गोहत्या करणार्यांवर कडक कारवाई करा अन्यथा १३ मे या दिवशी आंदोलन
मंडणगड तालुक्यात गोधनाची हत्या केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिली चेतावणी
तक्रार घेण्यास पोलिसांची होत आहे टाळाटाळ !
खेड, १० मे (वार्ता.) – मंडणगड तालुक्यात गोहत्या केल्यामुळे स्थानिक हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराविषयी स्थानिक हिंदूंनी लाटवण पंचक्रोशीतील गावांची बैठक घेऊन या घटनेचा तीव्र निषेध करत ‘गोहत्या करणार्यांवर कडक कारवाई करा’, अशी मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भातील निवेदन १० मे २०२३ या दिवशी मंडणगड तहसीलदार सूर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक श्रीमती शैलजा सावंत यांना देण्यात आले. ‘याविषयी प्रशासनाने योग्य ती भूमिका घेऊन न्याय मिळवून द्यावा अन्यथा १३ मे या दिवशी तीव्र आंदोलन करू’, अशी चेतावणी प्रशासनाला ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे. ‘या घटनेचा मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्यात येईल’, असेही स्थानिक हिंदूंनी प्रशासनाला ठणकावले आहे. याविषयी अजून कोणतीही तक्रार प्रविष्ट करून घेतलेली नसून पोलीस टाळाटाळ करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (उघड गुन्हा घडूनही त्याविषयी तक्रार प्रविष्ट करून घेण्यास टाळाटाळ करणारे कर्तव्यशून्य पोलीस ! असे पोलीस हिंदूंना कधी न्याय मिळवून देतील का ? – संपादक)
४ गायींची हत्या, तर ४ गायींना हत्या करण्यापूर्वी केले बेशुद्ध !
मंडणगड तालुक्यातील कादवण आणि वलवते या २ गावांच्या हद्दीत भारदा नदीच्या पात्राजवळील गणपति विसर्जन घाटाजवळ ९ मे या दिवशी गोहत्या केल्याचे गावातील स्थानिक हिंदूंना आढळून आले होते. यामध्ये ४ गायींची हत्या करून त्यांचे मांस नेल्याचे आणि ४ गायींची हत्या करण्याच्या उद्देशाने त्यांना ‘इंजेक्शन’ देऊन बेशुद्ध केल्याचे आढळून आले.
प्रशासनाला निवेदन देते वेळी कादवण गावचे सरपंच श्री. राजेंद्र पांडुरंग सोंडकर; भोळवली गावचे सरपंच श्री. रणजीत रामचंद्र कासारे; तंटामुक्त समिती अध्यक्ष, कादवणचे श्री. दीपक शंकर हेंद्रे; समाजसेवक श्री. गंगाराम काशीराम कदम पिंपळगाव; तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि पिंपळगाव येथील श्री. दीपक वामन सुतार; विन्हे येथील माजी उपसरपंच श्री. राजेंद्र बाबाखोत गायकवाड; तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि लाटवण येथील श्री. शांताराम धोंडू कदम; दाभट गावचे श्री. अमीर कासारे आणि अन्य हिंदू बहुसंख्येने उपस्थित होते. या वेळी या गायींच्या हत्येच्या विरोधात अधिकाधिक हिंदूंनी संघटित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|