कुकर्मांची फळे !
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे या दिवशी भूमीच्या आरोपावरून अटक करण्यात आली. त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय) या पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक यांनी ठिकठिकाणच्या शहरांमध्ये हिंसक आंदोलन चालू केले. जाळपोळ, तोडफोड, वरिष्ठ अधिकार्यांच्या निवासस्थानात घुसणे, गोळीबार, असे अनेक प्रकार या वेळी घडले. पाकिस्तानी सैन्यालाही या सर्वांचा सामना करावा लागला. संपूर्ण पाकिस्तान यात होरपळला गेला. या हिंसाचारामध्ये ५ अधिकारी घायाळ झाले असून ४३ आंदोलकांना कह्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खान यांच्या पक्षाचे १ सहस्र ९०० नेते आणि कार्यकर्ते यांना अटक केली. एकूणच काय, तर गेल्या काही वर्षांपासूनच पाकिस्तानात अस्थिरता आणि अराजक आहेच; पण त्याची तीव्रता अल्पअधिक अशी होती. केवळ या वेळी तेथे सैन्याला मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे नागरिकांचा सैन्यविरोधी संघर्ष प्रामुख्याने समोर आला.
इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हायचे नव्हते. त्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्नही केला होता; परंतु पाकचा आजवरचा इतिहास पाहिला, तर तेथील एकही पंतप्रधान ५ वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे त्यातून इम्रान खान तरी कसे वाचतील ? आतापर्यंत सैन्याचा आदेश न मानणार्या सर्वाधिक पंतप्रधानांच्या हकालपट्टीचा विक्रम पाकच्या नावावर आहे. शेवटी खान यांनाही पंतप्रधानपद सोडावेच लागले. वर्ष १९४७ पासून पाकमध्ये ३० पंतप्रधान झाले, तर भारतात या काळात १८ पंतप्रधानांनी स्वत:चा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत भारताचे नेतृत्व केले. यातूनच पाकमधील दुःस्थितीची कल्पना येते. थोडक्यात काय, जरी पाक स्वतंत्र झाला असला, तरी भारतापासून वेगळे झाल्यापासून तेथील अस्थिरता दिवसेंदिवस वाढत गेली, हेच खरे ! इम्रान खान पंतप्रधान असतांना त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारागृहात टाकले. पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते नवाझ शरीफ यांनाही कारागृहात पाठवले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी हिंसाचाराची चेतावणी दिली. त्यानंतर मात्र इम्रान खान काहीसे बावचळले; पण त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे प्रसिद्धी आणि प्रसारमाध्यमे यांनी ‘पाकने आतापर्यंत इतका दायित्वशून्य पंतप्रधान कधीच पाहिला नाही’, असे म्हटले होते. त्यांना ‘बुजगावणे नेतृत्व’ असेही म्हटले जायचे. आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई न केल्यास काळ्या सूचीत टाकण्याची धमकी ‘एफ्.ए.टी.एफ्.’ या संस्थेनेही पाकला दिली होती. ही सर्व उदाहरणे पाकमधील अस्थिरता दर्शवणारीच आहेत.
भारताने चीनकडून शिकावे !
मध्यंतरी पाकने त्याच्या प्रांतात धरण बांधण्यासाठी चीनकडून ३२ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. याही आधी पाकने चीनकडून २ लाख २२ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते; परंतु दिवसेंदिवस वाढती महागाई आणि अस्थिरता पहाता त्याला ते कर्ज काही फेडता येईना. शेवटी चीनने त्या बदल्यात त्याला ५ वर्षे २ लाख ५ सहस्र कोटी रुपये वार्षिक हप्ता देण्यास सांगितले. ‘तोही कितपत देता येईल ?’, हा प्रश्नच आहे. आणखी किती काळ कर्ज काढून पाकिस्तान जिवंत रहाणार आहे ? मध्यंतरी पाकने चीनच्या ९ अभियंत्यांची हत्या केली असल्याने चीनही त्याच्यावर नाराज आहे. कर्ज तर घ्यायचेच आणि पुन्हा त्याच्या अभियंत्यांची हत्याही करायची हा पाकचा उद्दामपणा कधी संपणार ? ‘साहाय्य करणार्यांविषयी पाकला कसलेही देणेघेणेच नाही’, असेच म्हणता येईल. अर्थात् पाकपेक्षा चीन प्रचंड धूर्त असल्याने त्याने पाकला एकप्रकारे कोंडीतच पकडलेले आहे. सर्वच बाजूंनी तो पुरता अडकलेला आहे. पाकला अशा प्रकारे नष्ट करण्याचा चीनचा कावेबाज प्रयत्नच म्हणावा लागेल. अशी भूमिका भारताला कधीच का घेता येत नाही ? आतापर्यंत भारतद्वेषावरच पाकिस्तान पोसला गेला आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला, तरी त्याने भारतद्वेष अजूनही सोडलेला नाही. पायांखालची वाळू सरकत चालली आहे; पण भारतद्वेषाचा हेका मात्र तसाच आहे. काश्मीरचे सूत्र उपस्थित झाले की, पाकिस्तान सर्व शक्तीनिशी पूर्ण एकवटतो आणि पुन्हा विरोध करू लागतो.
पाकची २ शकले होणार का ?
पाकने आतापर्यंत केलेल्या कुकर्मांची फळे तो भोगत आहे. आतापर्यंत ‘पाकने आतंकवादाला कसे पोसले ?’, ‘भारतद्वेषाचे मूळ कसे खोलवर रुजलेले आहे ?’, पाकिस्तानचे मनसुबे काय आहेत ?’, हे जागतिक स्तरावर समजले असल्याने चीन, अमेरिका, इराण, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया आदी सर्वच राष्ट्रे आता त्याच्याशी फटकून वागत आहेत. देशांतर्गत तर तेथील प्रांताप्रांतांमध्ये बंडखोरी, गृहयुद्ध चालूच आहे.
पाकमधील नागरिकांच्या प्रतिदिनच्या जेवणाचीही सोय होत नाही. महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल, भाज्या, जीवनावश्यक वस्तू यांचे मूल्य पुष्कळ वाढले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे यातून मार्ग काढणे पाकसाठी जिकिरीचे ठरत आहे. ‘संकटांच्या गर्तेत अडकलेल्या पाकचे पुढे काय होणार ? पाकची २ शकले होणार का ?’, या प्रश्नांची उत्तरे भविष्यातच उलगडतील. पाकने आतापर्यंत इस्लामी सत्तेची महत्त्वाकांक्षा बाळगली होती. त्या ईर्ष्येपोटी तो इस्लामिक राष्ट्रासाठी प्रयत्नरत राहिला; पण हाती काहीच आले नाही, ना सत्ता, ना स्वातंत्र्य ! पाक यातून बाहेर तर येणार नाही; पण तेथील स्थितीचा भारतावर परिणाम होणार, हे निश्चित ! हे भारताने लक्षात घेऊन कृतीशील पावले उचलावीत. भारताचे परराष्ट्र धोरण आधी दुर्बळ होते; पण आता ते कठोर आणि कणखर झाले आहे. याचा लाभ पाकला धडा शिकवण्यासाठी होऊ शकतो. भारताने आक्रमक परराष्ट्र नीती राबवून पाकविरोधात कृतीशील व्हावे !
पाकिस्तानमधील अस्थिरतेचा लाभ घेऊन भारताने त्याच्या विरोधात आक्रमक परराष्ट्र नीती अवलंबावी ! |