गोवा : ढवळी परिसरातील अनधिकृत भंगारअड्डे त्वरित हटवा, अन्यथा रस्त्यावर उतरू !
कवळे येथील ग्रामस्थांची चेतावणी
फोंडा – ढवळी परिसरातील अनधिकृत भंगारअड्डे त्वरित हटवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, अशी चेतावणी कवळे येथील ग्रामस्थांनी कवळे पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या विशेष ग्रामसभेत दिली. सरपंच मनुजा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. या वेळी उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर आणि इतर पंचसदस्य यांची उपस्थिती होती.
(सौजन्य : Prudent Media Goa)
ढवळी येथील ‘आर्.के.’ या सर्वांत मोठ्या भंगारअड्ड्याला ५ मे या दिवशी भीषण आग लागली होती. या वेळी धुराचे लोट आणि प्रदूषण यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते, तसेच हमरस्त्यावरील वाहतूकही एक दिवस बंद ठेवण्यात आली होती. या प्रकरणी फोंडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी चालू आहे.
(सौजन्य : Goa Plus News Channel)
‘या अनधिकृत भंगारअड्ड्यामुळे मानवी जीविताला मोठा धोका असतांनाही भंगारअड्ड्याचे मालक न्यायालयात धाव घेऊन कारवाईवर तात्पुरती स्थगिती कशी घेऊ शकतात ?’, असा प्रश्न ग्रामस्थांनी ग्रामसभेत उपस्थित केला.
(सौजन्य : Prudent Media Goa)
या अनधिकृत भंगारअड्ड्याला लागलेली आग विझवण्यासाठी लाखो लिटर पाणी वापरण्यात आले आणि अग्नीशमन दल अन् पोलीस यांचाही शक्तीही पणाला लागली. लोकांच्या कराचे पैसे अनधिकृत कृत्यांना निस्तरण्यासाठी वापरले जात आहेत. या भंगारअड्ड्यांना प्रखर विरोध असल्याने कवळे पंचायतीने न्यायालयात प्रखरपणे बाजू मांडण्याची मागणी नागरिकांनी केली.