सिंधुदुर्ग : ‘एनर्जी ड्रिंक्स’च्या नावाखाली नशा आणणारी शीतपेये बाजारपेठेत उपलब्ध

अशा पेयांवर बंदी आणण्याची डॉ. जयेंद्र परुळेकर यांची अन्न भेसळ खात्याकडे मागणी !  

‘एनर्जी ड्रिंक्स’च्या नावाखाली नशा आणणारी शीतपेये

सावंतवाडी – ‘एनर्जी ड्रिंक्स’च्या (शरिरात स्फूर्ती निर्माण करणार्‍या शीतपेयाच्या) नावाखाली ‘कॅफेन’चे घटक असलेली थंड पेये बाजारात आली आहेत. १० ते २० रुपयांत ही पेये मिळत आहेत. सौम्य प्रकारची नशा होत असल्याने अनेकजण याच्या आहारी जात आहेत. हे पेय प्यायल्यानंतर ताजेतवाने, तसेच नशा आल्यासारखी वाटते. अशा प्रकारचे ‘कॅफेन’ असलेले पेय धोकादायक आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून अशी पेय विक्री केली जात असतील, तर त्यावर बंदी आणावी, अशी मागणी अन्न भेसळ खात्याकडे करण्यात येणार असल्याचे येथील बालरोगतज्ञ डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले.

याविषयी माहिती देतांना डॉ. परुळेकर यांनी सांगितले की,

१. सहज आणि अल्प मूल्यात ही पेये मिळत आहेत. विद्यार्थीही रात्री झोप येऊ नये; म्हणून याचा आधार घेत आहेत. वाहनचालक, कामगार, मुले मोठ्या प्रमाणात याचे सेवन करत आहेत.

२. ‘२५० मि.ली.च्या बाटलीत ७५ मि.ली. ग्रॅमहून अधिक ‘कॅफेन’ घेऊ नये’, अशी नोंदही बाटलीवर आहे. लहान मुले, गरोदर माता, स्तनपान करणार्‍या माता यांना धोकादायक असल्याची नोंद त्यावर आहे.

३. बाटल्यांत प्रत्येक १०० मि.ली.ला २९ मि.ली ग्रॅम ‘कॅफेन’ असल्याची नोंद आहे. या बाटल्या थेट २५० मि.ली.च्या आहेत. दिवसभरात ५०० मि.ली.पेक्षा अधिक घेऊ नये, असेही लिहिण्यात आले आहे.

४. ही पेये सहज उपलब्ध होत आहेत. ‘कॅफेन’ हे १०० मि.ली.पेक्षा अधिक प्रमाणात शरिरात गेल्यास अधिक नशा येते. मेंदू, किडनी, मज्जारज्जू निकामी होतो. गरोदर आणि स्तनपान करणार्‍या मातांनी हे पेय घेतल्यास बाळाला अपंगत्व किंवा मानसिक विकलांगता येऊ शकते.