सांगलीत ‘नीट’ परीक्षेसाठी विद्यार्थिनींना कपडे आणि अंतर्वस्त्रे उलटी घालून परीक्षा देण्यास भाग पाडले !
विद्यार्थिनी आणि पालक संतप्त
सांगली – सांगलीत कस्तुरबा वालचंद या महाविद्यालयात ‘नीट’ची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींना कपडे आणि अंतर्वस्त्रे उलटी घालून परीक्षा देण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. ज्या विद्यार्थिनी या महाविद्यालयात आल्या, त्यांची अगोदर पडताळणी करण्यात आली आणि नंतर कपडे उलटे घालून परीक्षा देण्यास सांगितले. या विद्यार्थिनींनी ३ घंटे अशा प्रकारे परीक्षा दिली. सुरक्षेच्या कारणास्तव तेथील प्रशासकीय यंत्रणांनी असे केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला. या प्रकरणी पालकांनी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’कडे या प्रकाराची तक्रार केली आहे. (जिल्हा प्रशासनाने झालेल्या प्रकाराचे अन्वेषण करून यात जे कुणी दोषी असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)
(सौजन्य : TV9 Marathi)
या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाने, ‘नीट परीक्षा आणि महाविद्यालय यांचा संबंध नाही. आम्ही केवळ वर्ग उपलब्ध करून दिले’, असे सांगितले. परीक्षा देऊन विद्यार्थिनी बाहेर आल्यावर त्यांच्या अंगावर उलटे कपडे पाहिल्यावर पालकांना हा प्रकार समजला. आता हा प्रकार कुणाच्या आदेशाने घडला ? या सूचना कुणी िदल्या होत्या? याचा आता शोध घेण्यात आहे. या संदर्भात ‘टी.व्ही. ९ मराठी’ने हे वृत्त दिले आहे.