‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’ यांच्यामुळे ‘नागोठणे’ची ओळख संपूर्ण जगात होईल, हे आमचे भाग्य ! – किशोरशेठ जैन, संपर्कप्रमुख, शिवसेना, रायगड
नागोठणे (पनवेल) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा येथे जन्म झाला, ही आम्हा नागोठणेवासियांसाठी भाग्याची गोष्ट आहे. येथील मार्गाला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’ यांचे नाव देण्याचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये आला, तेव्हा सर्व ग्रामस्थांनी त्याला एकमताने मान्यता दिली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या स्मारकासाठी ही जागा देण्याचा निर्णय श्री. अभय वर्तक यांचे वडील कै. नाना वर्तक यांनी घेतला होता. नागोठणे गाव हे आता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या स्मारकामुळे संपूर्ण जगात ओळखले जाईल. स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी अनेक विभूती नागोठणे येथे येतील. या स्मारकामुळे केवळ नागोठणे नाही, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याचे नाव भारतासह परदेशात पोचेल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९२ मध्ये येथील ग्रामदेवता श्री जोगेश्वरीदेवीच्या मंदिरातून अध्यात्मप्रसाराला प्रारंभ केला. हे सर्व आम्ही आमचे भाग्य समजतो. भविष्यात याविषयी कोणतेही काम आमच्यासाठी पुण्याचा मार्ग आणि प्रसादच असेल.
पैसे देऊन मिळणार नाहीत, अशी माणसे मी सनातनमध्ये पाहिली !
हिंदुत्वाचा प्रसार करणार्या संघटना अनेक आहेत; मात्र त्यांना आध्यात्मिक आधार नाही. सनातन संस्थेला आध्यात्मिक आधार आहे. आध्यात्मिक आधार असेल, तरच हिंदुत्वाचा प्रसार करता येईल. पैसे देऊन मिळणार नाहीत, अशी माणसे मी सनातन संस्थेत पाहिली. मी सनातनच्या आश्रमात गेलो असता तेथील व्यवस्थापन पाहून समाधान वाटले. सुशोभिकरण महत्त्वाचे नाही, तर त्याला धार्मिक आधार असणे महत्त्वाचे आहे. सनातनच्या आश्रमात ते पहायला मिळाले, असे गौरवोद्गार श्री. किशोरशेठ जैन यांनी सनातन संस्थेविषयी काढले.
या वेळी सनातनच्या साधिका सौ. समीक्षा पाडगे यांनी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. श्री. किशोरशेठ जैन यांचा सत्कार श्री. अभय वर्तक, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांचा सत्कार सनातनचे साधक श्री. धनाजी दपके, तर उपसरपंच सौ. रंजना राऊत यांचा सत्कार सनातनच्या साधिका सौ. वर्षा रावकर यांनी केला. या वेळी माजी सरपंच मोहन नागोठणेकर, भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रोहिदास शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. ‘सनातन प्रभात’च्या ‘लँड जिहाद – राष्ट्रव्यापी षड्यंत्र’ या ‘गुरुपौर्णिमा विशेष स्मरणिके’चे प्रकाशन झाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याची माहिती देणारा व्हिडिओ दाखवला.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्गा’च्या अनावरणाचा असा झाला सोहळा !धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण, नागोठणे येथील ग्रामदेवता श्री जोगेश्वरीदेवी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि उपस्थित संतगण यांच्या चरणी वंदन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी नामफलकाचे अनावरण केले.
सनातनचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक आणि श्री. किशोरभाई जैन यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सनातनचे साधक श्री. मनीष माळी यांनी केले. आभार प्रदर्शन आणि कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप झाला. |
रायगडच्या सात्त्विक भूमीचा साधनेसाठी लाभ करून घ्यावा ! – सद्गुरु अनुराधा वाडेकर, धर्मप्रसारक, सनातन संस्था
आध्यात्मिकदृष्ट्या मुंबई आणि ठाणे येथे रज-तम अधिक आहे. त्या तुलनेत रायगड येथे सत्त्वगुण अधिक आहे. त्यामध्येही नागोठणे अधिक सात्त्विक आहे. ज्यांचा येथे जन्म झाला, जे येथे रहात आहेत, ते सर्व भाग्यवान आहेत. अध्यात्म, तसेच साधना आणि जीवनात ‘आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म’ समजून घेऊन या सात्त्विक भूमीचा साधनेसाठी लाभ करून घ्यावा.
भविष्यात नागोठणे येथे मोठे तीर्थस्थळ निर्माण होईल ! – अभय वर्तक, धर्मप्रसारक, सनातन संस्था
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे रायगड जिल्ह्याची ओळख आहे. कर्तृत्ववान व्यक्तींमुळे त्या ठिकाणाची ओळख जगभरात होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मुंबईतील प्रथितयश रुग्णालयांमध्ये वैज्ञानिक संशोधनाचे कार्य केले. विदेशामध्ये त्यांची अफाट कीर्ती होती. विविध विद्यापिठांमध्ये त्यांना मार्गदर्शनासाठी बोलावले जायचे. त्यांचे संशोधन जगभरात प्रसिद्ध होते. अशी विभूती आपल्या गावात जन्माला आली. इंग्लंडमधून आल्यानंतर ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर नागोठणे येथील श्री जोगेश्वरीदेवीच्या मंदिरात त्यांनी घेतलेल्या व्याख्यानाचा लाभ गावातील अनेकांनी घेतला आहे. त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांना ‘जगभरात कीर्ती होईल’, असा आशीर्वाद दिला. आज अनेक देशांत सनातनचे कार्य आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्म झालेल्या वास्तूमध्ये माझा जन्म झाला, हे माझे भाग्य आणि ‘या गावात आपण रहातो’, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. भविष्यात या ठिकाणी मोठे तीर्थस्थळ निर्माण होईल.
कार्यक्रमामध्ये ‘गुरुपौर्णिमा विशेष स्मरणिके’चे मान्यवरांनी केले प्रकाशन !