सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील दैवी गुणवैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्राद्वारे केलेले विश्लेषण !
‘सनातन संस्था’ आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ यांचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे संपूर्ण मानवजातीच्या आध्यात्मिक उत्कर्षासाठी कार्यरत आहेत. त्यांची जन्मकुंडली आध्यात्मिक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुढील लेखात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील दैवी गुणवैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्राद्वारे विश्लेषण केले आहे.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना जन्मतः लाभलेल्या दैवी गुणांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण
१ अ. तत्परता आणि गुणग्राहकता : हे गुण समष्टी साधनेसाठी आवश्यक असतात.सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कुंडलीत रवि ग्रह ‘मेष’ राशीत आणि चंद्र ग्रह ‘मकर’ राशीत आहे. मेष आणि मकर या ‘चर’ (गतीमान) स्वभावाच्या राशी असून त्या ‘तत्परता’ हा गुण दर्शवतात. ‘तत्परतेने निर्णय घेणे’ आणि ‘कार्य प्रलंबित न ठेवणे’ यांमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या समष्टी कार्याची फलनिष्पत्ती पुष्कळ अधिक आहे. त्यांच्यातील ‘गुणग्राहकता’ या गुणामुळे ते केवळ साधकांकडूनच नव्हे; तर प्राणी, वनस्पती, निसर्ग, निर्जीव वस्तू आदींकडूनही शिकण्याचा प्रयत्न करतात. ते साधकांच्या लहान-लहान कृतींचे कौतुक करून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहन देतात.
१ आ. मायेची ओढ अल्प असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कुंडलीत प्रथम स्थानात ‘मिथुन’ ही वायुतत्त्वाची रास असल्याने त्यांना मायेची ओढ मुळातच अल्प होती.
१ इ. प्रगल्भ आध्यात्मिक बुद्धी : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कुंडलीत प्रथम स्थानी स्वामी बुध हा ‘गुरु’ आणि ‘शनि’ या आध्यात्मिक ग्रहांसमवेत आहे. हा योग त्यांच्यातील ‘प्रगल्भ आध्यात्मिक बुद्धी’चा द्योतक आहे. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१ इ १. अध्यात्माविषयी लिहिलेला पहिला ग्रंथ ‘अध्यात्मशास्त्र’ ! : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी वर्ष १९८७ मध्ये अध्यात्माविषयी लिहिलेला पहिला ग्रंथ ‘अध्यात्मशास्त्र’ हा असून त्यात अध्यात्माचे सार आहे. हा ग्रंथ सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी गुरुप्राप्ती होण्यापूर्वी लिहिला होता. त्या ग्रंथात पृथ्वीवर उपलब्ध नसलेल्या ज्ञानातील अनेक सूत्रे अंतर्भूत आहेत. सच्चिदानंद परब्रह्मडॉक्टरांचा हा पहिला ग्रंथ जणू सनातनच्या ग्रंथांचा मूलाधार ग्रंथ आहे. आता सनातनचे अध्यात्म, साधना, धर्म, धर्माचरण आदी विषयांवर ३५० हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
१ इ २. अध्यात्माची शिकवण प्रायोगिक स्तरावर देणे : ‘अध्यात्मात तात्त्विक ज्ञानाला केवळ २ टक्के, तर प्रत्यक्ष कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी अध्यात्माची शिकवण प्रायोगिक स्तरावर दिली. त्यामुळे सनातनचे साधक तात्त्विक ज्ञानात न अडकता कृती करण्यावर भर देतात.
१ इ ३. स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ विकसित करणे : ‘चित्तात असणारे स्वभावदोष हे ईश्वरप्राप्तीतील प्रमुख अडथळे आहेत’, हे जाणून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ विकसित केली. नामजप, सत्संग, सत्सेवा यांच्या जोडीला ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ राबवल्यास साधकाची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होते.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व दर्शवणारी अलौकिक आध्यात्मिक वैशिष्ट्ये
२ अ. मृत्यूंजय : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कुंडलीत अष्टम (मृत्यू) स्थानात ‘चंद्र’ आणि प्रथम (देह) स्थानात ‘मंगळ’ हे ग्रह आहेत. हा प्रबळ मृत्यूयोग आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर यापूर्वी अनेकदा मृत्यूयोगाचे संकट येऊनही त्यांना संतांनी केलेले साहाय्य आणि स्वतःची उच्च आध्यात्मिक स्थिती यांमुळे त्यांनी ‘महामृत्यूयोगा’वर मात केली. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू आणि सनातनचे सद्गुरु (कै.) डॉ. वसंत आठवले यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘मृत्यूंजय’ म्हटले आहे.
२ आ. ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक : ‘ईश्वरप्राप्ती करणे’ हा मनुष्यजन्माचा उद्देश आहे’, असे हिंदु धर्म सांगतो. ‘ईश्वरप्राप्ती कशी साध्य करायची ?’, हे अध्यात्मशास्त्र शिकवते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितले आहे की, शिष्याची खरी आध्यात्मिक प्रगती गुरूंच्या कृपेमुळे होते. ‘गुरुकृपा प्राप्त होण्यासाठी ‘गुरूंना काय अपेक्षित आहे ?’, हे जाणून घेऊन प्रयत्न केले, तर प्रगती निश्चित होते’, हा सिद्धांत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी मांडला; यालाच ‘गुरुकृपायोग’ म्हणतात.
गुरुकृपायोगात व्यष्टी (वैयक्तिक) साधनेसह समष्टी साधनेला (राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांना) महत्त्व असल्याने साधकाची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना करून १०.५.२०२३ पर्यंत १२४ साधक ‘संत’ झाले आणि १ सहस्र ९१ साधक संत होण्याच्या मार्गावर आहेत.
२ इ. आध्यात्मिक स्तरावरील परिवर्तन घडवून आणणारे अवतारी कार्य : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना कुणी श्रीरामाचा, तर कोणी श्रीकृष्णाचा अवतार मानतात; मात्र सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर स्वतः अवतार असल्याचे कधीच सांगत नाहीत. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कुंडलीत बाराव्या स्थानात बुध, गुरु, शनि आणि हर्षल या ग्रहांची युती आहे. बारावे स्थान ‘अध्यात्म’ आणि ‘मोक्ष’ यांचे स्थान आहे. हा योग आध्यात्मिक स्तरावरील परिवर्तन घडवण्याची क्षमता दर्शवतो. हा योग ‘अवतारत्व’ आणि ‘युगपुरुषत्व’ दर्शवतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेचा संकल्प केला आहे. ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे सत्त्वगुणी लोकांचे धर्माधिष्ठित राष्ट्र. हिंदु राष्ट्रातील लोक धर्माचरणी असल्याने त्यांना ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती साध्य होईल. केवळ अवतारी विभूतीच धर्माधिष्ठित राष्ट्र स्थापण्याचा संकल्प करू शकते !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अवतारी कार्य करण्यासाठी पृथ्वीवर अवतरित झाले आहेत’, असे महर्षींनी ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’च्या माध्यमातून सांगितले आहे.
२ इ १. संत, गुरु आणि अवतार यांच्यातील भेद : पुढीलप्रमाणे आहे.
अ. संत : संत हे समाजाला साधना शिकवतात; पण त्यांना शिष्य नसतो.
आ. गुरु : गुरु हे शिष्य घडवतात. गुरूंना १ किंवा २ शिष्य असतात. ते गुरूंचे कार्य पुढे चालू ठेवतात.
इ. अवतार : अवतार हा प्रत्यक्ष श्रीिवष्णूचा अंश असतो. अवताराचे सहस्रो शिष्य असतात. ‘धर्मसंस्थापना करणे’ हे अवताराचे मुख्य कार्य असते. अवतारांच्या कार्याचा परिणाम पृथ्वीवर सहस्रो वर्षे रहातो, तसेच त्यांच्या कार्यात सहभागी झालेल्या जिवांची आध्यात्मिक उन्नती होते.
कृतज्ञता
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करण्याची संधी मिळाली, याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. यशवंत कणगलेकर, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.३.२०२३)
नम्रता आणि आज्ञापालन करणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या जन्मकुंडलीत गुरु आणि शुक्र या शुभग्रहांचा ‘अन्योन्य योग’ (एक विशेष शुभयोग) आहे. त्यामुळे व्यक्तीमध्ये व्यष्टी स्तरावरील ‘नम्रता’ आणि ‘आज्ञापालन’ हे गुण असतात. हे गुण असलेल्या व्यक्तींचा अहं अल्प असतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे पूर्वायुष्यात प्रख्यात संमोहन-उपचारतज्ञ असूनही ‘नम्रता’ या गुणामुळे सतत शिकण्याच्या स्थितीत असत. त्यांना गुरुप्राप्ती झाल्यानंतर ‘आज्ञापालन’ या गुणामुळे त्यांनी गुरूंच्या प्रत्येक आज्ञेचे पालन केले. त्यामुळे त्यांच्यावर गुरुकृपा होऊन केवळ दीड वर्षांत त्यांनी आध्यात्मिक उन्नती साध्य केली.
सर्वांवर भरभरून प्रीती करणे
‘जननीपरी त्वां पाळिले । पित्यापरी त्वां सांभाळिले । सकळ संकटापासुनि रक्षिले । पूर्ण दिधले प्रेमसुख ।।’ – श्री व्यंकटेश स्तोत्र, श्लोक ७
अर्थ – ‘हे देवा, तुम्ही मातेप्रमाणे माझे पालन केलेत, पित्याप्रमाणे माझा सांभाळ केलात, सर्व संकटांपासून माझे रक्षण केलेत अन् माझ्यावर पूर्ण प्रेम केलेत.’
वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे अनुभव ज्याने घेतला नाही, असा साधक सनातनमध्ये सापडणार नाही. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कुंडलीत गुरु आणि शुक्र यांचा ‘अन्योन्ययोग’ आहे. हा योग ‘प्रीती’ दर्शवतो. प्रीती हा साधनेतील अंतिम टप्पा आहे. प्रत्येक प्राणीमात्रात ईश्वराचे अस्तित्व जाणवणे म्हणजे प्रीती. संत एकनाथ महाराजांना त्यांच्या घरी सेवेसाठी आलेला ‘श्रीखंड्या’ हा ‘साक्षात् श्रीकृष्ण आहे’, हे १२ वर्षांपर्यंत समजले नाही; कारण संत एकनाथांना प्रत्येक प्राणीमात्रात कृष्णच दिसत असे. तसेच आहे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे !
संशोधक आणि सूक्ष्मातील जाणणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कुंडलीत बाराव्या स्थानातील बुध आणि शनि या ग्रहांसमवेत ‘हर्षल’ हा ग्रह आहे. हा योग व्यक्तीमध्ये ‘संशोधकवृत्ती’ आणि ‘सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता’ दर्शवतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी समाजाला सूक्ष्म-जगताची ओळख करून दिली. सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींमुळे साधनेत अडथळे कसे निर्माण होतात ? हे त्यांनी दाखवून त्यावर नाविन्यपूर्ण उपायही शोधले. ‘साधकांच्या मनात येणारे अनावश्यक विचार त्यांना साधनेपासून दूर नेतात, हे जाणून ते विचार निर्माण करणारे संस्कार मुळापासून पुसले जावेत’, यासाठी त्यांनी साधकांना ‘निर्विचार’ हा नामजप करण्यास सांगितला.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |