देशात हिंदूंखेरीज कुणालाही पंतप्रधान, मुख्यमंत्री आदी होता येणार नाही, अशी घटनेत दुरुस्ती करू ! – डॉ. प्रवीण तोगडिया
नर्मदापूरम् (मध्यप्रदेश) – भारताचे सरकार हिंदूंच्या हाती येईल, याची काळजी घेतली जाईल. देशात हिंदूंखेरीज कुणालाही पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, न्यायाधीश होता येणार नाही, अशी घटनेत दुरुस्ती करून घेऊ. हे सर्व शक्य आहे, असे विधान ‘आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदे’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी येथे केले. ‘हिंदू साथी’ संमेलनात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
मुसलमानांची संख्या वाढू देणार नाही !
डॉ. प्रवीण तोगडिया पुढे म्हणाले की, आम्ही भारतात मुसलमानांची लोकसंख्या वाढू देणार नाही. २ पेक्षा अधिक मुलांना जन्म देणार्या मुसलमानांना सरकारी नोकर्या, सरकारी शिधा, सरकारी शाळा आणि रुग्णालयांमधील विनामूल्य सुविधा, तसेच बँकांचे कर्ज आदी काहीच मिळणार नाही. त्यानंतरही त्यांनी मुलांना जन्म घातला, तर त्यांना १० वर्षांसाठी कारागृहात डांबण्याचा कठोर कायदा केला जाईल.
हिंदूंच्या प्रबोधनासाठी देशभरात १ लाख केंद्रे उभारणार !
आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी हिंदूंसाठी समृद्धी सेवा सन्मान, सहयोग संस्कार यांची व्यवस्था भारतात २४ घंटे उपलब्ध करून दिली जाईल. आमच्या खाजगी कॉल सेंटरला संपर्क केल्यानंतर सर्व गरजूंना त्वरित साहाय्य केले जाईल. रामजन्मभूमीसाठी आम्ही यशस्वी आंदोलन केले. आता आम्ही हिंदूंच्या प्रबोधनाच्या दुसर्या टप्प्यासाठी काम करत आहोत. यासाठी देशभरात १ लाख केंद्रे बांधली जात आहेत. त्यात १ कोटी हिंदु सहभागी होतील. हनुमान चालिसाच्या माध्यमातून या प्रकरणी सर्वांना जोडण्यात येईल. या केंद्रांच्या मदतीने गरीब हिंदु कुटुंबांना विनामूल्य आरोग्य, शिक्षण आणि कायदेशीर साहाय्य केले जाईल.