मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण !

मुंबई, ९ मे (वार्ता.) – मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघाच्या वर्ष २०२१ आणि २०२२ या वर्षांच्या राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराचे ९ मे या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे वितरण करण्यात आले. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादाजी भुसे, मंत्री सुरेश खाडे, खासदार हेमंत गोडसे,ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

‘कृ.पां. सामक जीवनगौरव’ पुरस्कार (वर्ष २०२१) दैनिक ‘लोकसत्ता’ चे माजी संपादक कुमार केतकर आणि (वर्ष २०२२) मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय वैद्य यांना प्रदान करण्यात आला. यासह इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा ‘उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार ‘न्यूज १८ लोकमत’ (मुंबई) चे पत्रकार विलास बढे आणि ‘साम टी.व्ही.’च्या मुख्य प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांना, तसेच वृत्तपत्र पुरस्कार दैनिक ‘भास्कर’चे प्रतिनिधी विनोद यादव, दैनिक ‘पुण्यनगरी’ चे प्रतिनिधी किशोर आपटे, दैनिक ‘बीड रिर्पाेटर’चे पत्रकार शेख रिजवान शोख खलील अन् दैनिक ‘पुण्यनगरी’चे गडचिरोली येथील पत्रकार अविनाश भांडेकर यांना प्रदान करण्यात आला.

‘उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी पत्रकारितेतून योगदान द्या. सत्य आणि स्पष्ट बोलणार्यांची संख्या अल्प झाली आहे. तो महाराष्ट्र आपणाला पालटायचा आहे’, असे मत या वेळी मधुकर भावे यांनी व्यक्त केले.

शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सरकारचे काही चुकत असेल, तर दाखवले आहे. बातमी देणे हा पत्रकारितेचा अधिकार आहे; मात्र अधिकाराचा उपयोग करतांना शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवायला हव्यात. सर्वसामान्यांच्या अडचणींना वाचा फोडल्यामुळे अनेकांना न्याय मिळतो. विद्यार्थी, गावकरी यांच्या समस्या सुटतात. याचे श्रेय पत्रकारितेचे आहे. अशा प्रकारे सांघिक काम केल्यास समाजाला याचा लाभ होईल.