उजनी धरणातील पाण्याची पातळी गतवर्षीच्या तुलनेत ३६ दिवस आधीच उणे झाली !
सोलापूर – पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणार्या उजनी धरणातील पाणीसाठा ६ मे या दिवशी उणे पातळीमध्ये गेला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३६ दिवस आधीच धरणातील पाण्याची पातळी उणे झाली आहे. मागील वर्षी १३ जून या दिवशी उजनी धरणातील पाण्याची पातळी उणेमध्ये गेली होती. सध्या पाणीपातळी ४९१.०१५ मीटर असून एकूण साठा १७९९.८५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६३.५५ टी.एम्.सी. मृतसाठा उपलब्ध आहे. सध्या उजनी कालव्यातून ३ सहस्र क्युसेक्स वेगाने विसर्ग चालू आहे. उजनी धरणातील पाण्यावर किमान ४५ साखर कारखाने आणि १० औद्योगिक वसाहती चालतात, तसेच सोलापूर शहरासह शेकडो गावांना या धरणाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मागील ८ मासांत धरणातील ६० टी.एम्.सी. पाण्याचा वापर केला गेला आहे. या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत पाणी सोडण्याचे नियोजन ढासळले असल्याने या वर्षी उजनी धरणाने लवकर तळ गाठला आहे.