प्ले स्कूल, प्री प्रायमरी, केजी आणि नर्सरी शाळांसाठी आता लागणार शिक्षण विभागाची अनुमती !
शिक्षण विभागाचे नियंत्रणही येणार !
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील प्ले स्कूल, प्री प्रायमरी, केजी आणि नर्सरी शाळा यांविषयी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहर आणि गावात असणार्या या शाळांवर आतापर्यंत कुणाचेही नियंत्रण नव्हते; परंतु आता अशा शाळांची मनमानी संपणार आहे; कारण यापुढे अशा शाळा चालू करतांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण विभागाची अनुमती आवश्यक असणार आहे, तसेच या शाळांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण असणार आहे. यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांची बैठक झाली असून त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत प्ले स्कूल, प्री प्रायमरी, केजी आणि नर्सरी या शाळांचे प्रमाण वाढले आहे. एवढेच नाही, तर गल्लीबोळात अशा शाळा चालू करत असल्याचे चित्र पहायला मिळते. विशेष म्हणजे अशा शाळांवर आतापर्यंत शिक्षण विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार पहायला मिळत असे. शाळांच्या नावाखाली अवाजवी शुल्क घेणे, मनमानी पद्धतीने शाळा चालवणे, शुल्क निर्धारित न ठेवणे या सर्व गोष्टींवर कुणाचेही नियंत्रण नव्हते. अशात शिक्षण विभागाने अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे.