जन्मोत्सव सोहळ्यापूर्वीच साधकाने सूक्ष्मातून अनुभवलेला वर्ष २०२३ मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सवाचा सोहळा !
१. साधकांचे अहोभाग्य असलेला आणि ‘न भूतो न भविष्यति ।’, असा होणार परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव !
माझ्या मनाला ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि त्यांचे साधक यांच्या भावभेटीचा सोहळा कसा असेल ?’, ‘भगवंत आणि भक्त यांची भेट कशी असेल ?’, याची पुष्कळ ओढ लागली आहे. या विचारांत असतांना श्री गुरूंनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सूक्ष्मातून मला काही दृश्ये दाखवली. ती दृश्ये पाहून मला वाटले, ‘भगवंताने प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) ८१ व्या जन्मोत्सवाचा सोहळा ‘न भूतो न भविष्यति ।’, असा करायचा योजले आहे. सनातन संस्थेच्या इतिहासामध्ये असा सोहळा ‘पूर्वी कधी झाला नाही आणि पुढे कधी होईल’, हे ठाऊक नाही. जे साधक या सोहळ्याला उपस्थित रहातील, त्यांचे अहोभाग्य फळाला येईल. ज्या साधकांना काही कारणाने येता येणार नाही, त्यांनी भगवंताच्या चरणी आर्ततेने प्रार्थना केली, तरी ते जिथे आहेत, तिथेही भगवंत त्यांना वैकुंठाचे दर्शन घडवील.’
२. ज्याप्रमाणे द्वारकेला जातांना सुदामा केवळ श्रीकृष्णाच्या विचारात गुंगून गेला, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव सोहळ्याला येतांना साधकांच्या मनात क्षणोक्षणी केवळ त्यांच्या दर्शनाचा विचार असेल !
ज्याप्रमाणे अनेक वर्षे श्रीकृष्णाची वाट पहात असलेला सुदामा आणि अनेक वर्षे सुदाम्याची वाट पहात असणारा श्रीकृष्ण यांची भेट भारावून टाकणारी होती, तशीच गुरुदेवांची साधकांशी होणारी भेट अवर्णनीय असेल. सुदामा भगवंताच्या भेटीसाठी आतूरलेला होता. त्याच्या मनामध्ये केवळ एकच विचार होता, ‘कृष्ण आपल्याला भेटेल का ? तो कसा असेल ? त्याच्या भेटीसाठी कितीही खडतर प्रवास करावा लागला, तरी आपण भगवंताच्या चरणांपाशी जाऊया. आपल्या सख्याला एकदा तरी मन भरून पाहूया. तो आपल्याला ओळखेल कि नाही ? तो कसा दिसत असेल ? त्याची द्वारका नगरी कशी असेल ? अशा विचारांत सुदामा गुंग झाला होता. अशा प्रकारे भगवंतांनी त्याचा द्वारकेपर्यंतचा प्रवास श्रीकृष्णमय करून घेतला. त्याचप्रमाणे गुरुदेवांच्या ८१ व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी येतांना साधकांच्या मनातही केवळ गुरुदेवांविषयीचे विचार असतील, ‘आपल्या गुरुदेवांना, आपल्या भगवंताला (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) एकदा तरी भेटूया !’
३. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना ‘कृष्ण-सुदामा यांची भावविभोर करणारी अनुपमेय भेट अनुभवण्यास देणार आहेत’, असे वाटणे
द्वारका नगरीमध्ये पोचल्यावर सुदाम्याची श्रीकृष्णाशी अनुपमेय अशी भावभेट होते. एकमेकांना पहाताच दोघेही भावविभोर होऊन एकमेकांना आलिंगन देतात. त्या वेळी श्रीकृष्णाला ‘सुदाम्याला कुठे ठेवू आणि कुठे नको’, असे झाले, तर सुदाम्याला ‘श्रीकृष्णाला अंतरात किती अन् कसे साठवू’, असे झाले. सर्व देवताही भगवंत आणि भक्त यांची ही भावभेट विस्मयाने पहातच राहिले. त्यांनी भगवंत आणि भक्त यांच्यावर पुष्पवृष्टी केली. ‘गुरुदेवही साधकांना ‘याची देही, याची डोळा’, अशी भावभेट अनुभवण्यास देणार आहेत’, असे मला वाटले.
४. सुदाम्याकडे असलेले मूठभर पोहे त्याने श्रीकृष्णाला देण्यासाठी समवेत घेणे, त्याचप्रमाणे साधकही त्यांच्या मनात गुरुदेवांप्रती असलेली भावभक्ती गुरुचरणी अर्पण करण्यासाठी आणतील आणि कृष्णाप्रमाणेच गुरुदेव ती आनंदाने स्वीकारतील !
सुदाम्याने ‘भगवंतासाठी काय घेऊन जाऊ ?’, असा विचार केला; पण सुदाम्याकडे काहीच नव्हते. तो त्याच्याकडे जे मूठभर पोहे होते, ते घेऊन भगवंताकडे गेला. त्याचप्रमाणे सर्व साधक त्यांनी जी काही अल्प-स्वल्प साधना केली आहे, त्यांच्या मनामध्ये जी काही भावभक्ती आणि प्रेम आहे, ते सर्व घेऊन गुरुदेवांच्या भेटीला येणार आहेत. कृष्णाचे वैभव पाहून ‘मी आणलेले मूठभर पोहे देवाला कसे द्यावे ?’, या विचाराने सुदम्याची स्थिती केविलवाणी होते. तोच भाव श्री गुरूंना भेटतांना साधक अनुभवतील; परंतु श्रीकृष्णाने सुदाम्याचे पोहे मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने खाऊन त्याला भरपूर धनदौलत इत्यादी सर्वकाही देऊन त्याचा प्रेमाने सन्मान केला. त्याचप्रमाणे गुरुदेव सर्व साधकांना आयुष्यभर पुरेल इतका आनंद देणार आहेत. साधक गुरुदेवांना पहातील, तेव्हा त्यांच्याही मनामध्ये संकोच असेल. भगवंताची दिव्यता अनुभवल्यावर साधकांनाही ‘माझ्याकडे काहीच (भावभक्ती) नाही’, असे वाटून ते सुदाम्याप्रमाणेच केविलवाणे होतील; मात्र गुरुदेव पुष्कळ आनंदाने साधकांच्या भावभक्तीचा स्वीकार करतील आणि साधकांना भरभरून आनंद देतील. ते पाहून देवतांनाही साधकांचा हेवा वाटेल.
५. साधकांना सतत आनंद देणारे एकमेवाद्वितीय महान आणि अलौकिक गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले !
आम्हा साधकांचे इतके भाग्य आहे की, गुरुदेवांसारखे महान गुरु आमच्या जीवनामध्ये आले आहेत. साधकांच्या सर्व जन्मांचा पुण्यसंचय एकत्र केला, तरीही तो श्री गुरूंनी साधकांना दिलेल्या आनंदाएवढा होणार नाही; परंतु आपले गुरु इतके थोर आहेत की, त्यांनी साधकांना तो आनंद देऊ केला आहे.
६. प्रार्थना
‘हे गुरुदेव, साधकांच्या मनातील भावभक्ती आणि आपली साधकांवरील प्रीती अन् कृपा मला अखंड अनुभवता येऊ दे. भगवंत आणि भक्त यांच्या भेटीतील भावाचे उत्कट क्षण माझ्या अंतरात कायमचे साठवले जाऊ देत. गुरुराया, तुमच्या प्रत्यक्ष सेवेत असलेल्या साधकांच्या अंतरातील भाव आणि तुम्ही त्यांच्याकडे पहातांना तुमच्या दृष्टीतील प्रीती, वात्सल्य आणि कृपा मला अनुभवता येऊन ते क्षण माझ्या अंतरात कायमचे कोरले जाऊ देत’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे !’
– श्री. प्रतीक जाधव, फाेंडा, गोवा. (६.५.२०२३)
|