अवतारी युगपुरुष !
आज सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मदिन ! हा ‘अवतरणदिन’ आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ओळखणार्या प्रत्येक संतांनी त्यांच्याविषयी ‘ते अवतारी पुरुष आहेत’, असेच सांगितले आहे, तसेच जीवनाडीपट्टीमध्येही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भगवान श्रीविष्णूचे अवतार असल्याचे सप्तर्षींनी सांगितले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कधीही स्वतःहून ‘ते अवतारी पुरुष आहेत’, असे म्हटलेले नाही. त्यांनी नेहमीच ‘मी बाबांचा (प.पू. भक्तराज महाराज यांचा) शिष्य आहे’, असेच म्हटले आहे. श्रीमद़्भगवद़्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवलेले आहे, ‘जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन धर्माची पुनर्स्थापना करतो.’ काळानुसार भगवंताचे अवतारी कार्य वेगवेगळे असते, त्याचे स्वरूप वेगवेगळे असते. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य कसे चालू आहे ?’, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. भगवान श्रीविष्णूच्या बहुतेक अवतारांकडे शस्त्रे होती आणि त्यांनी दुष्टांचे निर्दालन करून साधक, भक्त, संत आदींचे रक्षण केले आहे. असे असले, तरी काळानुसार अवतारी कार्य वेगवेगळे असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य हे समाजाला अध्यात्मशास्त्र सांगून त्यांना साधनेकडे वळवणे आणि धर्माची पुनर्स्थापना करणे हे आहे. त्यासाठी त्यांनी ‘ग्रंथनिर्मिती हेच मुख्य शस्त्र ठेवले आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील श्रीमद़्भगवद़्गीता त्या काळी सर्वसामान्यांची भाषा असणार्या प्राकृत भाषेत लिहिली. त्या आधारे गेल्या ८०० वर्षांत कोट्यवधी जिवांनी साधना करून आध्यात्मिक प्रगती केली. त्या काळाच्या तुलनेत आताची धर्माची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे काळानुसार समाजाला अध्यात्मशास्त्र सांगणे आवश्यक ठरले. सध्याच्या विज्ञानयुगाच्या काळात समाजाला विज्ञानाच्या आधारे ‘विज्ञानाची मर्यादा आणि अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व’ दाखवून देण्याचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत आहेत. असे कार्य कुणी केल्याचे स्मरत नाही. अशा मार्गदर्शनामुळेच आताची विज्ञानवादी पिढी साधना करू लागली असून त्यातील अनेक जण जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्तही झाले आहेत आणि होत आहेत. काही जण संतपदाला पोचले आहेत. हा चमत्कार केवळ अवतारी व्यक्तीच घडवून आणू शकते. भौतिक आणि लौकिक चमत्कार करणारे या जगात अनेक जण असतील; मात्र एकाच वेळी अनेकांची आध्यात्मिक प्रगती घडवून आणणे आणि त्यांना काही वर्षांच्या साधनेतून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करणारे विरळाच होत !
देवतांची अधिक तत्त्वे असणारी चित्रे !
आध्यात्मिक स्तरावर समाजातील रज-तमाचे प्राबल्य नष्ट करून तेथे सत्त्वगुणांची वृद्धी होण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घरोघर देवतांची अधिकाधिक तत्त्वे असणारी चित्रे साधकांच्या माध्यमांतून निर्माण केली. कलियुगामध्ये कोणत्याही देवतेच्या चित्रामध्ये ३० टक्क्यांपर्यंत त्याचे तत्त्व येऊ शकते. सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांमध्ये ३१ टक्क्यांपर्यंत देवतेचे तत्त्व आलेले आहे. अशी चित्रे हिंदूंच्या घराघरांमध्ये गेल्यावर त्यांना त्यांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन समाजाची सात्त्विकता वाढू लागेल. घरांची शुद्धी होईल, असे कार्य आतापर्यंत कुणीही केलेले नाही. पुढे अशा प्रकारच्या देवतांच्या मूर्तीही बनवण्यात येणार आहेत.
आध्यात्मिक संशोधन
आध्यात्मिक संशोधनाद्वारे अध्यात्मशास्त्राचे महत्त्व सांगण्याचा अभूतपूर्व प्रयत्न सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी करून हिंदु धर्माचे, सनातन वैदिक धर्माचे माहात्म्य विदेशी लोकांपर्यंत पोचवले आहे आणि त्यांना साधनेला लावले आहे. आता अनेक विदेशी नागरिक साधना करू लागले आहेत आणि संत, सद़्गुरु पदापर्यंत पोचले आहेत. विज्ञानाच्या यंत्राद्वारे सूक्ष्मजगत, चांगल्या आणि वाईट शक्ती यांचे प्रकारे अन् त्यांचे होणारे परिणाम, तसेच वाईट शक्तीचा प्रभाव दूर करण्यासाठी करावयाचे नामजपादी उपाय, विविध देवतांच्या नामजपाचा होणारा परिणाम, मारक अन् तारक जपांचा होणारा परिणाम; स्थूलदेह, मनोदेह, कारणदेह, महाकारणदेह यांवर होणारा परिणाम आदी गोष्टी सोप्या भाषेत सांगून समाजातील व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि आध्यामिक त्रास दूर करण्यात येत आहेत. असे कार्य आतापर्यंत कुणीच केलेले नाही. हे करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कोणत्याही व्यक्तीची कधी व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले नाही. सकाम साधना करण्याऐवजी निष्काम साधना करण्यासाठीच मार्गदर्शन केले. ‘निष्काम जो माझा भक्त त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन’, असे श्रीमद़्भगवद़्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाद्वारे साधना करणारे साधक याची अनुभूती प्रतिदिन घेत आहेत.
रामराज्याची स्थापना !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूंना जागृत करणे होय ! वर्ष १९९८ मध्येच ‘वर्ष २०२५ मध्ये देशात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार’ हे सांगून त्यासाठी टप्प्याटप्प्याने समाजाला मार्गदर्शन करून त्यानुसार हिंदूंमध्ये जागृती केली. देशात क्रांती नव्हे, तर उत्क्रांती करायची आहे. प्रत्येक क्षेत्रात अध्यात्माच्या दृष्टीने आमूलाग्र पालट करायचा आहे. ते साध्य करण्याचे आध्यात्मिक स्तरावरील कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत आहेत. सध्या समाज हिंदु राष्ट्राची मागणी करू लागला आहे. यातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा लक्षात येतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हे संक्षिप्त स्वरूपात अवतारी कार्य पहाण्याचा प्रयत्न केला. असे कार्य यापूर्वी झालेले नाही. या कार्यातून पुढील काही वर्षांत पृथ्वीतलावर धर्मराज्याची म्हणजे रामराज्याची स्थापना होणार आहे. हा काळ सत्ययुगाचा असणार आहे. युगनिर्मिती केवळ अवतारी युगपुरुषच करू शकतात !