राजस्थानमध्ये सापडले लिथियमचे मोठे साठे !
जयपूर (राजस्थान) – राजस्थान सरकार आणि ‘जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणात नागौर जिल्ह्यातील डेगाना येथे लिथियम या धातूचे मोठे साठे सापडले आहेत. इलेक्ट्रिक वाहने, स्मार्टफोन, लॅपटॉप यांच्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीत लिथियम हा अत्यंत महत्त्वाचा धातू आहे. त्यामुळेच याला ‘पांढरे सोने’ असेही म्हटले जाते. ‘देशाच्या एकूण आवश्यकतेपैकी ८० टक्के आवश्यकता या साठ्यांमुळे पूर्ण होईल आणि चीनवरील भारताचे अवलंबित्व अल्प होईल’, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही मासांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ५९ लाख टन लिथियम असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र राजस्थानमध्ये सापडलेले साठे त्याहीपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Rajasthan| “This is our luck that we have found Lithium in our state. CM’s prime focus this time was to have as many surveys as possible…Lithium reserve that has been found in Nagaur is much bigger than what was found in J&K…”: Pramod Bhaya, Rajasthan Mining Minister on… pic.twitter.com/SYgJXLIdd4
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) May 9, 2023
जगात सर्वाधिक लिथियम ऑस्ट्रेलियात !
लिथियम हा जगातील सर्वांत हलक्या वजनाचा धातू आहे. त्याच्या साहाय्याने रासायनिक उर्जेचे रूपांतर विजेमध्ये होते. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटर्यांमध्ये हा महत्त्वाचा घटक असतो. सध्या इलेक्ट्रॉनिक बॅटर्यांच्या वाढत्या वापरामुळे लिथियमचे साठे असणार्या देशांनाही महत्त्व प्राप्त आले आहे. जगातील सर्वाधिक ४७ टक्के लिथियम एकट्या ऑस्ट्रेलियात आहे. चिलीमध्ये ३० टक्के, तर चीनमध्ये १५ टक्के लिथियमचे साठे आहेत. लिथियमवरील प्रक्रियेपैकी ५८ टक्के प्रक्रिया चीनमध्ये होते, २९ टक्के चिलीमध्ये, तर १० टक्के प्रक्रिया अर्जेंटिनामध्ये होते.
भारताची चीनकडून लिथियमची सर्वाधिक आयात !
भारतामध्ये लिथियमची बहुतांश आयात चीनमधून होते. भारताने वर्ष २०२० ते २०२१ या कालावधीत एकूण ६ सहस्र कोटी रुपयांच्या लिथियमची आयात केली आहे, त्यांपैकी ३ सहस्र ५०० कोटी रुपयांचे लिथियम एकट्या चीनमधून आयात करण्यात आले होते.
इलेक्ट्रिक वाहनांना चालना !
भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. एका अंदाजानुसार वर्ष २०३० पर्यंत देशात १३ कोटींहून अधिक इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर असतील. या पार्श्वभूमीवर लिथियमच्या उत्पादनात भारत स्वयंपूर्ण झाला, तर बॅटर्यांच्या किमती आवाक्यात येतील आणि त्याचा लाभा इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला होऊ शकतो.
जागतिक पुरवठादार बनणे शक्य !
एका अंदाजानुसार वर्ष २०२७-२८ पर्यंत जागतिक बाजारपेठेत ३ सहस्र गिगावॅट अवर्स (जी.डब्ल्यू.एच्.) क्षमतेच्या बॅटर्यांची आवश्यकता आहे. भारतात सापडलेल्या नव्या साठ्यांमुळे जागतिक बाजारपेठेमध्ये भारत लिथियमचा महत्त्वाचा पुरवठादार देश बनू शकतो. सर्वसामान्यपणे जगभरात सापडणारे साठे २०० ‘पी.पी.एम्.’चे (‘पार्ट्स पर मिलियन’चे) (दहा लाखांचा एक भाग) आहेत, तर जम्मू-काश्मीरमधील साठ्यांमध्ये हे प्रमाण ५०० ‘पी.पी.एम्.’ इतके आहे. त्यामुळे याचा भारताला लाभ होऊ शकतो.