परम पूज्यांच्या सान्निध्यात आध्यात्मिक प्रवासात मार्गस्थ होऊ शकतो ! – तालयोगी ‘पद्मश्री’ पं. सुरेश तळवलकर, सुप्रसिद्ध तबलावादक
‘पूर्वी एकदा प.पू. भक्तराज महाराज भजने म्हणत असतांना मी रात्रभर त्यांना तबल्याची साथ दिली होती. प्रत्येक भजन म्हणतांना ते एका अवस्थेपर्यंत जात होते. ‘ती अवस्था ‘स्व’ची ओळख विसरायला लावते’, असे मला वाटले. तबला वाजवतांना ‘मला अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे’, असे मला वाटले. त्या उद्देशानेच १७ एप्रिल २०२३ या दिवशी मी परम पूज्यांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) भेटायला आलो होतो. त्यांना भेटून मला मनापासून आणि पुष्कळ आनंद झाला. त्यांच्याकडे पहातांना ‘अतिशय तेजःपुंज व्यक्तीमत्त्व कसे असते ?’, ते कळले.
साधनेमध्ये अनेक टप्प्यांवर आपल्याला प्रश्न पडत असतात. ‘अशा प्रश्नांतून मार्ग काढून साधनेत पुढे कसे जायचे ?’, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे परम पूज्यांसारख्या व्यक्तींकडून मिळतात. ते संगीतातील जाणकार नसले, तरीही उत्तरे मिळतात ! ती उत्तरे आपल्याला आध्यात्मिक प्रवासात मार्गस्थ करतात. ‘परम पूज्यांसारख्या व्यक्तींच्या सान्निध्यात आपण लवकरात लवकर गेलो, तर एकेका गोष्टीचे आकलन होईल आणि आपण एकेक पायरी पुढे जाऊ शकतो’, असे वाटते.
मला परम पूज्यांचे पुष्कळ आशीर्वाद मिळाले; म्हणून मला फार आनंद झाला. माझा त्यांना मनापासून साष्टांग प्रणाम !’
(२२.४.२०२३)