरातत्व विभागाचे साहाय्यक अधीक्षक आर्किओलॉजिस्ट डॉ. वरद सबनीस यांनी उत्तर देतांना तक्रारदारांनी अनधिकृत कामांविषयी पुरावे न दिल्याने कोणतीही कारवाई न केल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे या घटनेला आता ६ मासांचा कालावधी पूर्ण होत असूनही या प्रकरणी अन्वेषण चालू असल्याचे पुरातत्व विभागाने म्हटले आहे.
फेस्त होण्यापूर्वी तक्रार प्रविष्ट करून कारवाई करण्यास पुरातत्व विभागाला अपयश
समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, ‘शंखवाळी तीर्थक्षेत्र रक्षा समिती, सांकवाळ’ आणि डॉ. कालिदास वायंगणकर या सर्वांनी वारसा स्थळी अनधिकृतपणे ‘फेस्ता’चे आयोजन होण्याच्या काही दिवस आधी पुरातत्व विभागाकडे तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या. ‘वारसा स्थळी खोदकाम किंवा अन्य कोणतीही कृती करता येत नाही; मात्र ‘फेस्ता’च्या निमित्ताने खोदकाम करून मंडप घालणे आदी अनेक अनधिकृत कृती करण्यात आल्या. तब्बल ९ दिवस वारसा स्थळी फेस्ताचे अनधिकृतपणे आयोजन करण्यात आले. पुरातत्व विभागाने तक्रारींकडे आणि वारसा स्थळी फेस्ताच्या अनधिकृत आयोजनाकडे कानाडोळा करून चर्च संस्थेला ‘फेस्ता’चे आयोजन करण्यास अप्रत्यक्षपणे सहकार्य केले आहे’, असा आरोप होत आहे.
पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचे कार्य करण्यासाठी सरकार स्थापित समिती पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या पुनर्बांधणीला न्याय देणार का ?
गोवा सरकारने पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचे कार्य हाती घेतले आहे. यासाठी सरकारने नागरिकांकडून अशा मंदिरांची सूची मागितली आहे आणि याविषयी निर्णय घेण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ञांची ५ सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीमध्ये पुरातत्व विभागाचे साहाय्यक अधीक्षक आर्किओलॉजिस्ट डॉ. वरद सबनीस यांचाही समावेश आहे. सांकवाळ येथील वारसा स्थळाच्या संरक्षणाकडे कानाडोळा करणारा पुरातत्व विभाग आणि त्याचे अधिकारी पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराला न्याय देण्यासाठी कितपत यशस्वी ठरणार ? असा प्रश्न मंदिराच्या भक्तांना पडला आहे.
‘करणी सेने’च्या वतीने सांकवाळ येथील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी पूजा
पणजी, १४ मे (वार्ता.) – ‘करणी सेने’च्या गोवा विभागाच्या वतीने सांकवाळ येथील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी १४ मे या दिवशी वास्तूची पूजा करण्यात आली. ‘करणी सेने’ने या वेळी ‘हिंदुत्वाच्या कार्यातील अडचणी दूर होऊ देत आणि पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या पुनर्स्थापनेच्या लढ्याला विजय मिळू दे’, अशी श्रींच्या चरणी प्रार्थना केली. चिंबल येथील हिंदुत्वनिष्ठ संतोष सिंह राजपूत यांची ‘करणी सेने’च्या गोवा विभागाच्या संघटन मंत्रीपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. यानंतर ‘करणी सेने’चे गोव्यात कार्य चालू झाले आहे. पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी केलेला उपक्रम हा ‘करणी सेने’चा गोव्यातील पहिलाच उपक्रम आहे.
हे ही वाचा –
♦ शंखवाळ (सांकवाळ) येथे पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्चसंस्थेचा कुटील डाव ! ♦ सांकवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी वारसास्थळी ख्रिस्त्यांकडून पुन्हा फेस्ताच्या आयोजनासाठी अनधिकृतपणे मंडपाची उभारणी ♦ ‘फ्रंटिस पीस ऑफ सांकवाळ’ या संरक्षित जागेतील अवैध कृत्ये रोखा ! ♦ डॉ. कालिदास वायंगणकर यांना मारहाण होऊन १२ दिवस उलटूनही पोलिसांकडून ख्रिस्ती गुन्हेगारांवर कारवाई नाही ! |