सर्वांशी जवळीक साधणार्या, सकारात्मक आणि साधकत्व असणार्या चि.सौ.कां. (वैद्या) दीपाली गावकर !
१२.५.२०२३ या दिवशी चि.सौ.कां. (वैद्या) दीपाली गावकर यांचा विवाह चि. देऊ नाणोसकर यांच्याशी नारायण देव सभागृह, बोरी, फोंडा, गोवा येथे होणार आहे. त्यानिमित्त वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर आणि कु. जान्हवी दाबके यांना तिच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि.सौ.कां. दीपाली गावकर यांना शुभविवाहाच्या निमित्ताने सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ अ. जवळीक साधणे आणि सहजता : ‘दीपाली आणि माझी प्रथम भेट वैद्य मेघराज पराडकर यांच्यामुळे मागील वर्षी एका सेवेनिमित्त झाली; पण तिच्यातील सहजतेमुळे ‘आम्हा दोघींना आणि अन्यांनाही आमची ओळख पूर्वीपासून असून आम्ही बहिणी आहोत’, असे वाटत होते. अल्पावधीमध्ये तिच्याशी जवळीक झाल्याने आमचे नाते आध्यात्मिक स्तरावरचे झाले. दीपालीच्या अनेक ओळखी असून तिने सर्वांना चांगले जोडून ठेवले आहे.
१ आ. साधकत्व : दीपाली कोणत्याही परिस्थितीमध्ये ‘साधना कशी होऊ शकते ?’, याचा विचार करते. ज्या कृती साधनेसाठी पूरक असतात, त्या करण्याकडे तिचा कल असतो. ती सर्वांना त्यांच्या प्रकृतीनुसार साधना करण्याचे महत्त्व पटवून देते.
१ इ. दीपाली नेहमी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभावात असते. तिची त्यांच्यावर दृढ श्रद्धा आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने या जिवाला वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने सकारात्मक, उत्साही आणि आनंदी असणार्या वैद्या (कु.) दीपाली यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली आणि त्यांनीच ही सूत्रे लिहून घेतली; म्हणून त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (२९.४.२०२३)
२. कु. जान्हवी दाबके, असुद, दापोली, रत्नागिरी.
२ अ. सकारात्मकता : ‘दीपालीताईच्या सहवासात मी सतत सकारात्मक रहायला आणि समोरील रुग्णालाही सकारात्मक करायला शिकले. अनेकदा रुग्ण पुष्कळ घाबरतात आणि त्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. त्यामुळे त्यांचा रोग आणखी वाढू शकतो. ताईशी झालेल्या नुसत्या सहज संवादातून रुग्णांना पुष्कळ छान वाटते.
२ आ. शिकण्याची वृत्ती आणि वैद्यकीय कौशल्य : दीपालीमध्ये संस्कृत आणि आयुर्वेद शिकण्याची तीव्र तळमळ आहे. ती शिकायला मिळालेली सूत्रे तत्परतेने कृतीमध्ये आणते. एखादी नवी गोष्ट स्वतः शिकून दुसर्यांना अत्यंत सोप्या सरळ भाषेत सांगणे, हे तिचे कौशल्य आहे. तिची आयुर्वेदावरील श्रद्धा वाखणण्याजोगी आहे. अनेक रुग्णांना तिच्याकडून वैद्यकीय सल्ला हवा असतो. ती रुग्णांशी केवळ बोलली, तरी त्यांना तिचा आधार वाटतो.
दीपालीताईकडून मला नामस्मरणाचे महत्त्व कळले आणि प्रत्येक चांगल्या घडणार्या गोष्टीनंतर कृतज्ञता व्यक्त करायची असते, हेही शिकले. त्याबद्दल मी दीपालीताईची कायम ऋणी राहीन.’ (१६.४.२०२३)