भाव-भक्तीचा वर्षाव करणारा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव’ फर्मागुडी (गोवा) येथे श्रीविष्णुमय वातावरणात साजरा !

सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म यांचे रथारूढ श्रीविष्णूच्या रूपात साधकांना दर्शन !

फर्मागुडी (गोवा), ११ मे (वार्ता.) – सनातनचे सद्गुरु आणि संत यांच्या मुखावर दिसणारा आर्त भाव, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आदी राज्यांतून आलेल्या सहस्रो साधकांची दाटून आलेली भगवंतभेटीची व्याकुळता, जणू विष्णुलोकाचीच अनुभूती देणारा भव्य सभामंडप अन् या सर्वांना केवळ दर्शनमात्रे कृतार्थ अन् कृतज्ञ करणारे सनातनचे ३ गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दिव्य दर्शन ! अशा भावमय, भक्तीमय आणि विष्णुमय वातावरणात सप्तर्षींच्या आज्ञेने ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव’ साजरा करण्यात आला. येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात साधकांनी श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांसाठी जणू भूवैकुंठ उभारले ! प्रथमच अशा भव्य स्वरूपात साजर्‍या झालेल्या या ब्रह्मोत्सवाने सनातनच्या सर्वत्रच्या साधकांना कृतकृत्य केले. रथारूढ भगवान श्रीविष्णुची नृत्य, गायन आणि वादन यांद्वारे स्तुती करणे म्हणजेच ब्रह्मोत्सव ! आंध्रप्रदेश राज्यात सुवर्ण रथात विराजमान असलेल्या तिरुपती बालाजीचा ब्रह्मोत्सव अशा प्रकारे साजरा केला जातो.

या दिव्य ब्रह्मोत्सवात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दिव्य रथातून कार्यस्थळी आगमन झाले. टाळनृत्य, ध्वजनृत्य यांसह कार्यस्थळी अवतरलेल्या या दिव्य रथासह जणू चैतन्य, भाव आणि आनंद यांचेच संचारण झाले.

सोहळ्याची सांगता करतांना श्रीविष्णुस्वरूप अवतारी दिव्य गुरुपरंपरेच्या चरणी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी नृत्य, गायन आणि वादन सेवा अर्पण केली. दिव्य अवतारी गुरुपरंपरेच्या दर्शनाने अनन्य कृतज्ञता आणि भावभक्ती दाटून आलेल्या उपस्थित सहस्रो साधकांच्या नेत्रांतील भावाश्रूंसह या भावसोहळ्याची सांगता झाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अवतार संबोधण्याचे कारण !

पू. डॉ. ॐ उलगनाथन्

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीही स्वतःला अवतार म्हटलेले नाही. सनातन संस्थाही असे कधी म्हणत नाही. ‘नाडीभविष्य’ या प्राचीन अन् प्रगल्भ ज्योतिषशास्त्रानुसार सप्तर्षींनी प्रत्येक व्यक्तीचे भविष्य लिहून ठेवले आहे. तमिळनाडूतील जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी जीवनाडीपट्ट्यांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याचे लिहून ठेवले आहे. सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेने आणि नाडीपट्टीमध्ये सांगितल्यानुसार जन्मोत्सवाच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीविष्णूच्या रूपात वस्त्रालंकार धारण केले आहेत.

या भावसोहळ्याचे सविस्तर वृत्त, तसेच वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे लवकरच प्रसिद्ध करत आहोत.