आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ‘ईडी’कडून दोघांवर आरोपपत्र प्रविष्ट
|
रत्नागिरी – मुरुड (ता. दापोली) येथील साई रिसॉर्ट बांधकामच्या प्रकरणी चालू असलेल्या अन्वेषणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) म्हटले आहे. या प्रकरणात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. ‘ईडी’ने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संबंधितांना अटक केली होती. आता या प्रकरणी ८ मे या दिवशी ‘ईडी’ने सदानंद कदम आणि माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांच्यावर ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट‘ (पी.एम्.एल.ए.) विशेष न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.
मा्जी मंत्री व ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतील एका रिसॉर्टशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. मंगळवारी या आरोपपत्राची विशेष न्यायालय दखल घेण्याची शक्यता आहे.सविस्तर वाचाhttps://t.co/NVoA9I3czl pic.twitter.com/famRewrqsF
— Sarkarnama (@SarkarnamaNews) May 9, 2023
सी.आर्.झेड. कायद्याचे उल्लंघन करून ‘साई रिसॉर्ट’ बांधण्यात आल्याचा आरोप या आरोपपत्रात करण्यात आला आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची चौकशी केली होती. पर्यावरण (संरक्षण) कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने प्रविष्ट केलेल्या तक्रारीमुळे आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उघड झाले आहे.
त्यानंतर जानेवारीमध्ये ‘ईडी’ने साई रिसॉर्टवर जप्तीची कारवाई केली. या प्रकरणात ‘अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या समवेत स्थानिक उपविभागीय कार्यालयाकडून कृषी भूमी अकृषिक वापरासाठी रूपांतरित करण्याची अवैध अनुमती घेतली आणि ‘सी.आर्.झेड.’चे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधले’, असे ‘ईडी’ने म्हटले आहे.
आरोपपत्रातील काही सूत्रे
१. साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांना ‘ईडी’ने अटक केली आहे. सुधीर पारदुले, विनोद देपोलकर, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्या नावांचाही या आरोपपत्रात समावेश आहे.
२. या प्रकरणाचे अन्वेषण अद्यापही चालू असून भविष्यात पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट करण्याची मुभा ‘ईडी’ला असेल.
३. या आरोपपत्रात सध्या ६ आरोपींविरोधात आरोप आहे.
४. अनिल परब यांच्या सहभागाचा आरोपपत्रात वारंवार उल्लेख आहे.
५. ‘ईडी’च्या आरोपपत्रात एकूण १३ साक्षीदारांचा उल्लेख आहे, तर पंच साक्षीदारांसह २० जणांचे जबाब आरोपपत्रात समाविष्ट आहेत.