नाशिक येथील पांजरपोळ जागेच्या सर्व्हेत अडीच लाख झाडांची नोंद !
|
नाशिक – चुंचाळे येथील पांजरपोळची जागा उद्योगांसाठी देण्याचे सूत्र चर्चेला आल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘गायींसाठी जागा राखीव ठेवून उर्वरित जागा उद्योगांसाठी घ्या’, यासाठी सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानंतर गेल्या मासाच्या शेवटच्या आठवड्यात सर्वेक्षण चालू झाले. या ठिकाणी तब्बल अडीच लाख झाडे असून वन्यप्राण्यांचा अधिवासही असल्याने ही जागा उद्योगांसाठी देण्यास पांजरपोळने स्पष्ट नकार दिला आहे.
आता प्रत्यक्ष केलेल्या सर्वेक्षणात येथे अडीच लाख वृक्ष असून वन्यप्राणीही असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे या जागेसंदर्भात प्रशासनाच्या निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ३ मासांपासून रखडलेले चुंचाळे येथील पांजरपोळचे सर्वेक्षण मागील मासाच्या शेवटच्या आठवड्यात चालू झाले होते. १० मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल, वन, जलसंधारण, महापालिका यांसह विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आले आहेत.