महानुभाव पंथाचे मी आणि सर्व साधक सनातन हिंदु धर्मासाठी साहाय्य करण्यास कटीबद्ध आहोत ! – सुदर्शन महाराज कपाटे, महानुभाव पंथ
छ. संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समितीचे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले !
छ. संभाजीनगर, १२ मे (वार्ता.) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी नाही, तर हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेसाठी प्रत्येकाने सहभागी होणे, हे आपले कर्तव्यच आहे. आज जे या अधिवेशनातून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे, तेच ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातूनही पोचवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातूनच या अधिवेशनाचे महत्त्व लक्षात येते. इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी अन्य देवतांच्या प्रतिमा किंवा अन्य प्रतिमा ठेवलेल्या दिसतात; परंतु या अधिवेशनात सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाची प्रतिमा दिसत आहे आणि ती तशी का आहे ? हे आपण लक्षात घ्यायला हवे. देवतांच्या हातातील शस्त्रे ही अलंकार म्हणून नाहीत, तर ते कशाचे प्रतीक आहे ? हे आपण आपल्या मुलांना सांगायला हवे. आज प्रत्येकाने ‘मी प्रत्येक सप्ताहात ५ जणांना हिंदु राष्ट्राविषयी सांगेन’, असे ध्येय घ्यायला हवे. महानुभाव पंथाचे केवळ मीच नाही, तर सर्व साधक सनातन हिंदु धर्मासाठी साहाय्य करण्यास कटीबद्ध आहोत, असा मी या अधिवेशन प्रसंगी शब्द देतो, असे मार्गदर्शन महानुभाव पंथाचे सुदर्शन महाराज कपाटे यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे नुकत्याच झालेल्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन महानुभाव पंथाचे सुदर्शन महाराज कपाटे, सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हेही उपस्थित होते. या अधिवेशनात वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. शेवटी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. अधिवेशनास छ. संभाजीनगर, जालना आणि अंबड क्षेत्रांतील अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.
सन्मान आणि सत्कार
सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सन्मान अंबड येथील उद्योजक श्री. भाई जमदारे यांनी केला. पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांचा सत्कार समितीचे श्री. अतुल देवकर यांनी,
सुदर्शन महाराज कपाटे यांचा सत्कार श्री. प्रकाश कुलकर्णी यांनी, तर श्री. सुनील घनवट यांचा सत्कार गंगापूर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आकाश शहाणे यांनी केला.
मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन
मंदिरांना उपासना केंद्र बनवणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव
आज मंदिरांवरील आक्रमणे, देवनिधीचा गैरवापर, मंदिरातील मूर्तीभंजन आणि होणार्या चोर्या या सर्व प्रकारांत प्रचंड वाढ झालेली दिसते आणि त्यामुळे ‘मंदिरे वाचवा-धर्म वाचवा’, असे हिंदूंना सांगायची वेळ आलेली आहे. यासाठी राष्ट्रीय मंदिर आणि संस्कृतीच्या उपक्रमाच्या अंतर्गत मंदिरांचे सरकारीकरण होऊ न देणे, मंदिर-मठ विश्वस्त आणि पुरोहित यांच्यासाठी अधिवेशनाच्या माध्यमातून संघटन करणे, मंदिरांतील भ्रष्टाचार आणि अन्य समस्या यांवर उपाययोजना अन् मार्गदर्शन इत्यादी प्रयत्न केले जात आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात यशही मिळत आहे. मंदिर विश्वस्त आणि पुरोहित यांचे संघटन करणे, मंदिरांना उपासना केंद्र बनवणे यांसाठी व्यापक प्रयत्न होणे आवश्यक आहे.
देवनिधीच्या गैरवापराला प्रतिबंध होण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेने दिलेल्या लढ्याविषयी अनुभव कथन !
देवनिधीचा वापर हा योग्य पद्धतीनेच होण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेने कसा प्रयत्न केला ? आणि करत आहे ? याविषयी पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी स्वत:चे मार्गदर्शनपर अनुभव उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना सांगितले.
आज लँड जिहादच्या माध्यमातून छ. संभाजीनगर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात होणारे अतिक्रमण थांबवणे आवश्यक ! – बाबूलाल राठोड, सुदर्शन चॅनेल, वार्ताहर
मागील काही वर्षांपासून छ. संभाजीनगर आणि परिसरातील मंदिराच्या भूमीवर अन्य धर्मीय अनधिकृतरीत्या कब्जा करण्याच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे, त्याविषयी वेळोवेळी प्रशासन आणि समाजा पर्यन्त सत्यता पोहोचवण्याचा माझ्याकडून प्रयत्न झाला आहे. परंतु हिंदुनी आता संघटित आणि सतर्क राहून आपल्या आणि देवस्थानच्या भूमी वाचवण्यासाठी प्रयत्न वाढवायला हवेत, असे आवाहन सुदर्शन न्यूज चॅनेलचे पत्रकार श्री. बाबूलाल राठोड यांनी उपस्थितांना आपले अनुभव सांगताना केले.
देशातील हिंदु स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वाच्या विचाराचा होईल तेव्हाच भारतात खर्या अर्थाने हिंदु राष्ट्र येईल ! – सुरडकर, स्वा. सावरकर प्रतिष्ठान
आज हिंदूंच्या घरात स्वरक्षणासाठी साधी काठीसुद्धा असत नाही, अशा स्थितीत हिंदूंना सध्याची गंभीर स्थिती आणि सावरकर विचार यांचा अभ्यास करून ते घराघरात पोचवणे आवश्यक आहे आणि जेव्हा देशातील हिंदु स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वाच्या विचाराचा होईल त्यादिवशी भारत देश खर्या अर्थाने हिंदु राष्ट्र होईल, असे विचार स्वा. सावरकर प्रतिष्ठानचे श्री. सुरडकर यांनी व्यक्त केले
व्यापक जनजागरण आणि वक्फ कायदा रहित करण्याची मागणी करणेच आवश्यक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
वर्ष १९२५ मध्ये ब्रिटिश सरकारने मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी ‘वक्फ कायदा’ अस्तित्वात आणला होता; स्वातंत्र्यानंतरही मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या काँग्रेस सरकारने वक्फ कायद्यात वेळोवेळी सुधारणा करत ‘वक्फ बोर्डा’ला पाशवी अधिकार दिले. वर्ष १९९५ आणि वर्ष २०१३ मध्ये काँग्रेस सरकारने या कायद्यात केवळ मुसलमानच नव्हे, तर हिंदु, शीख, बौद्ध, ख्रिस्ती अशा सर्व धर्मीयांची कोणतीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचे अत्यंत भयानक अधिकार वक्फ बोर्डाला दिले. या कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ केला जात आहे. भारत सरकारच्या ‘भारतीय सेने’कडे सर्वाधिक १८ लाख एकर, ‘भारतीय रेल्वे’कडे १२ लाख एकर भूमी आहे. या दोघांच्या नंतर देशभरात तिसरी सर्वांत मोठी संपत्ती वक्फ बोर्डाकडे आहे. वर्तमानात वक्फ बोर्डाकडे ८ लाख एकरहून अधिक भूमीची मालकी आहे. हे असेच चालू राहिले, तर काही वर्षांत भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाची झालेली असेल आणि पुन्हा एकदा एक मोठा भूभाग गिळंकृत करून भारताच्या पोटात नवा पाकिस्तान निर्माण होईल.
यासाठी व्यापक जनजागरण आणि वक्फ कायदा रहित करण्याची मागणी करणेच आवश्यक असल्याचे समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.
हिंदु राष्ट्र आणण्यासाठीचे प्रयत्न करणे आवश्यक, त्याला काही पर्याय नाही ! – सुभाष मोकरिया, राष्ट्रीय बजरंग दल, देवगिरी प्रांत अध्यक्ष
राष्ट्रीय बजरंग दलाचे देवगिरी प्रांत अध्यक्ष श्री. सुभाष मोकरिया यांनी हिंदु राष्ट्र आणण्यासाठीचे प्रयत्न करायलाच हवेत, त्याला काही पर्याय नाही आणि त्यासाठी हिंदु संघटनांचे एकत्रीकरण होत रहाणे आवश्यक आहे. अशा प्रकारची अधिवेशने होत राहिली पाहिजेत. त्यातून संघटन होत राहिले पाहिजे, असा विचार व्यक्त केला.
गटचर्चा : समितीचे नांदेड समन्वयक श्री. वैभव आफळे यांनी ‘ग्रामरक्षक दल स्थापन करण्याची आवश्यकता’ याविषयी उपस्थितांना माहिती दिली होती. त्यानुसार ग्रामीण क्षेत्रात अशा प्रकारचे प्रयत्न करण्याचे आणि शहरी क्षेत्रात हिंदु राष्ट्र जागृती बैठकांचे आयोजन, युवकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले.
क्षणचित्रे
१. शंखनाद आणि वेदमंत्र पठणाने अधिवेशनास प्रारंभ झाला.
२. अशा प्रकारचे अधिवेशन आणि उपाययोजनेच्या नियोजनासह मार्गदर्शन सतत मिळत रहायला हवे, असे मत हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केले.
३. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने अधिवेशनाची सांगता करण्यात आली.
उपस्थितांचे मनोगत
१. श्री. आनंद सोमय्या, श्रीकृष्ण गुरुकुल – एकदम सुटसुटीतपणे मार्गदर्शन आणि पुढे दिशा काय असायला पाहिजे ? याचे उत्तम मंथन झाले. यापुढे पूर्ण कार्यात सहभाग असेल.
२. अधिवक्त्या (कु.) आरती कुलकर्णी – सर्व तरुण पिढीला आव्हान करते की, २०२५ पर्यंत हिंदु राष्ट्र येणारच आहे. आपण याकार्यात सहभाग घेतला पाहिजे.
३. श्री. ब्रिजमोहन टेटवार – हिंदूंनी फक्त आणि फक्त हिंदु व्यापार्यांकडूनच खरेदी केले पाहिजे आणि हिंदूंनी व्यवसाय करतांना पुढे आले पाहिजे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्राविषयी समाजातील लोकांचे प्रबोधन करीन’, असे ध्येय ठेवून त्यासाठी कृतीशील व्हा ! |