कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात २ सहस्र ८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई !

प्रतिकात्मक चित्र

सांगली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात ८८ लाख रुपयांची रोख रक्कम, मद्य, रसायन, गांजा असा ४ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याचसमवेत ११ पिस्तुल-गावठी कट्टे जप्त करण्यात आले. (निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी कारवाई ही भारताच्या अमृत महोत्सवी लोकशाहीसाठी लज्जास्पद नाही का ? सर्वांत प्रगल्भ लोकशाही म्हणवणार्‍या भारतात अजूनही निवडणुका या पैसा, मद्य, तसेच अन्य मार्गांचा अवलंब करूनच जिंकल्या जातात, यापेक्षा दुर्दैव ते काय ? – संपादक) कोल्हापूर परिक्षेत्रात २ सहस्र ८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांना दिली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागांत विविध ठिकाणी पोलिसांचे पडताळणी नाके उभे करण्यात आले होते. त्यानुसार सीमवर्ती भागात मोठी कारवाई करण्यास पोलिसांना यश आले आहे. सोलापूर ग्रामीणच्या भागात ८८ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. २० लाख ३० सहस्र रुपयांचे मद्य, गुटख्याची २ लाख ३३ सहस्र पाकिटे जप्त करण्यात आली, (महाराष्ट्रात गुटख्याला बंदी आहे, तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची पाकिटे जप्त कशी काय होतात ? या संदर्भात पोलीस प्रशासनाने काय कारवाई केली ?, हेही समजायला हवे. – संपादक) तर ३ कोटी २५ लाख रुपयांचा मद्य बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला, असे फुलारी यांनी सांगितले.