राजगडाचा पायाभूत विकास आराखडा अंतिम टप्प्यात !
पुणे – आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राजगडाचा पायाभूत विकास आराखडा सिद्ध करण्यात येत आहे. हा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. राजगडाला शिवकालीन वैभव पुन्हा प्राप्त व्हावे, तसेच गडावर येणारे पर्यटक, अभ्यासक, शिवभक्त यांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रस्तावित कामांचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. गडावरील ऐतिहासिक वास्तू, प्रवेशद्वार, बुरुजांच्या डागडुजीची जवळपास २५ टक्के कामे पावसाळ्यापूर्वी होणार आहेत. या कामांसाठी शासनाने साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. रायगडाच्या धर्तीवर राजगडाचा विकास करण्यात यावा यासाठी शासनाने वरिष्ठ पातळीवर वेगाने हालचाली चालू केल्या आहेत. त्यासाठी वन, बांधकाम, पर्यटन, महसूल आणि संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच राजगडावरील प्रास्ताविक रोप-वेसाठी वरिष्ठ केंद्रीय मंत्री सरसावले आहेत.
पहिल्या टप्प्यातील मंजूर कामे सध्या चालू आहेत. गडावर जोरदार वारे आणि पाऊस असल्याने पावसाळ्यात कामे करता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पाल दरवाजा क्रमांक एक आणि दोनच्या मार्गावरील डागडुजी, बालेगडावरील रेलिंग आणि पायर्यांची दुरुस्ती, तसेच छत्रपती शिवरायांच्या राजसदरेच्या पायर्या आदी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० मजूर, कारागीर गडावर तळ ठोकून आहेत; मात्र अवेळी आलेल्या पावसामुळे डागडुजीच्या कामात अडथळे येत आहेत.