दुर्गावाहिनीच्या ‘दुर्गा’ या शक्तीचे रूप ! – ह.भ.प. भास्कर गिरी महाराज
नगर येथील विश्व हिंदु परिषद दुर्गावाहिनी प्रशिक्षणवर्गाचा उद्घाटन सोहळा !
नेवासा (जिल्हा नगर) – विश्व हिंदु परिषद ही सेवा, संस्कार, सुरक्षा या त्रिसूत्रीत विश्वभरात काम करत आहे. विश्व हिंदु परिषदेचे बजरंग दल आणि दुर्गावाहिनी हे २ महत्त्वाचे आयाम आहेत. बजरंग दलाचे बजरंगी हे महाबली हनुमानाचे रूप आहे, तर दुर्गावाहिनीच्या ‘दुर्गा’ या आदिशक्तीचे रूप आहेत, असे प्रतिपादन ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांनी केले. ज्ञानेश्वर माऊली यांच्या पद स्पर्शाने पवित्र झालेल्या त्रिमूर्ती स्कुल, नेवासा फाटा येथे ‘दुर्गावाहिनी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश शौर्य प्रशिक्षणवर्गा’चे उद्घाटन ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. विहिंप केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे, दुर्गावाहिनी वर्गाचे पालक विश्वनाथ नानेकर, दुर्गावाहिनी प्रांत संयोजिका सौ. अमृता नळकांडे आदींची उपस्थिती होती.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा निकाल हा संविधानाचा विजय ! – शंकर गायकर, विहिंप केंद्रीय सहमंत्री
या वेळी केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर म्हणाले की, अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी शेकडो वर्षे संघर्ष करावा लागला होता. या पावनभूमीतून ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांची कारसेवा घडली आहे. १६ घंटे उभे राहून आपले म्हणणे मांडणारे ९२ वर्षांचे अधिवक्ता पाराशरण, रामभक्त आपल्या सोबत आहे. यामुळे लवकरच भव्य श्रीराम मंदिरात जाता येणार आहे. श्रीराम मंदिराचा निकाल हा संविधानाचा विजय आहे. प्रतिदिन रामायण वाचून श्रीराम, सीता, हनुमान, लक्ष्मण, भरत यांचा त्याग आणि जीवन मूल्यांवर आपण चालले पाहिजे. धार्मिक ज्ञानासमवेत आजच्या दुर्गांनी कराटे, लाठी-काठी प्रशिक्षण घेऊन ज्ञानाचा प्रचार-प्रसार करावा.