‘सेवक’ वृत्ती का नाही ?
अनेकदा प्रशासकीय किंवा एखाद्या मोठ्या यंत्रणेच्या अधिकारी वर्गाकडे आपण निवेदन देण्यासाठी जातो, तेव्हा ते संबंधितांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून निवेदन स्वीकारण्यासाठी उठून उभे रहातात आणि निवेदन स्वीकारतात; मात्र अनेकदा असेही घडते की, बरेचसे शासकीय अधिकारी आसनावर बसूनच निवेदने स्वीकारतात. असे अधिकारी पाहिल्यानंतर आपण एवढ्या मोठ्या पदावर असतांना सौजन्याच्या साध्या गोष्टीही कशा लक्षात येत नाहीत, असा विचार जनतेच्या मनात येतो.
एरव्ही अनेकदा मोठे राजकारणी एखाद्या कार्यक्रमात आम्हाला वेगळी आकर्षक आसनव्यवस्था नको, तर इतरांसारखी सामान्यच व्यवस्था हवी; म्हणून ती पालटण्याचा आग्रह करतात; पण त्यांच्या हाताखाली वावरणारे बरेचसे प्रशासकीय अधिकारी मात्र स्वतः मालक असल्याच्या अविर्भावात जनतेशी वागतात. एकदा असेच कामानिमित्त एका प्रशासकीय कार्यालयाच्या प्रांगणातून मी जात होतो. तेथे एका मोठ्या कार्यक्रमासाठी चारचाकीने आलेल्या एका मोठ्या पदावरील अधिकारी व्यक्तीने त्यांच्या चारचाकीचा दरवाजा स्वतःहून उघडलाच नाही. प्रांगणात कुणी आले नसल्याने ते तसेच गाडीत ५ मिनिटे बसून होते. हे उदाहरण पाहून मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठवण आली. ते स्वतःला ‘प्रधानमंत्री नव्हे, तर प्रधानसेवक’ संबोधतात. सदैव ‘जनतेचे सेवक’ म्हणून वावरतात. असे असले, तरी अशा वृत्तीच्या अधिकार्यांना हे सौजन्य पटत नाही. त्यांना ते ‘स्वतःला मालक आणि जनता नोकर आहे’, असे समजून वागतात.
मध्यंतरी देहलीच्या एका भारतीय प्रशासकीय (आय.ए.एस्.) अधिकार्याने स्वतःच्या आय.ए.एस्. बायकोसह कुत्रा फिरवण्यासाठी चक्क प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता त्यागराज स्टेडियम रिकामे करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. हा प्रकार मासभर चालला. यामुळे तेथे सराव करणारे क्रिडापटू आणि नागरिक हैराण झाले अन् शेवटी याविरोधात तक्रार झाल्यावर या दोघा दांपत्याचे स्थानांतर लडाख अन् अरुणाचल प्रदेश येथे करण्यात आले. जनतेच्या करातून वेतन मिळणारे ‘कोणत्याही अपेक्षेविना जनतेची सेवा करू’, अशी शासकीय नोकरीच्या वेळी शपथ घेणारे पुढे सगळेच विसरून जातात, असेच या उदाहरणातून जाणवते. तसे पाहिल्यास लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि जनता सर्वच जण देशाचे सेवक आहेत. प्रत्येकाने तसा विचार ठेवून कृती केल्यास कुणाचीच कुणाला अडचण होणार नाही.
– श्री. नीलेश देशमुख, सानपाडा, नवी मुंबई.