साम्यवाद्यांचे पितळ पुन्हा उघडे !
चित्रपट अभिनेते, लेखक, कवी, गीतकार, संगीतकार आणि चाहते यांची मोठी अनुनय संख्या असलेले पीयूष मिश्रा यांनी साम्यवाद्यांविषयी मोठी पोलखोल करून जणू त्यांचे ‘सत्यदर्शन’ समाजापुढे आणले आहे. मिश्रा यांनी म्हटले आहे, ‘‘साम्यवाद्यांनी माझी २० वर्षे नष्ट केली.’’ त्यांनी पुढे जे वर्णन केले आहे, त्यावरून ‘त्यांचे पूर्ण आयुष्यच साम्यवाद्यांनी उद़्ध्वस्त केले’, असे म्हटले, तर फार चुकीचे ठरणार नाही. समाजासाठी काम करत असल्याचे ढोंग करणारे साम्यवादी प्रत्यक्षात ‘समाजाला आयुष्यातून कसे उठवत आहेत ?’, हे लक्षात येणारे त्यांचे ‘खरे स्वरूप’ चित्रपटसृष्टीतून प्रथमच कुणीतरी स्वतःहून उघड केले आहे. साम्यवाद्यांच्या नादाला लागून मिश्रा यांनी त्यांचे आई, वडील, पत्नी यांनाही सोडले. ते साम्यवाद्यांसाठी काम करत आणि त्यांचा पैसाही त्यांना द्यावा लागे. एवढे करून साम्यवाद्यांनी सांगितलेली ‘क्रांती’ मात्र काही होत नव्हती. त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती हलाखीची झाल्यावर त्यांना ‘आपण पुरते फसवले गेलो आहोत’, याची जाणीव झाली अन् साम्यवाद्यांच्या विळख्यातून सुटून ते परत सामान्य जीवन जगू लागले. साम्यवादी चळवळीच्या नावाखाली चित्रपटात कारकीर्द चालू करण्याच्या सुमारासच ते या जाळ्यात ओढले गेले होते. आता त्यांनी पुढे येऊन साम्यवादाची काळी बाजू आणखी स्पष्टपणे जगासमोर ठेवायला हवी आणि त्यांच्यासारख्या अन्य फसवल्या गेलेल्यांना बाहेर येण्यासाठी मोठी पावले उचलायला हवीत. त्यासाठी राष्ट्रप्रेमींनीही त्यांना साथ द्यायला हवी !
शिक्षण, कला ही क्षेत्रे साम्यवाद्यांनी प्रभावित
साम्यवादाचा उगम असलेला रशिया उद़्ध्वस्त होऊनही अद्याप चीनसारख्या देशांतून भारतात साम्यवादी चळवळ चालू ठेवण्यासाठी भरमसाठ पैसा येत असल्याचे पुरावे सापडले आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच अनेक विद्यार्थ्यांचे साम्यवादी लेखक, प्राध्यापक यांच्याकडून वैचारिक परिवर्तन (ब्रेनवॉश) केले जाते. जे.एन्.यू.सारख्या विद्यापिठांत संपूर्णपणे देशविरोधी वातावरण निर्माण करून पुढे त्याचा उपयोग आतंकवादी, नक्षलवादी आणि आता कदाचित् खलिस्तानवादी निर्माण करण्यासाठी कसा केला जातो, हे उघड होत आहे. साम्यवादी चळवळीतील कार्यकर्ते महाविद्यालयातील देशाच्या नव्या पिढीची पूर्णतः वैचारिक दिशाभूल करतात. भारतातील शिक्षण, कला, साहित्य आणि चित्रपट या क्षेत्रांतील (अपवाद वगळता) बहुसंख्य लोक हे साम्यवादी विचारांनी प्रभावित झालेले आहेत. भारतात डोक्यावर घेतले जाणारे बहुतांश हिंदी चित्रपट कलाकार हे साम्यवादी विचारधारेकडे झुकलेले असणे, हे साम्यवाद्यांच्या चळवळीचे यश आहे. याचे हे उदाहरण पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आले आहे. कलात्मक चित्रपटातील नसिरुद्दीन शाहपासून अमोल पालेकरपर्यंत आणि व्यावसायिक चित्रपटातही अमिताभ बच्चनपासून सध्याच्या खानावळींपर्यंत सर्वच स्तरांतील कलाकारांवर साम्यवादाचा प्रभाव कुठे ना कुठे असल्याचे त्यांच्या बोलण्यातून वारंवार लक्षात येते. ‘मराठी साहित्यात निर्माण झालेल्या विद्रोही साहित्याचा उगमही साम्यवादी विचारांतच आहे’, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
वरवर समानतेची वाटणारी तात्त्विक भूमिका शिकवत आणि अन्यायाविरुद्ध लढ्यात न्याय देण्याची भूमिका घेत साम्यवादी हिंदूंचा प्रचंड द्वेष करतात. हिंदूंच्या संदर्भात ‘धर्म ही अफूची गोळी’ हे त्यांचे कुप्रसिद्ध वचन जळी-स्थळी लावून सर्व धार्मिक गोष्टींना तुच्छ लेखणे, त्यांची विटंबना करणे आणि प्रसंगी त्यासाठी दंगली करणे इथपर्यंत त्यांची मजल जाते; मात्र हाच धर्म जेव्हा मुसलमानांच्या संदर्भात येतो, तेव्हा मात्र त्यातील कट्टरतेविषयी, प्रथा-परंपरांविषयी काहीच वाच्यता न करता ते उलट त्यांच्या धर्मांधतेचा हिंदूंचा विनाश करण्यासाठी उपयोग करून घेतात. साम्यवादी आणि धर्मांध एकमेकांच्या हातात हात घालून हिंदूंच्या मुळावर उठून हिंदूंचा वंशविच्छेद करण्यासाठीच टपलेले दिसतात. वर्ष २०१४ नंतर याचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात यायला लागले.
साम्यवादी राज्यांची भयानक स्थिती
वर म्हटल्याप्रमाणे साम्यवादी सरकारे हिंदु विचारसरणी, पक्ष, लोक, संस्कृती इत्यादी सारे नष्ट करण्याच्या नादात इस्लाम आणि ख्रिस्ती दोघांनाही डोक्यावर घेतात. केरळमधील पाद्य्रांनी केलेल्या लैंगिक अत्याचारांची प्रकरणे असू द्या, नाहीतर तेथील पी.एफ्.आय.चा विस्तार असू द्या, त्यांना काही फरक पडत नाही. बंगालमध्येही घरोघरी बाँब निर्माण करण्याची दुकाने निर्माण झाली आणि रस्तोरस्ती दंगली झाल्या, तरी तेथील सरकार तसूभरही ढळत नाही. त्यामुळे साम्यवादी राज्यांत भूमी जिहाद, लव्ह जिहाद, हिंदूंच्या हत्या यांचा महापूर आलेला आढळतो. साम्यवादी राज्यांत राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे, एवढी तेथील परिस्थिती बिकट झालेली आहे. शहरी नक्षलवाद ही साम्यवाद्यांचीच वीण आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठांसह नक्षलवादाच्या रूपाने सामान्य नागरिक आणि सैन्य यांच्या हत्या करणारे साम्यवादी हे कुणालाही न्याय मिळवून देण्यासाठी लढत नाहीत. ते केवळ न केवळ स्वार्थ अन् हिंदुद्वेष यांसाठी अतिशय क्रूर कारवाया करण्यासह कुठल्याही थराला जातात. हेच वरील सर्व उदाहरणांतून लक्षात येते.
मिश्रा यांच्या उदाहरणातून साम्यवादी चळवळीत हिंदूंचा सर्व प्रकारे बुद्धीभेद कसा केला जातो ?, हे पुढे आले आहे. उद्या कदाचित मिश्रा यांच्यासारखे अन्यही काही कलाकार पुढे येऊन साम्यवाद्यांनी त्यांचे जीवन कसे नासवले ?, हे निर्भीडपणे सांगतील. साम्यवाद्यांनी केलेल्या अत्याचारांची ‘मी टू’ (मी सुद्धा बळी गेलो आहे) ही चळवळ म्हणून विद्यार्थी आणि कलाकार यांच्यामध्ये जोमाने चालू व्हावी अन् साम्यवाद्यांचे क्रूर ढोंग सर्वांपर्यंत पोचून साम्यवाद नष्ट व्हावा, याचीच आज देशाला आवश्यकता आहे !
साम्यवाद्यांचे पितळ उघडे पाडणारी ‘मी टू’ चळवळ विद्यार्थी आणि कलाकार यांमध्येही चालू व्हावी ! |