महापालिकेने विनाकारण शिल्पांचे सौंदर्य नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये !
पुण्यातील शिल्प कलावंतांचा महापालिकेला सल्ला
पुणे – महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या पुतळ्यांना एकसारखा रंग मागील काही वर्षांपासून देण्यात येत आहे; मात्र हा रंग देतांना पहिला रंग काढला जात नाही. त्यावर रंग देण्यात येतो. पुतळ्यांवर रंगाचे थर चढून तो पुतळा गुळगुळीत होतो. त्यावरील सर्व ‘डिटेंलिंग’ संपुष्टात येते. धातूमधील पुतळ्याला नैसर्गिक छटा असतात. हिरवा, पिवळा, तांबडा असे रंग त्यावर चढतात. त्यामुळे पुतळा खुलून येतो. हवामानाच्या परिणामाने हे पालट होतात; मात्र ते नैसर्गिक असतात. उलट त्यातून पुतळ्याचे मूळ सौंदर्य अधिक उजळते. पुतळा जेवढा जुना दिसेल, तेवढा तो आकर्षक, सुंदर दिसतो. त्यामुळे महापालिकेने विनाकारण शिल्पांचे सौंदर्य नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणी शिल्पकार कलावंतांनी केली आहे.
एकाच रंगात सर्व पुतळे रंगवून पुतळ्यांचे मूळचे शिल्पसौंदर्य नष्ट होत आहे. या रंगामुळे पुतळ्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे, असे म्हणत पुण्यातील अनेक शिल्प कलावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे.