इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वराचे वरदान नाही !
आज १० मे २०२३ या दिवशी ‘१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभदिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वराचे वरदान आहे. पूर्वेकडील राज्य म्हणजे अनागोंदी कारभार आहे’, असा प्रचार पाश्चात्त्य जगताकडून सातत्याने केला गेला. त्याचा हिंदु मनावर प्रचंड परिणाम झाला. हा प्रचार किती खोटा आहे, हे लक्षात आणून देणारी उद्बोधक आणि उपयुक्त माहिती आपल्याला ठाऊक असली पाहिजे. त्यासाठीच हा लेख प्रपंच !
१. विदेशी लेखकांनी भारतीय महसूल पद्धत आणि न्यायसंस्था यांविषयी केलेले कौतुक
आंद्रे विंक या लेखक महाशयांचा ‘लँड अँड सॉव्हरिंटी इंडिया – ग्रेग्रिअन सोसायटी अँड पॉलिटिक्स अंडर द एटीन्थ सेंचुरी मराठा स्वराज्य’, या नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथातील महत्त्वाचे मुद्दे आपल्या मनातील पूर्वग्रह दूर करण्याएवढे सबळ आहेत. त्यातील हा एक मुद्दा पहा, ‘रानटी म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते, ते मराठे मोठे विजिगीषु आहेत. त्यांचे राज्य सुनियंत्रित असून सद्गुणांच्या पायावर त्यांचे नियम आधारलेले आहेत.’’
वर्ष १९२२ मध्ये एफ्.डब्ल्यू. बक्लर याने ब्रिटीश सत्तेच्या उदयासंबंधी जे सिद्धांत मान्य केले होते, त्यात पालट करण्याच्या प्रचाराचा प्रयत्न केला. त्याने असे प्रतिपादन केले की, गेली १५० वर्षे हिंदुस्थानाच्या इतिहासाचे जे दर्शन युरोपला झाले, ते केवळ ‘ट्रेडिंग’ (व्यापार) कंपनीच्या प्रचारानुसार झाले. तिने पुन्हा पुन्हा सांगितलेले निष्कर्ष हे स्वयंसिद्ध म्हणून स्वीकारण्यात आले आहेत. भारतीय अभ्यासकांनी ते स्वीकारले आहेत. (पृष्ठ ३७७ आणि ३७८) पॉटिंजरने लिहिले आहे, ‘माझ्या अनुभवाप्रमाणे महसुलाची कोणतीही युरोपीय पद्धत नाना फडणवीस यांच्या कारकीर्दीतील मराठ्यांच्या पद्धती इतकी कार्यक्षम ठरेल वा होईल, असे मला वाटत नाही.’
डॉ. होप यांना हिंदुस्थानातील परिस्थितीची स्वतःच्या अनुभवानुसार माहिती होती. त्यांनी ‘मराठा न्याय संस्थे’विषयी अभिप्राय देतांना म्हटले, ‘‘ग्वाल्हेरच्या न्यायाधीशांच्या कार्यपद्धतीत आम्हाला बरेच कौतुक करण्यासारखे आणि थोडेच दोषास्पद असे आढळले. आमची अशी खात्री आहे की, जर १८० दशलक्ष लोकांना कोणते सरकार हवे ? याविषयी मतदान करण्याची संधी मिळाली, तर असंख्य लोक सार्वजनिक जीवनाच्या बारीक सारीक गोष्टींवर नियंत्रण ठेवणार्या आणि त्यांना ज्यांची भीती वाटते ते इंग्रजी न्यायालय स्थापन करणार्या शासनाऐवजी ते स्थानिक शासन अधिक पसंत करतील.’’ (संदर्भ : ‘हिंदुत्वाच्या भवितव्याचा शोध’, लेखक : ज.द. जोगळेकर, पृष्ठ १५२ आणि १५३)
२. ईस्ट इंडिया कंपनी कशी होती ?
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वी हिंदुस्थानात ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. एलिझाबेथ राणीने हिंदुस्थानशी व्यापार करण्यासाठी या कंपनीला सनद दिली. त्या सनदेत ‘साहसी गुंडांची संस्था’ म्हणून या कंपनीचा नामनिर्देश करण्यात आला आहे. ३ ऑक्टोबर १६९० या दिवशी या संस्थेच्या चालकांनी हिंदुस्थानात कोणत्याही महत्त्वाच्या जागी सच्छिल माणसाला न घेण्याचा ठराव केला; कारण संस्थेच्या कारभारात सभ्य गृहस्थांचा शिरकाव झाला, तर धाडसी गुंड कंपनीतून आपले अंग काढून घेतील आणि वर्गणी देणे बंद करतील, अशी भीती व्यक्त केली आहे. अशा प्रकारे धाडसाच्या आणि गुंडगिरीच्या जोरावर धनसंपादन करणार्या या टोळीच्या हातात हिंदुस्थानचे राज्य देण्यात आले.
३. इंग्रजी सत्तेचे खरे स्वरूप
माल्कम लडलो याने ‘ब्रिटीश हिंदुस्थानच्या इतिहासात’, खंड १, पृष्ठ १९८ वर म्हटले आहे, ‘‘हिंदुस्थानातील इंग्रजी सत्तेचा इतिहास अधिक तिटकारा येण्याजोगा आहे. दुर्बलता आणि भित्रेपणा यांनी या सत्तेचा आरंभ झाला. जुलमाने हिची वाढ झाली. कपाट, असत्य आणि विश्वासघात या जोरावर इंग्रजी सत्ता दृढमूल झाली. कोणतेही साम्राज्य स्थापन करतांना अशा भीषण स्वरूपाच्या गोष्टी क्वचितच घडल्या असतील.’’ (संदर्भ : ‘सन १८५७’, लेखक : नारायण केशव बेहेरे, पृष्ठ ३ आणि ४)
४. वर्ष १८५७ चा असंतोष वाढण्यामागील कारण
कर्नल मॅलेसन याने ‘१८५७ चे हिंदी बंड’ हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाचा दाखला देऊन ‘नानासाहेब पेशवा अँड द फाईट फॉर फ्रिडम’ या ग्रंथात आनंदस्वरूप मिश्रा लिहितात, ‘‘अनेक गोष्टींवरून माझी खात्री झाली आहे की, शिपायांमधील असंतोष आणि द्वेष यांना इतर बाह्य कारणे घडून आली, ती व्यक्तीगत स्वरूपाची नसून राष्ट्रीय होती. जे शिपाई गेल्या शतकभर आमचे खरे आणि राष्ट्रीय मित्र होते, त्यांच्या मनात असा राष्ट्रीय विचारांचा संसर्ग झाल्यामुळेच हा असंतोष आणि द्वेष उत्पन्न झाला.’’
५. परक्यांची सत्ता ईश्वराची वाटणार्यांमध्ये स्वत्व आणि स्वाभिमान यांचा अभाव
याचा अर्थ राष्ट्रीय विचार मनात दृढ झाल्यानंतर गुलामगिरीविषयी चीड निर्माण होते, स्वत्व जागे होते. गुलामगिरीच्या बेड्या तोडून टाकाव्यात आणि मुक्त व्हावे, हे विचार मनात दृढ होऊ लागतात. हेच राष्ट्रीय विचारांचे खरे सामर्थ्य आहे. परकीय सत्तेने जरी किती सुखसोयी निर्माण करून दिल्या, सुधारणा केल्या, तरीसुद्धा परकीय सत्ता आपली वाटत नाही. ती अत्याचारीच असते. अशी सत्ता ईश्वराच्या कृपेने येत नाही. अत्याचार करणारे ईश्वराचे दूत नसतात, तर सैतानाचे दूत असतात, याची प्रचीती येते. परक्यांची सत्ता ज्यांना ईश्वराचे वरदान वाटते, त्यांच्यात स्वत्व, स्वाभिमान यांचा अभाव असतो. ते लाचार, दुबळे असतात आणि गुलामगिरीतच ते धन्यता मानतात.
६. वर्ष १८५७ चे बंड होण्यामागील आणखी एक कारण
नॉटर्न याने फ्रेझर याचा संदर्भ देऊन म्हटले, ‘‘लोकांमध्ये फार असमाधान आहे. या असमाधानाला कारणेही तशीच आहेत.’’ तो असे म्हणतो, ‘‘५-७ बंडे होतील, इतके असमाधान लोकांमध्ये आहे. या सर्व दुष्ट परिस्थितीला मूळ कारण म्हणजे ही हिंदुस्थानची भूमी मुलखी अधिकार्यांना ‘चरण्याची भूमी’ असे मानले जात असे, हे होय. ‘हिंदुस्थान मुलखी अधिकार्यांच्या लुटीसाठीच आहे’, अशीच आपली भावना असेल, तर ती आपल्या हातून लवकरच जाईल. त्याला आपलीच वागणूक कारणीभूत आहे.’’ (संदर्भ : ‘नानासाहेब पेशवे आणि स्वातंत्र्य युद्ध’, अनुवाद : डॉ. ढमढेरे, पृष्ठ २७४)
७. भारतियांच्या राष्ट्रीय विचारांविषयी ब्रिटिशांची स्थिती
सर जॉन के म्हणतो, ‘‘राष्ट्रीय विचार भारतियांमध्ये निर्माण झालेला खपत नसे. जर एखाद्याने स्वतंत्रपणे वागण्याचे ठरवले किंवा ब्रिटिशांचे दोष दाखवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला ‘नमक हराम’ (खालल्या मिठाला न जागणारा अप्रामाणिक) म्हटले जात असे. कुणी सुबुद्ध इंग्रज हिंदी लोकांच्या स्वातंत्र्याविषयी बोलला किंवा त्याच्याविषयी त्याने सहानुभूती दर्शवली, तर त्याला ‘गोरा निगर’ असे म्हटले जात असे. बहुसंख्य इंग्रजांचे मत असे होते की, स्वदेश प्रेम किंवा स्वातंत्र्य या कल्पना युरोपियन राष्ट्रांनाच लागू आहेत. आशिया खंडातील आणि प्रामुख्याने भारतातील राष्ट्रांना आपल्याला काय पाहिजे, ते ठरवण्याचा अधिकार नाही. त्यांना बंड करण्याचा हक्क नाही. विशेष सुधारलेल्या गोर्या अधिकार्यांनीच जनतेला काय हवे आणि जनतेचे हित कशात आहे ? हे ठरवावे. एवढेच नाही, तर जनतेच्या हितासाठी जनतेचे अधिकार आणि संपत्ती लुबाडण्याचा त्यांना अधिकार आहे.’’ (संदर्भ : ‘नानासाहेब पेशवे आणि स्वातंत्र्य युद्ध’, अनुवाद : डॉ. ढमढेरे, पृष्ठ २७५)
८. डॉ. शशीभूषण चौधरी यांनी १८५७ च्या समरात ब्रिटिशांची क्रौर्यता स्पष्ट करणे
‘सिव्हिल रिबेलियन इन द इंडियन म्युटिनीज १८५७-१८५९’, असे शीर्षक असलेल्या ग्रंथात डॉ. शशीभूषण चौधरी हा ग्रंथ लिहिण्याच्या मागचा हेतू स्पष्ट करतांना म्हणतात, ‘‘१८५७ चा प्रसंग हा स्वातंत्र्यसमराचा नव्हता, ते शिपायांचे बंड होते’, असे म्हणणार्या इतिहासकारांना प्रत्युत्तर देणारा हा ग्रंथ आहे.’’ या ग्रंथाला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत ते लिहितात, ‘भारतीय लोकांना स्वातंत्र्याची इच्छा होती. हा उठाव केवळ सरंजामी लोकांचा नव्हता, हा लेखकाचा निष्कर्ष निर्विवाद आहे.’
‘थिअरिज ऑफ द इंडियन म्युटिनी १८५७-१८५९’, हा वर्ष १८५७ या विषयावरचा दुसरा ग्रंथ डॉ. शशीभूषण चौधरी यांनी लिहिला आहे. या ग्रंथातील दुसरे प्रकरण ‘मोटीव्हज अँड टीट्यूडस्’, असे आहे. या प्रकरणात ब्रिटिशांचे क्रौर्य स्पष्ट करणारे एक उदाहरण दिले आहे, ‘‘मुंबई सरकारच्या दप्तरखान्यात नानासाहेबांच्या जाहीरनाम्याची एक प्रत मिळाली. ती असामान्य प्रत आहे, असे समजण्यात येते. त्यात अन्य जाहीरनाम्याप्रमाणे घटनांची सूची नाही. इंग्रज किती हरामखोर आहेत, त्याचा तपशील आहे. तो असा, ‘राजा शंकर शहा हा राणी दुर्गावतीचा वंशज होता. त्याला आणि त्याच्या मुलाला इंग्रजांनी तोफेच्या तोंडी दिले. त्याचा अपराध काय होता ? तर राजा शंकर शहा यांच्याजवळ एक कागदाचा तुकडा सापडला. त्या कागदाच्या तुकड्यावर राजाने देवीला केलेली प्रार्थना होती. ‘ब्रिटीश सरकारला उलथून टाकण्यासाठी देवीने साहाय्य करावे’, असे त्या प्रार्थनेत म्हटले होते.’’
९. ब्रिटीश साहित्यात १८५७ च्या बंडाविषयी केलेले लिखाण अत्यंत चुकीचे असे एडवर्ड थॉमसन यांनी सांगणे
१८५७ च्या बंडाविषयीच्या ब्रिटीश साहित्याविषयीचे एडवर्ड थॉमसन याचे मत ‘सॅटर्डे रिव्ह्यूव’मध्ये प्रसिद्ध झाले. ते असे, ‘बंडाविषयी माझे अजूनही असे मत आहे की, त्या दुष्ट आणि अमानुष प्रसंगाचे आम्ही केलेले वर्णन आमच्या सर्व ऐतिहासिक लिखाणात नालायकीचे आहे. बंड आपल्या लगतच्या काळात झाले. आपल्या लोकांच्या शौर्याची जितकी वाहवा करावी, तेवढी थोडीच होईल; पण आपण स्वतः एक पक्षकार असतांना न्यायाधीश म्हणून आपल्या खटल्याचा निवाडा आपणच देण्याचे जितक्या लवकर टाकून देऊ तितके बरे !’’
‘एकतर्फी पुराव्यावर भिस्त ठेवून आम्ही बंडाचा एकतर्फी इतिहास लिहिला’, ही गोष्ट होम्स नाकारतो; पण होम्सचा देशी आधार म्हणजे गळ्याभोवती फासाच्या दोराचे वेष्टन असतांना आरोपीने भयाने मुलखी किंवा लष्करी न्यायालयापुढे दिलेला कबुली जबाब होय.
१०. १८५७ च्या बंडावर हिंदी लोकांना लिखाण करण्यास असलेली अप्रत्यक्ष बंदी
बंडासंबंधी वाटेल ते लिहिण्यास आज ७० वर्षांपर्यंत इंग्रजी लोकांना पूर्ण मोकळीक होती. आमच्या हिंदी नागरिकांची मने दुखावल्याविषयी त्यापैकी एकही पुस्तक जप्त झाले नाही; पण हिंदी लोकांनी लिहिलेले बंडाचे इतिहास मात्र जप्त झाले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर बंडाच्या टापूतील रहिवासी नव्हते. त्यांनी आपले पुस्तकही इंग्रजी आधारावरच विलायतेत लिहिले. हिंदुस्थानात त्यांना लिहिणे ते शक्य नव्हते. ‘‘मला आणि होम्सला जी साधने उपलब्ध झाली, त्याच्या एक शतांश सुद्धा त्यांच्या हाती लागली नसतील. माझे पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत मी सावरकरांचे पुस्तक वाचले नाही; परंतु ते मी वाचले, तेव्हा सर व्हॅलेंटाईन चिरोल यांना ते चांगले लिहिले गेले, असे वाटले. या गोष्टीचे मला आश्चर्य वाटले; परंतु बंडावरचे ज्यांचे पुस्तक जप्त झाले, असे सावरकर एकटे लेखक नाहीत. सारांश आपल्याला या विषयावर वाटेल ते लिहिण्यास मुभा आहे; पण हिंदी लोकांची याविषयी मुस्कटदाबी झाली आहे. इंग्रजांमुळे हिंदुस्थानच्या इतिहासात ज्या गोष्टी घडल्या, त्यासंबंधी आमच्या इतिहास लेखकाने प्रदर्शित केलेल्या मतावर टीका करण्याचा आणि आपली बाजू मांडण्याचा हिंदी लोकांना अवश्य हक्क असला पाहिजे. ‘द आदर साईड ऑफ द मेडल’, हे पुस्तक ऐतिहासिक शुद्धतेच्या दृष्टीने आवश्यक असे मी समजतो.’’ (संदर्भ : ‘सन अठराशे सत्तावन’, लेखक : नारायण केशव बेहेरे, पृष्ठ ४५९/४६०)
११. परकीय सत्ताधीश वरदान वाटणे म्हणजे देशभक्ती अन् प्रामाणिकपणा नसणे
गुलामगिरीची मानसिकता जोपासणार्या आपल्या देशातील आपल्या काही बांधवांनी परकियांनी लिहिलेला इतिहास पुसून टाकून सत्य इतिहास सांगण्याचा प्रयत्न करताच जोरदार विरोध केला जातो; कारण परकियांची सत्ता या मंडळींना ईश्वराचे वरदान वाटते. त्या परकियांनी लिहिलेला विकृत इतिहासच त्यांना सत्य वाटतो; कारण त्यांच्यातील स्वत्व आणि राष्ट्राभिमान यांची भावना मेलेली आहे. अशी मंडळी पराभूत मानसिकतेमुळे परकीय आक्रमकांच्या परकीय सत्ताधीशांच्या स्मृतींचे जतन करण्याचा प्रयत्न करतात. त्या स्मृती नष्ट करण्याचा कुणी प्रयत्न केला, तर त्यांना ते सहन होत नाही.
ज्या लोकांना पूर्वीच्या कोणत्याही स्वदेशी राजवटीपेक्षा परकीय राजवट अधिक वाईट आहे, हे कळतच नाही आणि ज्यांच्या अंगी स्वदेशी बांधवांविरुद्ध परकियांना साहाय्य नाकारण्याइतकी देशभक्ती अन् प्रामाणिकपणाही रहात नाही, अशा लोकांनी स्वदेश बांधवांचा विश्वासघात केला आहे. हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही.
१२. वर्ष १८५७ च्या क्रांतीयुद्धावरून विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची समर्पक उत्तरे
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथात खालील दोन प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ती अशी…
अ. क्रांतीयुद्धाची पूर्ण सिद्धता होण्याआधीच क्रांतीचा उठाव झाला का ?
उत्तर : क्रांतीकारकांच्या पुढार्यांनी अकारण घाई केली नाही : १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात जेवढी पूर्वसिद्धता झाली होती, तेवढी सिद्धता अनेक विजय संपादन केलेल्या क्रांतीच्या वेळी झालेली नव्हती. शिपायांच्या पलटणी मागून पलटणी, राजेरजवाडे, प्रचलित सरकारचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस, मोठमोठी शहरे सर्व एका पाठोपाठ एक उठावाची वचने देत होती. अशा परिस्थितीत तात्काळ बंडाला आरंभ होणारच होता. याखेरीज अनेक प्रसंगात प्रारंभी अडचण निर्माण होते. एकदा का उठावाला प्रारंभ झाला की, सर्व देश आपोआप उठतो. हा अनुभव लक्षात घेतला की, स्पष्ट होते क्रांतीकारकांच्या पुढार्यांनी अकारण घाई केली नाही. उलट असे म्हणावे लागेल की, एवढी अनुकूल परिस्थिती असतांना उठाव करण्याचे धाडस ज्यांना होत नाही, ते क्रांतीचा उठाव कधीही करू शकत नाहीत.
आ. १८५७ च्या क्रांतीयुद्धात पराभव का झाला ?
उत्तर : क्रांतीकारक उतावीळ आणि अविचारी नसून त्यांना दोष देता येणार नाही : या क्रांतीसाठी विघातक भागाची व्यवस्थित आखणी केली होती. त्यानंतर निर्माण होणार्या परिस्थितीत कसे वागले पाहिजे ? याविषयी विधायक, आकर्षक आणि सुव्यवस्थेची आखणी केली गेली नव्हती. इंग्रजांची सत्ता नष्ट करावी, यावर सर्वांचे एकमत होते; पण त्यानंतर काय ? पूर्वीची स्थिती परस्परविघातक भांडणे, पुन्हा तेच मोगल, तेच मराठे, तीच जुनी भांडणे अशा परिस्थितीला कंटाळून वेडाच्या झटक्यात परक्या शत्रूंना आत येण्याची तीच जुनी पद्धत अवलंबायची असेल, तर आपले रक्त व्यर्थ कशाला सांडायचे ? असे सर्वसाधारण जनतेला वाटू लागले. क्रांतीचा विघातक भाग यशस्वीपणे पार पडला. त्यानंतरच्या विधायक राजवटीचा प्रश्न उत्पन्न झाला. त्या वेळी आपापसांतील मतभेद, परस्परांची वाटणारी भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव हे दुर्गुण उफाळून वर आले. क्रांतीनंतर लोकांच्या कल्पनेला आणि विचारांना पटेल, असा आकर्षक कार्यक्रम ठेवण्यात आला असता, तर क्रांतीनंतर होणारी स्वातंत्र्यवाढीची विधायक वृत्ती बळावून प्रारंभाप्रमाणे क्रांतीचा शेवट यशस्वीपणे सिद्धीस गेला असता.
‘दुष्टांचे पारिपत्य केल्यानंतर चांगली राजवट निर्माण करता येते’, एवढे जरी लोकांच्या लक्षात आले असते, तरीसुद्धा क्रांतीचा विजय झाला असता. नव्या निर्मितीचा विचार दूर राहिला; पण ती जनता परकीय राजवटीचा विनाश पूर्णपणे करू शकली नाही. याचे कारण उघड आहे की, या देशातून विश्वासघात आणि भीरूता हे दोन महादुर्गुण अजून पूर्णपणे नष्ट झाले नव्हते. पराभवाचे मुख्य कारण, म्हणजे ज्या लोकांना पूर्वीच्या कोणत्याही स्वदेशी राजवटीपेक्षा परकीय इंग्रजांची राजवट अधिक वाईट आहे, हे कळले नाही. ज्यांच्या अंगी स्वदेशी बांधवांच्या विरुद्ध परक्यांना साहाय्य नाकारण्याएवढी देशभक्ती आणि प्रामाणिकपणा नव्हता, त्या लोकांनी केलेला स्वदेश बंधूंचा विश्वासघात ! म्हणूनच अपयशाचे पराभवाचे सर्व पाप अशा विश्वासघातकी लोकांच्या कपाळावरच फुटते.
स्वराज्यापेक्षा परकीय सत्ता अधिक वाईट आणि घातक असते, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे वर्तन करणार्या विरांना उज्ज्वल श्रेय प्राप्त होते. मग ती लोकशाही असो किंवा एकशाही असो. स्वातंत्र्याची अभिलाषा केवळ देश संपन्न आणि सुखी व्हावा, एवढ्यासाठी नसते, तर स्वातंत्र्यानेच आत्म्याला खरे समाधान प्राप्त होते. लाभ आणि हानी यांपेक्षा स्वत्वाची भावना महत्त्वाची असते. पारतंत्र्याच्या सोनेरी पिंजर्यापेक्षा जंगलात असलेले स्वातंत्र्य शतपटीने श्रेष्ठ आहे.
फळे मधुर खावया असती नित्य मेवे तसे ।
हिरेजडीत सुंदरी कनक पंजरीही वसे ।
अहर्निश तथापि तो सुख मनात दुःखे झुरे ।
स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे ।।
ज्यांना स्वातंत्र्याचे तत्त्व समजले; स्वधर्मासाठी, स्वदेशासाठी ज्यांनी आपले कर्तव्य पार पाडले, स्वधर्म आणि स्वराज्य यांसाठी ज्यांनी आपल्या तलवारी उपसल्या अन् कदाचित विजयासाठी नाही; पण कर्तव्यबुद्धीने ज्यांनी मरण पत्करले, त्यांची नावे चिरंजीव राहोत. त्यांना कोटी कोटी प्रणाम !
केवळ मतभेदाने आणि अस्थिरबुद्धीने ज्यांनी विरांना सहकार्य केले नाही, त्यांची देशाला आठवण रहाणार नाही. त्यातूनही भयावह प्रकार असा की, जे प्रत्यक्ष शत्रूला जाऊन मिळाले आणि स्वदेश बंधूंशी शत्रूसह लढले, त्यांचा जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडाच ! या क्रांती युद्धाच्या अपयशाचा दोष ज्यांनी देशाला पारतंत्र्यात ढकलले, अशा नामर्द, आळशी आणि विश्वासघाती लोकांचा आहे.
देश स्वातंत्र्यास्तव स्वतःच्या उष्ण रक्तात ज्यांनी आपल्या तलवारी बुचकळून काढल्या, सशस्त्र क्रांतीच्या त्या नाट्यप्रयोगात अग्नीमंचकावर निर्भयपणे ज्यांनी प्रवेश केला, साक्षात् मृत्यू पुढे असतांनाही त्याची पर्वा न करता जे मृत्यूच्या मुखातही नाचले, त्यांना दोष देऊन कुणीही आपल्या जिभा विटाळू नयेत ! क्रांतीकारक उतावीळ, वेडे आणि अविचारी सुद्धा नव्हते. म्हणूनच त्यांना दोष देता येणार नाही. त्यांनी मारलेल्या हाकांमुळेच हिंदमाता आपल्या गाढ झोपेतून जागी झाली. आपले पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ती धावून गेली; पण जेव्हा तिच्या काही सुपुत्रांनी अन्यायाच्या टाळक्यावर जोरदार प्रहार केला, तेव्हाच दुर्दैवाने तिच्याच काही कुपुत्रांनी तिच्याच हृदयात खंजीर खुपसला. ती घायाळ झालेली हिंदमाता भूमीवर कोसळून पडली असतांना तिच्या दोन पुत्रांपैकी कोण क्रूर, कोण विश्वासघातकी आणि कोण तिरस्करणीय आहे ? कोण वीर, कोण साहसी, कोण देशभक्त आणि कोण आदरणीय आहे ? हे ज्यांना कळत नाही, त्यांची बुद्धी शुद्ध आहे, असे म्हणता येत नाही.’ (संदर्भ : ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, लेखक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, पृष्ठ ४५८ ते ४६०)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (८.५.२०२३)