परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘साधकाला प्रसंगानुरूप तत्त्वनिष्ठ राहून साधनेचे मार्गदर्शन करणे आणि त्याला प्रेमाची जोड असणे’, यांची उत्तम सांगड घालतात’, हे दर्शवणारा प्रसंग

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष २००३ मध्ये मी नाशिकहून काही दिवसांसाठी सनातन संस्थेच्या मिरज आश्रमात गेलो होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले हेही गोव्याहून मिरज आश्रमात आले होते. परात्पर गुरु डॉक्टरांना त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आवडत नाही. त्याऐवजी ‘साधकांनी तो वेळ साधनेसाठी द्यावा’, अशी त्यांची इच्छा असायची. त्याच दिवसांत एकदा परात्पर गुरु डॉक्टरांचा तिथीनुसार वाढदिवस होता; म्हणून एका साधकाने एका कागदावर परात्पर गुरु डॉक्टरांवर कविता लिहिली आणि ती त्याने गुपचूप त्यांच्या खोलीबाहेरील कडीला लाल रिबीनीत गुंडाळून लावली. ‘परात्पर गुरु डॉक्टर कविता करण्यात वेळ दिल्याने आपल्यावर रागावतील’, या विचाराने त्या साधकाने कवितेखाली स्वतःचे नाव लिहिले नव्हते.

श्री. राम होनप

त्या दिवशी दुपारी आश्रमात ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनासाठी एक सत्संग होता. परात्पर गुरु डॉक्टरांनी तो कवितेचा कागद सत्संगात आणला आणि ते साधकांना उद्देशून म्हणाले, ‘‘ही कविता कुणी केली ? खाली त्याचे नाव नाही. या कवितेत व्याकरणाच्या अनेक चुका आहेत. कुठलीही सेवा करतांना ती अचूक आणि परिपूर्ण केली, तर त्यातून साधकाची साधना होते.’’ हे सर्व झाल्यावर ज्या साधकाने ही कविता केली त्याला वाईट वाटू नये; म्हणून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘कवितेत अनेक चुका असल्या, तरी साधकाने कविता चांगली केली आहे.’’

या प्रसंगातून परात्पर गुरु डॉक्टरांचा त्या साधकाला, तसेच अनेक साधकांना साधनेत साहाय्य करण्याचा उद्देश होता. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या साधकाच्या चुका तत्त्वनिष्ठपणे सांगितल्या आणि त्या समवेत त्याच्या गुणाचेही कौतुक केले. त्यातून परात्पर गुरु डॉक्टरांतील ‘तत्त्वनिष्ठता’ आणि ‘प्रेमभाव’ या गुणांची सांगड दिसून येते.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(४.५.२०२३)