शिवसेनेच्या निवेदनानंतर वीज आस्थापनाकडून त्वरित नोंद घेत ‘फिडर’ स्वतंत्र केला !
मिरज, १२ मे (वार्ता.) – ब्राह्मणपुरी येथील शिवनेरी फिडर येथे विजेचा ताण वाढल्याने आता स्वतंत्र ‘फिडर’ वाढवावा, अशी मागणी करूनही त्याची नोंद घेण्यात आली नाही. यामुळे ब्राह्मणपुरी परिसरात वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी या संदर्भात वीज वितरण आस्थापनाने लक्ष न घातल्यास मिरज कार्यालयात तीव्र आंदोलन करावे लागेल, असे निवेदन शिवसेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता खांडेकर यांना देण्यात आले होते. या निवेदनाची त्वरित नोंद घेत वीज वितरण आस्थापनाने स्वतंत्र ‘फिडर’ बसवून दिला आहे. (मागणी करत असूनही नोंद का घेतली नाही ? आंदोलन का करावे लागते ? – संपादक)
शिवसेना उपजिल्हाप्रमुख माधवराव गाडगीळ यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मिरज येथील ब्राह्मणपुरी, पाटील हौद, संभाजी तालीम चौक, जिलेबी चौक, मालगाव वेस येथील सर्व नागरिक वेळोवेळी देयक भरतात, तरीही नागरिकांना वारंवार खंडित वीज पुरवठ्यास सामोरे जावे लागते. यावर तात्काळ तोडगा काढावा. या वेळी श्रेयस गाडगीळ, बद्रीश कट्टी, गणेश सांगले, चेतन बिद्रे, पवन कोरे, ओंकार ढाळे उपस्थित होते.