‘दत्त’ शब्द सार्थ ठरवला ! – उदय देशपांडे
|
शेवगाव – भगवान श्री दत्तात्रेयांनी अवतारकार्यात समाजोद्धाराचे कार्य केले, तद्वतच योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे कार्यही अलौकिक आहे. त्यांच्याच दानकार्याची प्रेरणा घेऊन ‘गुरुदत्त संस्था’ ही सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रांत कार्यरत आहे. संस्थेने आपल्या कार्यातून वेगळा ठसा उमटवला आणि ‘दत्त’ हा शब्द सार्थ ठरवला, असे गौरवोद्गार नाशिक येथील ‘केशवकृपा चॅरिटेबल ट्रस्ट’चे विश्वस्त उदय देशपांडे यांनी काढले. अष्टांग योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या १०४ व्या जन्मोत्सवानिमित्त शेवगावच्या गुरुदत्त सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणार्या राज्यस्तरीय आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. देशपांडे बोलत होते.
निसर्ग वृक्षमित्र पू. (डॉ.) दीपक जोशी (वडघर, जिल्हा रायगड), दत्तभक्त अभिराज मुळे (पुणे), सामाजिक कार्यकर्ते सागर पागोरे (छत्रपती संभाजीनगर) यांना अनुक्रमे उदय देशपांडे (नाशिक), डॉ. महेंद्र गौशाल (बीड) आणि अभय आव्हाड (पाथर्डी) यांच्या हस्ते मानाच्या ‘प.पू. दादाजी वैशंपायन पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी ११ सहस्र रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, महावस्त्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
याप्रसंगी भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील रासने, अधिवक्ता विजयराव काकडे, नंदकुमार शेळके, डॉ. मृत्यूंजय गर्जे, बाळासाहेब महाराज गव्हाळ, उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक, ज्येष्ठ साधक रवींद्र पुसाळकर, सनातन संस्थेचे श्री. अतुल पवार, गुरुदत्त संस्थेचे अध्यक्ष अर्जुन फडके, सचिव फुलचंद रोकडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री. दिलीप फलके यांनी केले. ‘समर्थ ग्रुप’चे अध्यक्ष संजय फडके यांनी आभार मानले.