परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सुलभ आणि शास्त्रीय भाषेत अध्यात्माचा प्रसार जगभर केला !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मी ३० वर्षांहून अधिक वर्षांपासून ओळखतो. माझी त्यांच्याशी ज्या-ज्या वेळी भेट होते, त्या प्रत्येक वेळी त्यांच्याकडून मला अध्यात्म, व्यक्तीमत्त्व, धार्मिकता आणि आनंद यांविषयी माहिती मिळते. ते एक नामांकित डॉक्टर असल्याने इतरांप्रमाणे ते पैसा कमवू शकले असते; परंतु त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट वेगळे होते. त्यांच्यासाठी नाव, पैसा, प्रसिद्धी आदी गोष्टींना महत्त्व नाही. ‘सनातन धर्म, म्हणजेच हिंदु धर्म आणि अध्यात्म जगाला समजावून सांगणे’, हे त्यांचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी स्वत:चे जीवन समर्पित केले. अध्यात्म, वेद आणि उपनिषद यांमागील शास्त्र त्यांना चांगलेच अवगत आहे. ‘अध्यात्म, साधना, ध्यानावस्था, परमानंद आणि ईश्वरप्राप्ती हे धर्माच्या आधारे कसे साध्य करता येते ?’ हे त्यांनी वैज्ञानिक भाषेत सांगितले. सनातन संस्थेच्या माध्यमातून शेकडो ग्रंथ, ऑडिओ आणि व्हिडिओ यांद्वारे हे ज्ञान जगभर पोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांनी ‘अध्यात्मशास्त्र’ हा विषय वैज्ञानिक निकषांच्या आधारे समाजाला सहज समजेल, अशा पद्धतीने सांगितला. त्यामुळे तो बुद्धीवाद्यांसह सर्वसामान्यांनाही आकर्षित करणारा आहे. त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांमुळे गेल्या २० वर्षांहून अधिक काळात ‘सनातन संस्था’ अध्यात्मप्रसाराच्या दिशेने बरेच काही साध्य करू शकली आहे.’
– श्री. मनीष पारेख, सनदी लेखापाल, मुंबई. (२.५.२०२३)