खासगी शाळांतील राखीव जागांवरील आर्.टी.ई. अन्वये प्रवेश प्रक्रियेत पालकांचा निरुत्साह !
पुणे – शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत (आर्.टी.ई.) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चित करण्यात पालकांचा निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे. प्रवेशासाठी ९४ सहस्र ७०० जागा उपलब्ध असतांना आतापर्यंत केवळ ४८ सहस्र विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाल्याचे दिसून येत असून प्रवेशासाठी ८ मे अंतिम मुदत आहे.
आरंभी प्रवेश निश्चित करण्यासाठी २५ एप्रिलची मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीत प्रवेश न झाल्याने मुदतवाढीचा निर्णय घेऊन ८ मेपर्यंत मुदत वाढवण्यात आली; मात्र प्रवेशाची मुदत संपण्यास एक दिवस शेष असतांनाही जेमतेम निम्मेच प्रवेश झाल्याचे आर्.टी.ई. संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे. निवड सूचीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर प्रतीक्षा सूचीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.