सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानाकडे जाणार्‍या मार्गाला त्यांचे नाव देऊन ग्रामस्थांकडून त्यांच्या धर्मकार्याचा गौरव !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्गा’ चे अनावरण

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

नागोठणे (जिल्हा रायगड), १३ मे (वार्ता.) – अखिल विश्वात सनातन धर्माचा प्रचार करणारे आणि विश्वकल्याणासाठी अविरत झटणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या नागोठणे (रायगड) येथील जन्मस्थानाकडे जाणार्‍या मार्गाचे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्ग’ असे नामकरण करून ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.


सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि मान्यवर यांच्या शुभहस्ते १२ मे या दिवशी या मार्गाच्या नामफलकाचे अनावरण झाले. शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे सहसंघटन संपर्कप्रमुख श्री. किशोरशेठ जैन, नागोठणे येथील सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच सौ. रंजना रवींद्र राऊत, सनातनच्या साधिका सौ. वर्षा रावकर यांसह सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मामे बहीण श्रीमती शकुंतला ओक, ग्रामस्थ आणि सनातनचे साधक यांनी या मंगल सोहळ्याचा लाभ घेतला. या सोहळ्याला पू. (सौ.) संगीता जाधव आणि ह.भ.प. बापू रावकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

नागोठणे येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चैतन्यमय जन्मस्थान आणि त्यासमोरील मार्ग

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा सोहळा पार पडला. १२ मे १९४२ या दिवशी (वैशाख कृष्ण सप्तमी) या दिवशी रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील ‘ब्राह्मणआळी’मधील ‘वर्तकवाडा’ या वास्तूमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्म झाला. या वास्तूकडे जाणार्‍या मार्गाचे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्ग’ असे नामकरण करण्याचा ठराव नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये एकमताने संमत करण्यात आला आहे.