‘जो ब्रह्माला जाणतो, तो स्वतः ब्रह्म होतो’, हे वेदांमधील वाक्य सार्थ ठरवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! – पू. डॉ. शिवनारायण सेन
१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ‘ट्रुथ’ या साप्ताहिकाचे नियमित वाचक असणे’, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले या अवताराच्या प्रगटीकरणाचा ८१ वा दिवस मे २०२३ मध्ये आहे. ‘ट्रुथ’ या साप्ताहिकाचे ते नियमित वाचक असणे’, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ते साप्ताहिक आवर्जून वाचत आणि वाचून झाल्यावर ‘यात चैतन्य आहे’, असे सांगून तो अंक जपून ठेवत.
२. मानवजातीच्या कल्याणासाठी ‘अध्यात्मातील संकल्पना, पारंपरिक गोष्टी आणि धार्मिक विधी’, यांमागील शास्त्र वैज्ञानिक भाषेत मांडण्यासाठी कार्यरत असलेले परात्पर गुरुदेव !
ते स्वतः ज्ञानी असून ‘अध्यात्मातील प्रत्येक संकल्पना, पारंपरिक गोष्टी आणि धार्मिक विधी’, यांमागील शास्त्र वैज्ञानिक भाषेत मांडण्यासाठी कार्यरत आहेत. ‘जात, वर्ण, संप्रदाय अथवा गरीब-श्रीमंत’, असा विचार न करता संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी या गोष्टींचे वैशिष्ट्यपूर्ण विश्लेषण ‘भौतिक, आधिभौतिक आणि अध्यात्मातील परिमाण’, यांद्वारे अद्वितीय पद्धतीने मांडले आहे.
३. परात्पर गुरुदेवांनी शिकवलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रकिया साधकांना आध्यात्मिक शिखरावर नेऊन पोचवते !
परात्पर गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधकांमध्ये होत असलेले पालट आम्ही अतिशय आश्चर्याने अन् कौतुकाने पहातो. त्यांनी शिकवलेली ही प्रक्रिया देशभरातील असंख्य साधकांना सेवाभावी, समजूतदार, विनम्र आणि शांत बनवत असून त्यांना एका आध्यात्मिक शिखरावर नेऊन पोचवत आहे.
४. ‘भरकटलेल्या जिवाला श्रीकृष्णाच्या चरणप्राप्तीच्या दिशेने वळवणे’, म्हणजे त्याच्या चरणी एक ‘कौस्तुभ मणी’ अर्पण करणे’ होय.
५. परात्पर गुरुदेवांची महानता शब्दांत मांडण्याचा प्रयत्न, म्हणजे ज्योतीने तेजाची आरती !
स्त्री-पुरुष, मुले-मुली सर्वांनाच गुरुसेवा आणि शरणागत होऊन श्रीकृष्णाच्या चरणभक्ती यांकडे नेण्याचे त्यांचे ‘कैङ्कर्य’ (देव, गुरु आणि त्यांचे भक्त यांची अविरत सेवा) अत्यंत कौतुकास्पद आहे. वेदांमध्ये ‘ब्रह्मविद् ब्रह्मैव भवति ।’, म्हणजे ‘जो ब्रह्माला जाणतो, तो स्वतः ब्रह्म होतो’, असा उल्लेख आहे. अशा या थोर विभूतीची महानता शब्दांत मांडण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा माझा प्रयत्न, म्हणजे मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशाने सूर्याची आरती केल्यासारखे आहे. तत् क्षामये (क्षमा असावी.)
६. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना आणि त्या माध्यमातून होत असलेले संशोधन कार्य यांमुळे आजकालच्या इंग्रजाळलेल्या तरुणांमध्ये रुजलेली नास्तिकता मुळापासून हादरली आहे.
७. परात्पर गुरुदेवांच्या धर्मरक्षणाच्या प्रयत्नांनी देशभरातील संत, विद्वान आणि नेते यांच्यासह असंख्य लोकांची मने जिंकली आहेत !
‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या माध्यमातून ‘धर्मराज्य’ यावे’, यासाठी लोकांमध्ये चेतना जागृत करण्याचे त्यांचे अथक प्रयत्न दशकापेक्षाही अधिक कालावधीपासून चालू आहेत. त्यांच्या या प्रयत्नांनी आज देशभरातील संत, विद्वान आणि नेते यांच्यासह असंख्य लोकांची मने जिंकली आहेत.
‘परात्पर गुरुदेवांकडून ईश्वराची सेवा निरंतर घडावी’, यासाठी त्यांना उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो’, अशी श्रीहरीच्या चरणी अंतःकरणापासून प्रार्थना !’
– पू. डॉ. शिवनारायण सेन, संपादक, साप्ताहिक ‘ट्रुथ’. (एप्रिल २०२३)