शासकीय योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत रहा ! – अजयकुमार मिश्रा, केंद्रीय गृह राज्यमंत्री
सातारा, ९ मे (वार्ता.) – शासकीय योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत रहा, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा मंत्री मिश्रा यांनी घेतला. तेव्हा ते बोलत होते. बैठकीला जिल्ह्यातील खासदार, आमदार, विविध लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी मिश्रा यांनी प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, ग्रामसडक योजना, आरोग्य आणि महिला बालकल्याण विभागाशी संबंधित विविध योजना यांचा विस्तृत आढावा घेतला.
या वेळी मंत्री मिश्रा म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व विभाग त्यांच्या योजना चांगल्याप्रकारे राबवत आहेत. त्यांनी अजून चांगले काम करावे, यासाठी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी पूर्ण योगदान दिले पाहिजे. योजनेच्या माध्यमातून जनतेचा विकास हे सरकारचे उद्दीष्ट आहे.