‘एस्.टी.’चे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिदिन सरासरी उत्पन्न १ कोटी रुपये !

कोल्हापूर, १२ मे (वार्ता.)- बसप्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय आणि उन्हाळ्यातील गर्दीचा हंगाम यांमुळे वाढलेल्या प्रवाशांमुळे कोल्हापूर जिल्हा एस्.टी.चे प्रतिदिन मे मधील सरासरी उत्पन्न १ कोटी रुपये इतके आहे. ‘एस्.टी.’ प्रतिदिन सुमारे २ लाख ६० सहस्र प्रवाशांची वाहतूक करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांचा वाढता आलेख पहाता एस्.टी. ‘बी.एस्. ६’ प्रकारातील आणखी नवीन गाड्यांची मागणी केली आहे.

कोल्हापूर येथून गाणगापूर येथे जाण्यासाठी प्रतिदिन सकाळी १० वाजता एक गाडी उपलब्ध करून देण्यात आली असून कोल्हापूर-बोरीवली, कोल्हापूर-ठाणे या मार्गावर रात्री गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

बेळगावसाठी शयनयान (स्लिपर) गाडी !

कोल्हापूर येथून बेळगावला जाण्यासाठी आता शयनयान (स्लिपर) गाडी उपलब्ध आहे. ही गाडी ‘सेमी’ या प्रकारात असून खाली प्रवाशांना बसण्यासाठी आसने असून वरती झोपण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केवळ १६० रुपये इतक्या अल्प दरात ही गाडी उपलब्ध असून पहाटे ५.४५, सकाळी ६.४५ आणि दुपारी १२.३० वाजता ही गाडी प्रवाशांना जाण्यासाठी उपलब्ध आहे.

मुख्य बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी असलेले नळ तुटलेले असून तिथे अस्वच्छता असल्याचे आगारप्रमुखांच्या निदर्शनास आणून दिल्यावर लवकरच यावर आम्ही उपाययोजना काढणार आहोत, असे त्यांनी सांगितले.