गोवा : मुरगाव आणि सासष्टी पाठोपाठ सांगे येथेही शिधापत्रिकाधारकांना बुरशीजन्य तांदुळाचे वितरण
प्रशासनाचा भोंगळ कारभार !
पणजी, १३ मे (वार्ता.) – प्रारंभी मुरगाव तालुक्यात, नंतर सासष्टी आणि आता वाडे, कुर्डी, सांगे येथील शिधापत्रिकाधारकांना अळ्या झालेल्या बुरशीजन्य तांदुळाचे वितरण करण्यात आले आहे.
(सौजन्य : Goa 365 TV)
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वाडे, कुर्डी येथील नागरिकांनी नागरी पुरवठा अधिकार्यांच्या सांगे येथील कार्यालयात येऊन बुरशीजन्य तांदुळ अधिकार्यांच्या पटलावर ओतले. याविषयी लोकांनी स्पष्टीकरण मागितल्यानंतर यापुढे असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही अधिकार्यांनी दिली. त्यानंतर नागरिकांनी परत जाण्याचा निर्णय घेतला.
Provide quality rice through fair price shops: GFP to chief secretary https://t.co/1VRQwAugIK
— TOI Goa (@TOIGoaNews) May 12, 2023
रेशन दुकानदार, ग्राहक यांना मिळणार नवीन तांदुळसाठा
पणजी – मुरगाव आणि सासष्टी तालुक्यांतील काही स्वस्त धान्य दुकानदारांना वाटलेल्या तांदुळाच्या पोत्यात अळ्या सापडल्याने दुकानदार आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची नोंद घेऊन नागरी पुरवठा खात्याचे मंत्री, संचालक, सचिव आदींची एक बैठक घेतली. या प्रकरणाचे दायित्व असलेल्याकडून स्पष्टीकरण घ्या आणि त्याचा अहवाल सुपुर्द करा, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाचे अन्वेषण करण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी नागरी पुरवठा खाते याविषयी गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. नागरी पुरवठा खात्याने सडलेला तांदुळ परत करून त्याऐवजी नवीन तांदुळ आणण्यासाठी येणारा व्यय खात्याने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी तूरडाळीचे प्रकरण राज्यात गाजले होते. या प्रकरणाचे अन्वेषण दक्षता खात्याच्या वतीने करण्यात येत होते. या प्रकरणाला १० मास उलटूनही त्याचा सोक्षमोक्ष लागलेला नाही. ‘बुरशीजन्य तांदुळाच्या वितरणाच्या चौकशीचेही असेच होणार का?’, असा प्रश्न स्वस्त धान्य दुकानदारांना पडला आहे.