इम्रान खान यांना सर्व प्रकरणांत जामीन
१७ मे पर्यंत अटक न करण्याचा आदेश
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अटींसह २ आठवड्यांसाठी जामीन संमत केला. त्यांच्यावर अल् कादीर ट्रस्टमध्ये घोटाळा केल्याचा आरोप होता. इम्रान खान न्यायालयात आल्यावर त्यांच्या अटकेसाठी पंजाब पोलीस आणि निमलष्करी दल यांची पथके न्यायालयाबाहेर उपस्थित होती. या संदर्भात एका पत्रकाराशी दूरभाषद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करतांना इम्रान खान यांनी धमकी दिली की, आता माझ्यावर अटकेची कारवाई झाली, तर गदारोळ होईल आणि या गदारोळासाठी मला उत्तरदायी धरू नका.
१. अल कादीर ट्रस्ट घोटाळ्यातील इम्रान यांना झालेली अटक अवैध ठरवत सर्वाेच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली आहे.
२. खान यांच्या तोशाखाना प्रकरणातही इस्लामाबाद उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.
३. इम्रान खान यांच्या सुटकेनंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी त्यांची पोलीस लाइनच्या गेस्ट हाऊसमध्ये भेट घेतली. राष्ट्रपती अल्वी यांनी खान यांना अटक केल्यानंतर देशात पसरलेल्या हिंसाचाराविषयी सांगितले. गिलगिट बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री खालिद खुर्शीद यांनीही इम्रान खान यांची २ घंटे भेट घेतली.