कॅनडा आणि चीन या देशांकडून एकमेकांच्या राजदूतांची हकालपट्टी !
चीनने कॅनडाच्या अंतर्गत कारभारात केलेल्या हस्तक्षेपामुळे वाद !
टोरंटो/बीजिंग – कॅनडा आणि चीन या देशांनी एकमेकांच्या राजदूतांची आपापल्या देशांतून हकालपट्टी केली आहे. यानंतर दोन्ही देशांतमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
Canada expels Chinese diplomat over alleged intimidation planhttps://t.co/R0AZKXws4m
— All India Radio News (@airnewsalerts) May 9, 2023
याविषयी सविस्तर वृत्त असे की,
१. कॅनडा सरकारच्या गुप्तचर विभागाने काही दिवसांपूर्वी तेथील सरकारला अहवाल सादर केला. या अहवालात म्हटले होते, ‘चीनचे कॅनडातील राजदूत झाओ वेई हे देशाच्या अंतर्गत प्रश्नांत हस्तक्षेप करत आहेत. याद्वारे कॅनडातील सरकार अस्थिर करण्याचा चीनचा डाव आहे. याखेरीज वेई हे कॅनडातील खासदारांनाही लक्ष्य करत आहेत.’
२. या अहवालानंतर कॅनडाने धडक निर्णय घेत झाओ वेई यांची कॅनडातून थेट हकालपट्टी केली. याला प्रत्त्युत्तर म्हणून चीननेही त्याच्या देशातील कॅनडाच्या दूतावासातील राजदूत जेनिफर लिन लालोंडे यांची चीनमधून हकालपट्टी केली. त्यांना १३ मे पर्यंत चीन सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे.
३. चीनमध्ये उगूर मुसलमानांवर मोठ्या प्रमाणात केलेल्या दडपशाहीवर कॅनडातील विरोधी पक्षनेते मायकल चोंग यांनी टीका केली होती. ती चीनला चांगली जिव्हारी लागली. त्यामुळे चीनने मायकल चोंग आणि त्यांचे चीनमधील नातेवाईक यांना त्रास देण्यास आरंभ केला.
४. इतकेच नव्हे, तर चीनने वर्ष २०१९ आणि वर्ष २०२१ मध्ये कॅनडातील अंतर्गत निवडणुकांत हस्तक्षेप करून स्वतःला हवे असलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही कॅनडाच्या गुप्तचर विभागाने त्याच्या अहवालात दिली आहे.
५. गुप्तचर विभागाच्या या अहवालानंतर विरोधी पक्षनेते मायकल चोंग यांनी कॅनडा सरकारकडे झाओ वेई यांच्या हकालपट्टीची आग्रही मागणी केली. त्यानुसार कॅनडाने त्यांना चीनमध्ये हाकलून दिले.
६. मागील वर्षी कॅनडाच्या पंतप्रधानांनीही चीनच्या कॅनडातील हस्तक्षेपाची नोंद घेत चीनविरोधी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
चीनचा हस्तक्षेप सहन करणार नाही ! – कॅनडा
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जॉली म्हणाल्या, ‘‘चीनच्या हस्तक्षेपामुळे आमच्या देशात प्रचंड गदारोळ चालू आहे. त्यामुळे आमच्या सरकारने टोरंटोस्थित चीनचे राजदूत झाओ वेई यांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे. असा निर्णय घेणे आम्हाला आवश्यक होते. आम्ही आमच्या देशाच्या अंतर्गत प्रश्नांत कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप सहन करू शकत नाही. आम्ही सर्व राजदूतांना ‘असे कृत्य केले, तर आम्ही आमच्या देशातून हाकलून देऊ’ अशी चेतावणी दिली आहे.’’
कॅनडाच्या अंतर्गत काराभारात रस नाही ! – चीन
कॅनडाचे सर्व आरोप चीनने फेटाळून लावले आहेत. चीनने म्हटले आहे, ‘‘आम्हाला अन्य देशांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्यात अजिबात रस नाही. आम्ही कॅनडाच्या अंतर्गत काराभारात कधीही हस्तक्षेप केलेला नाही. आमच्या राजदूतांनी कॅनडातील आंतरराष्ट्रीय करार आणि द्विपक्षीय संबंध यांनुसार त्यांची कर्तव्ये पार पाडली आहेत. याउलट कॅनडा सरकारकडून मात्र चीनविरोधी शक्तींना पाठबळ दिले जात आहे. हे आम्ही कधीही सहन करणार नाही. कॅनडाने झाओ वेई यांच्या हकालपट्टीचा आम्ही निषेध करतो.’’
संपादकीय भूमिकाचीनकडून भारतात सातत्याने अशा प्रकारची कुरघोडी करण्यात येते. ती पहाता भारताने चिनी राजदूतांची केवळ हकालपट्टी करणे नव्हे, तर चीनशी सर्व प्रकारचे संबंध तोडणे देशहिताचे आहे ! भारत कॅनडाकडून बोध घेणार का ? |