केरळच्या समुद्री परिसरात १५ सहस्र कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त
कोच्ची – भारतीय नौदल आणि ‘नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो’ (एन्.सी.बी.) यांनी संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेमध्ये भारतीय समुद्री क्षेत्रातील एका जहाजातून १५ सहस्र कोटी रुपयांचा आणि २ सहस्र ५०० किलो वजनाचा मेथामफेटामाइन नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात मेथामफेटामाइन जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रकरणी एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. एन्.सी.बी.चे उपमहासंचालक संजयकुमार सिंह यांनी सांगितले, ‘ऑपरेशन समुद्रगुप्त’च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत अफगाणिस्तानातून भारतात समुद्रमार्गे होणार्या अमली पदार्थांच्या तस्करीवर चाप बसवण्यात येत आहे. आतापर्यंत ३ सहस्र २०० किलो मेथामफेटामाइन, ५०० किलो हेरोइन आणि ५२९ किलो हशीश जप्त करण्यात आले आहे.