‘होती ऐसी नाही झाली मुक्ताबाई !’
कोटी कोटी प्रणाम !
१४ मे २०२३ या दिवशी संत मुक्ताबाई पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
‘वैशाख कृष्ण १० या दिवशी प्रसिद्ध संत ज्ञानदेव यांची बहीण मुक्ताबाई हिने मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथे समाधी घेतली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरादी ४ भावंडांमध्ये संत मुक्ताबाई स्वतःच्या वैशिष्ट्याने प्रसिद्ध आहेत. १ सहस्र ४०० वर्षे जिवंत राहून गर्व करणार्या योगेश्वर चांगदेवांच्या त्या गुरु होत्या.
‘‘चवदाशे वर्षे शरीर केले जतन ।
नाही अज्ञानपण गेलें माझे ।। १ ।।
अहंकारे माझे बुडविले घर ।
झालो सेवाचोर स्वामीसंगे ।। २ ।।
अभिमाने आलो अलंकापुरी ।
अज्ञान केले दूरी मुक्ताबाईने ।। ३ ।।’’
अशी चांगदेवांची कबुली आहे.
समाजाकडून होणार्या छळाला कंटाळून संत ज्ञानेश्वर खिन्न झाले आणि खोलीत बसून त्यांनी दार (ताटी) लावून घेतले. तेव्हा ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणून मुक्ताबाईने म्हटलेले ‘ताटीचे अभंग’ प्रसिद्ध आहेत. आपले अवतारत्व संपवून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव समाधीस्थ झाले होते. यानंतर ‘आता हे शरीर रक्षू नये’, असे विचार संत मुक्ताबाई यांच्या मनात येऊ लागले.
वैशाख मास असल्यामुळे ऊन रखरखीत होते. तापी नदीच्या तीरावर वैष्णवांचा मोठा समुदाय जमला होता. मुक्ताईनगरहून २ मैलांवर (३ कि.मी.) असणार्या माणेगांव येथे एकांतात संत निवृत्तीने गंगाधारेजवळ मुक्ताबाईला तिच्या ब्रह्मभावाचे स्मरण दिले. ‘‘अंतरबाहेर स्वामींचे स्वरूप । स्वये नंदादीप उजळीला ।’, असे म्हणून स्वरूपाकार स्थितीत आकाश गर्जून विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि मुक्ताबाई सहजस्वरूपी मिळून गेली. तो दिवस वैशाख कृष्ण दशमी हा होय. संत मुक्ताबाई एकाएकी गुप्त झाल्या. जेथून संत मुक्ताबाई गुप्त झाल्या, तेथून २ मैलांवर त्यांचे मदिर बांधले आहे.’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))